esakal | सेलिब्रेटी बाप्पा! यंदा आरोग्य उत्सव  साजरा करू - स्वप्नील जोशी 
sakal

बोलून बातमी शोधा

सेलिब्रेटी बाप्पा! यंदा आरोग्य उत्सव  साजरा करू - स्वप्नील जोशी 

गणेशोत्सवाच्या दीड दिवसामध्ये अनेकांच्या भेटीगाठी होतात. मात्र, यंदा मी कुणालाही गणपतीचे दर्शन घ्यायला बोलवणार नाही. सोशल मीडियावरून आमच्या बाप्पांचा फोटो मी त्यांना पाठविणार आहे. - स्वप्नील जोशी

सेलिब्रेटी बाप्पा! यंदा आरोग्य उत्सव  साजरा करू - स्वप्नील जोशी 

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

अभिनेता स्वप्नील जोशी अनेक वर्षे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करीत आला आहे. गणेशाची पंचधातूची मूर्ती तो पूजतो. यंदा सुरक्षेच्या निमित्ताने सर्वांनी पंचधातूच्या मूर्तीचे पूजन करण्याचे आवाहन त्याने केले आहे... 

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. काही ठिकाणी संसर्ग आटोक्‍यात आला असला तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे, असे म्हणता येणार नाही. कोरोनावर एखादी लस येत नाही तोपर्यंत परिस्थिती निवळेल, असे वाटत नाही. त्यामुळे सगळ्यांनीच आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. "लालबागचा राजा' मंडळ यंदा गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर भरवणार आहे. त्यामुळे मलाही असे वाटते की यंदा गणेशोत्सवापेक्षा आपण आरोग्य उत्सव साजरा करू या. आपले आरोग्य आपणच जपू या. 

सेलिब्रेटी बाप्पा! आमच्या गणेशाची  यंदा ऑनलाईन पूजा - सुरेश वाडकर 

गणेशोत्सव साजरा करण्याबाबत आता सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे. घरगुती गणपतीची मूर्ती दोन फुटांपेक्षा अधिक नसावी... विसर्जनाला पाचच माणसे असावीत वगैरे वगैरे. त्या सगळ्या निर्णयांचे स्वागतच आहे, पण गेली पाचेक वर्षे मी असाच गणेशोत्सव साजरा करत आलो आहे. माझ्या घरी पंचधातूची मूर्ती आहे. आम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्थात जेव्हा गणपतीचे आगमन होते तेव्हा प्रातिनिधिक स्वरूपात लिफ्टपर्यंत चालत जातो आणि तेथून ती पंचधातूची गणेशमूर्ती घरात आणतो. मग तिची प्राणप्रतिष्ठा करतो. आम्ही पूजा वगैरे करायला गुरुजींना बोलावत नाही. कारण गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरुजी खूप बिझी असतात. ते आपल्याला देत असलेली वेळ पटेल असे काही नाही. त्यामुळे आम्ही कॅसेट लावून पूजा-आरती करतो. विसर्जनही आम्ही घरीच करतो. एका बादलीत पाणी घेऊन त्यात मूर्ती ठेवतो. 

गणेशोत्सवादरम्यानच्या काळात अनेक जणांची आमच्या घरी रेलचेल असते. साधारण एक हजारच्या आसपास मंडळी घरी येतात. आमचा उत्सव दीड दिवसाचा असतो. त्यादरम्यान मी चित्रीकरण वगैरे काही करीत नाही. दोन दिवस बाप्पाची सेवा करतो. 

सेलिब्रेटी बाप्पा! शेवटी आपली भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची... - शंकर महादेवन

पंचधातूच्या मूर्तीचे पूजन करा 
गणेशोत्सवाच्या दीड दिवसामध्ये अनेकांच्या भेटीगाठी होतात. मात्र, यंदा मी कुणालाही गणपतीचे दर्शन घ्यायला बोलवणार नाही. सोशल मीडियावरून आमच्या बाप्पांचा फोटो मी त्यांना पाठविणार आहे. माझे स्वतःचे असे मत आहे, की यंदा पंचधातूच्या मूर्तीचे पूजन सगळ्यांनी करावे. ते पर्यावरणासाठी उत्तम आहे. 
--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )