esakal | Oscars 2021: 'नोमाडलँड' दिग्दर्शिका क्लोई शाओने रचला इतिहास

बोलून बातमी शोधा

Chloe Zhao
Oscars 2021: 'नोमाडलँड' दिग्दर्शिका क्लोई शाओने रचला इतिहास
sakal_logo
By
स्वाती वेमूल

कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा ९३ व्या ऑस्कर सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात 'नोमाडलँड' या चित्रपटासाठी क्लोई शाओ हिने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिकेचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. शाओ ही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिकेचा ऑस्कर पटकावणारी पहिली आशियाई महिला ठरली आहे. त्याचप्रमाणे ऑस्करच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिकेचा पुरस्कार पटकावणारी शाओ ही दुसरी महिला ठरली आहे. याआधी २०१० मध्ये कॅथरिन बिंगेलो या पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.

"इतरांमधील चांगुलपणावर विश्वास"

ऑस्कर स्वीकारताना शाओ तिच्या भाषणात म्हणाली, "मी जगात ज्या ज्या ठिकाणी गेले, त्या त्या ठिकाणी मी नेहमीच लोकांमध्ये चांगुलपणा पाहिला. त्यामुळे आपल्यातील चांगुलपणावर विश्वास ठेवणाऱ्या आणि तो टिकवून ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी हा पुरस्कार मी समर्पित करते. कितीही कठीण परिस्थिती असली तरी एकमेकांमधील चांगला स्वभाव टिकवून ठेवणाऱ्यांना आणि मला सतत प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्यांना मी हा पुरस्कार समर्पित करते."

'नोमाडलँड'चा दबदबा

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'नोमाडलँड' या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळाला. या चित्रपटात एका विधवा महिलेची कथा दाखवण्यात आली आहे. जेसिका ब्रुडर यांच्या 'नोमाडलँड' या पुस्तकावर आधारित हा चित्रपटाची कथा आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकापेक्षा अधिक महिला दिग्दर्शिकांना नामांकन दिलं गेलंय. शाओ यांच्यासोबतच इमराल्ड फेनेल यांना 'प्रॉमिसिंग यंग वुमन'साठी नामांकन मिळालं होतं.

जगभरातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अनेक गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. यंदाच्या सोहळ्यात कोणाचंही निवेदन नाही आणि प्रेक्षकसुद्धा नाहीत. दरवर्षी हा सोहळा फेब्रुवारी महिन्यात होतो. पण कोरोना महामारीमुळे यंदा तो दोन महिने पुढे ढकलण्यात आला आहे.