हलक्याफुलक्या मनोरंजनाचा ‘क्लास’ 

संतोष भिंगार्डे 
Friday, 13 November 2020

लक्ष्मी या अक्षयकुमारच्या चित्रपटानंतर  आता राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांचा ‘छलांग’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. गेले अनेक दिवस या चित्रपटाची चर्चा सगळीकडे रंगलेली होती. 

ऑन स्क्रीन : छलांग 
चित्रपटगृहे बंद असल्यामुळे अनेक निर्मात्या व दिग्दर्शकांनी ओटीटी प्लॅटफार्मला पसंती दिली आणि आता एकेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. लक्ष्मी या अक्षयकुमारच्या चित्रपटानंतर  आता राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांचा ‘छलांग’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. गेले अनेक दिवस या चित्रपटाची चर्चा सगळीकडे रंगलेली होती. 

त्यातच राजकुमार राव, नुसरत भरूचा, सतीश कौशिक, सौरभ शुक्ला अशी तगडी स्टारकास्ट आणि हंसल मेहता यांचे दिग्दर्शन असल्यामुळे अधिक उत्सुकता लागलेली होती. चित्रपट पाहिल्यानंतर हा एक हलकाफुलका आणि कौटुंबिक चित्रपट आहे असेच म्हणावे लागेल. चित्रपटाची कथा सरळ आणि साधी आहे. मोंटू अर्थात महेंदर (राजकुमार राव) हा एका शाळेत पीटीचा शिक्षक असतो. तो त्याच शाळेत शिकूनसवरून शिक्षक म्हणून तिथेच नोकरी करीत असतो. परंतु नोकरीकडे तो खूप गांभीर्याने पाहत नाही. त्याच दरम्यान, शाळेत एक नवीन शिक्षिका येते. नीलू (नुसरत भरूचा) असे तिचे नाव. ती संगणक शिक्षिका असते. तिला पाहताच मोंटू इम्प्रेस होतो. हळूहळू तिच्याशी मैत्री करायला सुरुवात करतो आणि त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होते. त्याच कालावधीत शाळेत सिंग (मोहम्मद झीशान अयूब) नावाचे आणखीन एक शिक्षक येतात आणि तेदेखील पीटीचेच शिक्षक असतात. मग शाळेच्या मुख्याध्यापिका मोंटूला त्या शिक्षकाचा असिस्टंट बनण्यास सांगतात. मोंटूला या गोष्टीचा राग येतो आणि सुरुवातीला तो नकार देतो. मग थोडा विचार केल्यानंतर तो होकार देतो. त्यानंतर कोणकोणत्या घडामोडी घडतात...मोंटू आणि नीलूचे प्रेम यशस्वी ठरते का...सिंग सर त्यामध्ये काही अडथळा ठरतात का...या सगळ्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राजकुमार राव हा सध्याचा स्टार कलाकार आहे आणि त्याने आपल्या कित्येक चित्रपटांद्वारे ते सिद्ध केले आहे. या चित्रपटातील मोंटूची भूमिकाही त्याने सहजरीत्या साकारली आहे. त्याला चांगली साथ दिली आहे अभिनेत्री नुसरत भरूचाने. दोघांची पडद्यावरील केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे. मोटू नीलूच्या प्रेमात पडतो आणि ते प्रेम मिळविण्यासाठी त्याने कधीही न केलेल्या गोष्टी त्याला कराव्या लागतात..दिग्दर्शक हंसल मेहता यांनी मोंटू आणि नीलू या दोन्ही व्यक्तिरेखा पडद्यावर छान रंगविल्या आहेत. राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांनीही दिग्दर्शकांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आहे. शिवाय मोहम्मद झीशान अयुब, सौरभ शुक्ला, सतीश कौशिक आदी कलाकारांनी चांगली साथ दिली आहे. त्यांनीही आपल्या भूमिकांमध्ये चांगले रंग भरलेले आहेत. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी मोंटू आणि नीलूचे हळहळू जुळणारे प्रेम, त्यातच अडथळा ठरणारे सिंग सर, सिंग सर आणि मोंटूमधील संघर्ष, विद्यार्थी आणि शिक्षकांमधील नाते... आदी बाबी पडद्यावर छान रेखाटल्या आहेत. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि संगीत छान आहे. मात्र, या चित्रपटाच्या पटकथेवर अधिक काम होणे आवश्यक होते. ते झाले असते, तर चित्रपट अधिक मजेशीर झाला असता. साहजिकच चित्रपट काही ठिकाणी रेंगाळल्यासारखा वाटतो आणि काही सीन्स अतार्किक आहेत असेच वाटते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तरीही सुरुवातीला आपल्या नोकरीकडे फारशा गांभीर्याने न पाहणारा एक शिक्षक नंतर किती गंभीरपणे नोकरीकडे पाहतो. आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील स्पर्धेला तोंड कसे देतो....अर्थात एका शिक्षकाचा हा प्रेरणादायी प्रवास आहे; तसेच आजच्या सोशल मीडियावर अधिक अॅक्टिव्ह असलेल्या मुलांना मैदानी खेळ किती महत्त्वाचे आहेत हेही सांगणारा एक हलकाफुलका आणि कौटुंबिक चित्रपट. 

मनोरंजन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chhalaang movie has been released on Amazon Prime