सेलिब्रेटी बाप्पा! आमच्या गणेशाची  यंदा ऑनलाईन पूजा - सुरेश वाडकर 

सेलिब्रेटी बाप्पा! आमच्या गणेशाची  यंदा ऑनलाईन पूजा - सुरेश वाडकर 


संकटहारक, विघ्ननाशक गणरायाच्या आगमनास महामुंबई सज्ज झाली आहे. यंदाचा हा काळ तसा संकटाचा, पण विघ्नहर्त्याच्या भक्तीपुढे या विघ्नांचा काय पाड? तमाम भक्तमंडळी मोठ्या आतुरतेने विनायकाची प्रतीक्षा करीत आहे, उत्सवाच्या तयारीला लागली आहे. यंदाच्या या कोरोनाकाळात ते कसा साजरा करणार आहेत गणेशोत्सव... वाचा त्यांच्याच शब्दांत. 
 

सध्या कोरोना संकटकाळामुळे सगळ्यांवरच आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करावा. अर्थातच सरकारी नियमांचे पालन करूनच. आम्हीही दरवर्षीप्रमाणे यथासांग पूजाअर्चा करणार आहोत, पण निर्बंध पाळूनच. आम्ही दरवर्षी कोल्हपूरहून दोन ते अडीच फुटांची मूर्ती आणतो. यंदा मात्र आम्ही दोन फुटांचीच मूर्ती आणली आहे. आमच्या बाप्पाची मूर्ती दादरमध्ये आली आहे. आमच्या कुटुंबातील सदस्य लवकरच जाऊन ती घरी आणतील. दरवर्षी आमच्याकडे पूजा सांगायला पुण्याहून संजय उपाध्ये येतात. या वर्षी कोरोनामुळे ते ऑनलाईन पूजा सांगणार आहेत. बाकी इतर तयारी लवकरच सुरू होईल. 

आमच्या घरच्या गणेशोत्सवाचा उत्साह काही औरच असतो. उत्सवाची तयारी आठेक दिवस अगोदरच सुरू होते. माझे पुतणे मंदार आणि अवधूत सगळी तयारी करतात. आम्ही बाजारातून मखर वगैरे आणत नाही. सगळी तयारी घरच्या घरी. दररोज भजन वगैरे होते. विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक काढली जाते, पण यंदा सुरक्षेचा उपाय म्हणून ती निघणार नाही. एका गाडीतून दोनतीन जणच मूर्ती घेऊन जुहू चौपाटीवर तिचे विसर्जन केले जाईल. आमच्या वयाचा विचार करता आम्ही जाणार नाही. सगळे नियम पाळूनच विसर्जन करण्यात येईल. मुळात आम्ही दरवेळी दुपारी मूर्ती विसर्जनाला निघतो तेव्हा फारशी गर्दी नसते. यंदाही विसर्जनासाठी दुपारीच एक-दीड वाजता निघणार आहोत. सरकारच्या नियमाप्रमाणे मास्क वगैरे घालणार आहोत. आमच्या आणि इतरांच्या सुरक्षेबाबत सर्व ती काळजी घेतली जाईल. 

बाप्पा संकटातून नक्कीच बाहेर काढेल 
खरे तर दरवर्षी आमच्याकडे माझा काही मित्र परिवार आणि माझ्या पुतण्यांचे मित्र गणपतीच्या दर्शनाला येत असतात. मीदेखील काही जणांच्या घरी जात असतो, परंतु या वेळी फारसे कुणी येणार नाही. मीदेखील जाणार नाही. कोरोनाच्या रूपाने या वर्षी आपल्यावर मोठे संकट आले आणि ते बाप्पाला माहीत आहे. तोच या संकटातून आता आपल्याला नक्कीच बाहेर काढेल. 

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com