esakal | सेलिब्रिटी वीकएण्ड : जेव्हा जेव्हा मी चित्र रंगवते, तेव्हा मला बालपणीच्या दिवसांची आठवण होते
sakal

बोलून बातमी शोधा

akshaya-gurav

जेव्हा जेव्हा मी चित्र रंगवते, तेव्हा मला पुन्हा एकदा बालपणीच्या दिवसांची आठवण होते. आमच्या घरी खूप झाडं आहेत. त्याला पाणी घालणं, त्यांची काळजी घेणं हे माझं आणखी एक आवडतं काम.

सेलिब्रिटी वीकएण्ड : जेव्हा जेव्हा मी चित्र रंगवते, तेव्हा मला बालपणीच्या दिवसांची आठवण होते

sakal_logo
By
अक्षया गुरव, अभिनेत्री

माझ्यासाठी वीकएण्ड म्हणजे एखादी नवीन काहीतरी गोष्ट करून तो दिवस सार्थकी लावण्याचा दिवस. घरी असल्यावर एखादी व्यक्ती ज्या ज्या गोष्टी करेल, त्या सगळ्या गोष्टी मी करते. त्या दिवशी मी थोडं उशिरा उठून, मनसोक्त आराम करून आठवडाभराची आरामाची कसर भरून काढते. मी फिटनेस फ्रिक आहे. त्या दिवशी मी आराम करण्याकडे भर देत असले, तरी मी व्यायाम करण्यात कधीही खंड पडू देत नाही. दिवसातला तासभर तरी मी एक्सरसाइझ करते. मला कुकिंगची फार आवड आहे; मग तो अगदी वरणभात असो, नाहीतर मोठा घाट घालत बनवलेला एखादा साग्रसंगीत पदार्थ असो. मी ते सगळं खूप एन्जॉय करते. मला सगळे पदार्थ उत्तम बनविता येतात. मला वाचन करायला लहानपणापासूनच प्रचंड आवडतं. हे बाळकडू मला माझ्या आईकडून मिळालं आहे. तिला आणि माझ्या नवऱ्यालाही वाचनाची भरपूर आवड आहे. आम्ही सगळेच पुस्तकप्रेमी असल्यामुळे आमच्याकडे अक्षरशः खजिना आहे वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांचा. एकदा पुस्तक हातात घेतलं, की वेळ कसा जातो कळतच नाही. मी मध्यंतरी ‘बिटरस्वीट’ नावाचा चित्रपट केला. त्याचं दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी केलं होतं. माझ्या कामाचं‌ कौतुक म्हणून त्यांनी स्वतः लिहिलेलं ‘वन्स अपॉन अ प्राइम टाइम’ हे पुस्तक त्यांनी मला भेट दिलं. ते माझं वाचून झालं. शिवाय परवा भाऊबिजेला माझ्या भावानं मला प्रिया तेंडुलकर यांचं ‘तिहार’ आणि मंगला गोडबोले यांचं ‘मुरली’ अशी दोन पुस्तकं भेट दिली आहेत; जी मी येत्या काही दिवसांत वाचून संपवेन. मी घरी आहे आणि एकही चित्रपट पाहिला नाही असं कधीही होत नाही. चित्रपट बघणं हा जाणू काही माझ्या रोजच्या रुटीनचा भागच बनला आहे. तो मी नाही पाहिला, तर मला खूप चुकल्याचुकल्यासारखं होतं. याप्रमाणेच त्या दिवशी घर आवरणं हा एक ठरलेला कार्यक्रम असतो.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच मला क्रिएटिव्ह गोष्टी करायला खूप आवडतात. पेंटिंग करायला मला आवडतं. जेव्हा जेव्हा मी चित्र रंगवते, तेव्हा मला पुन्हा एकदा बालपणीच्या दिवसांची आठवण होते. आमच्या घरी खूप झाडं आहेत. त्याला पाणी घालणं, त्यांची काळजी घेणं हे माझं आणखी एक आवडतं काम. माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींची प्रोफेशन्स वेगळी असल्यामुळे आम्हाला वरचेवर एकत्र भेटायला मिळत नाही; पण सुट्टीच्या एखाद्या दिवशी आम्ही सगळे एकत्र भेटण्याचा प्लॅन बनवतो, छान फिरायला जातो, गप्पा मारतो. माझं सासर डोंबिवलीचं आहे आणि मी आणि माझा नवरा राहतो मुंबईत. मग दिवसातला थोडा वेळ सासरी आणि माहेरी सगळ्यांशी फोनवर मी बोलते. आमचं रोज भेटणं जरी होत नसलं, तरी अशा छोट्याछोट्या कृतीतून आपलं समोरच्याशी असलेलं नातं आणखी घट्ट होत जातं आणि याच गोष्टी आपल्याला खूप आनंद आणि पुन्हा जोमानं कामं करायला सकारात्मक ऊर्जा देतात.

Sakal Video Gallery पाहण्यासाठी येथे क्लिक करा

(शब्दांकन : राजसी वैद्य)

loading image