सिंटाचे त्यांच्या सदस्यांना मदतीचे आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

सिंटाचे त्यांच्या सदस्यांना मदतीचे आवाहन

मुंबई: कोरोनामुळे संपूर्ण जगाला मोठा फटका पडला आहे. परिस्थिती आणखीच गंभीर होत चालली आहे. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या चित्रपटसृष्टीतील कामगारांसाठी मदत करण्याकरीता 'सिने एंड टिव्ही आर्टिस्ट असोसिएशन'ने (सिंटा) भारतीय ट्रेड युनियन कायद्या अंतर्गत सिंटाच्या सदस्यांना आणि त्यातील ए-लिस्टर सदस्यांना रेशन आणि निधीची मदत करण्याचे आवाहन केले आहे. चित्रपट आणि टिव्ही कलाकरांचा या लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांना मदत करण्यासाठी सिंटाने त्यांच्या सदस्यांना आणि ए-लिस्टर्स सदस्यांना आवाहन केले आहे. सिंटाने त्यांच्या फंडातून चित्रपटसृष्टीतील कामगाराला मदत करण्यास सुरवात केली आहे. त्यांनी रेशनची पाकीटे बनवून त्याचे वाटप करण्यास सुरवात केली आहे. याशिवाय त्यांच्या फंडातून प्रत्येक कामगाराला प्रत्येकी 2000 रूपये भरपाई देखील दिली जात आहे. 

याबाबत सिंटाचे वरिष्ठ सह-सचिव आणि आऊटरिचचे अध्यक्ष अभिनेता अमित बेहल म्हणाले की, 'इतर संघटनांपेक्षा सिंटाकडे सध्या फारच कमी फंड आहे. म्हणूनच आम्ही आमच्या ए-लिस्टर्सना आवाहन केले आहे जेणेकरून आमच्याकडे मोठा फंड जमा होईल आणि आम्ही जास्तीत जास्त मदत करू शकू. आमच्या ए-लिस्टर्स सदस्यांना आम्ही केवळ निधीद्वारेच नव्हे तर रेशनचीही मदत करण्याचे आवाहन केले आहे.  आम्ही 'सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्ट'चा खाते क्रमांक आणि आयएफएससी नंबर प्रसारित केला आहे.' 
यावर सिंटाला चांगला प्रतिसाद मिळण्यास सुरवात झाली आहे. सिंटाचे ज्येष्ठ सदस्य आणि नामवंत कलाकार त्यांचे आवाहन करणारे व्हिडिओ शेअर करत आहेत. याशिवाय सिंटाने आय एंड बी मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारला प्रसारकांना य़ा संकटाच्या काळात पगार देण्याची विनंती देखील केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CINTAA appeals to its A listers to pitch in financial aid ration