Review : हास्याची भरपेट मेजवानी देणारा 'चोरीचा मामला'

संतोष भिंगार्डे
Friday, 31 January 2020

प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित 'चोरीचा मामला' हा चित्रपट म्हणजे तद्दन विनोदाची भरपूर पेरणी करणारा आणि हास्याची भरपेट मेजवानी देणारा आहे. असे चित्रपट पाहताना लॉजिकचा फारसा विचार करायचा नसतो. पडद्यावर जे काही घडत आहे त्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा.

मुंबई : प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित 'चोरीचा मामला' हा चित्रपट म्हणजे तद्दन विनोदाची भरपूर पेरणी करणारा आणि हास्याची भरपेट मेजवानी देणारा आहे. असे चित्रपट पाहताना लॉजिकचा फारसा विचार करायचा नसतो. पडद्यावर जे काही घडत आहे त्या मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्यायचा. या चित्रपटात जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, अनिकेत विश्‍वासराव आदी कलाकार काम करीत आहेत. चित्रपटाची कथा अगदी साधी व सरळ आहे. ही एका रात्रीमध्ये घडणारी कथा आहे आणि तितकीच ती खळखळून हसविणारी आहे. नंदन (जितेंद्र जोशी) हा आपली पत्नी आशा (कीर्ती पेंढारकर) आणि दोन मुलींसह राहात असतो. तो पेशाने चोर असतो. परंतु अत्यंत प्रामाणिक असा चोर. आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच तो चोरतो. 

Thappad Trailer : 'उसने मुझे मारा, पहली बार; नहीं मार सकता!'

एके दिवशी अमरजित पाटील (हेमंत ढोमे) यांच्या फार्म हाऊसवर तो चोरी करण्यासाठी जातो. अमरजित पाटील हा राजकारणी असतो. जेव्हा नंदन अमरजित पाटील यांच्या फार्म हाऊसवर चोरी करण्यास जातो आणि तेथे काही कारणास्तव अडकून पडतो. त्याच वेळी अमरजित आपली मैत्रीण श्रद्धा (अमृता खानविलकर) हिच्याबरोबर फार्म हाऊसवर येतो. श्रद्धाला स्वतःचा गाण्यांचा अल्बम काढायचा असतो. त्यामुळे ती अमरजितकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करते. परंतु फार्म हाऊसवर अन्य कुणी तरी व्यक्ती असल्याचा अमरजितला भास होतो आणि ती व्यक्ती असते नंदन. अशा वेळी अमरजितची पत्नी अंजली (क्षीती जोग) तेथे येते आणि काय गंमत उडते ती पडद्यावर पाहाच. 

दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवने या चित्रपटामध्ये विनोदाची पेरणी खूप चांगली केली आहे आणि त्याला कलाकारांनी आपल्या सकस अभिनयाने उत्तम साथ दिली आहे. चोरी करायला आलेला प्रामाणिक चोर आणि त्यानंतरच्या गमतीजमती दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवने खुमासदारपणे रंगविल्या आहेत. त्याला चांगल्या संवादांची साथ लाभली आहे. संपूर्ण चित्रपटात अधिक भाव खाऊन गेला आहे तो जितेंद्र जोशी. कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या जितेंद्रने या चित्रपटात सरळ-साध्या आणि भाबड्या अशा नंदनच्या व्यक्तिरेखेचे बेअरिंग उत्तम पेलले आहे. 

रिंकू म्हणते, हे नाइट लाइफ काय असतं ?

हेमंत ढोमेचा अमरजित पाटील सरस. त्याच्या डोळ्यांतील भाव आणि बारकावे पाहण्यासारखेच. अमृता खानविलकरचा ग्लॅमरस अंदाज आहे. चित्रपटातील संगीत छान. मात्र चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा संथ वाटतो. पण नंतर नंतर कथानक वेग घेते. तसेच यापूर्वी अशा कथानकांवरचे काही चित्रपट आलेले आहेत त्यामुळे पुढे काय होईल याचा अंदाज येतो खरा. परंतु दिग्दर्शकाने हे कथानक ज्या पद्धतीने मांडले आहे ते पाहताना नक्कीच मजा येते. एक खुसखुशीत आणि विनोदाची उत्तम फोडणी असलेला हा चित्रपट आहे. 
तीन स्टार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Choricha Mamla movie review