लुसिफर, रफ्तारा अन्‌ कलापूरचा तनिष्क...!

लुसिफर, रफ्तारा अन्‌ कलापूरचा तनिष्क...!

रफ्तारा नाचे नाचे...डंकारा बाजे बाजे...
आगे आके आगे आके हा..
होऽऽऽ यारा....

‘लुसिफर’ या मल्याळम्‌ चित्रपटातले हे गाणे सध्या जगभरात धुमाकूळ घालतं आहे. सुपरस्टार मोहनलाल, पृथ्वीराज सुकुमारन, विवेक ओबेरॉय, मंजू वॉरियर, टोविनो थॉमस आदींच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने तिकीट खिडकीवर कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला. आयुष्यातील हा सर्वात मोठा टर्निंगपॉईंट असून, या यशाने हुरळून न जाता आता येत्या काळात आणखी बरेच काही नवे शिकायचे आहे आणि तितक्‍याच ताकदीने नवे काही उभं करायचं आहे...अवघ्या चोवीस वर्षांचा युवा गीतकार तनिष्क नाबर संवाद साधत असतो. ‘रफ्तारा’ त्यानंच लिहिले आहे. ‘यू ट्यूब’वर या गाण्याला साडेपाच दक्षलक्ष व्ह्यूव्ज्‌ मिळाले आहेत. तनिष्क मूळचा कोल्हापूरचा. राजारामपुरी परिसरातला त्याचा जन्म. त्याचं शिक्षण आणि त्यानंतरचं करिअर आता मुंबईतच सुरू असलं तरी ‘मुंबईत असलो तरी कलापूर कोल्हापूरनेच मला खऱ्या अर्थानं वाढवले’ असं आजही तो प्रांजळपणे सांगतो. लेखक, गीतकार, छायाचित्रकार आणि गायक म्हणूनही तो सर्वपरिचित आहे.

तनिष्क येथील मल्टिप्रिंट ॲडव्हर्टायझिंग परिवाराचा सदस्य. एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर संस्थेतून त्याचे शिक्षण झाले असले तरी तो आता रमला आहे तो जाहिरात क्षेत्रात. ‘लिओ बर्नेट इंडिया’मध्ये कॉपीरायटर म्हणून काम करत असताना तो विविध चित्रपटांसाठी गीतलेखनही करतो आहे. यापूर्वी ‘इश्‍कवाला लव्ह’ या मराठी चित्रपटासाठी त्याने ‘इश्‍क हो गया’ हे गीतही लिहिले. मात्र, ‘लुसिफर’च्या ‘रफ्तारा’नं त्याच्या करिअरची ‘रफ्तार’ आता एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. आजवरच्या इतिहासात मल्याळम्‌ चित्रपटात पहिल्यांदाच ‘रफ्तारा’ हे हिंदी गाणं असल्याचेही तो आवर्जून सांगतो. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनीही तनिष्कच्या गीतांची प्रशंसा केली आहे. ‘जेव्हा आपला आदर्श आपल्या कामाचं कौतुक करतो तेंव्हा त्या भावना आपण कुठल्याही शब्दात व्यक्त करू शकत नाही’, असे तो आवर्जून सांगतो. शंकर-एहसान-लॉय या सध्याच्या आघाडीच्या संगीत दिग्दर्शकांबरोबर एका वेब सिरीजसाठीही त्यानं काम केलं आहे.

मुंबईत असलो तरी जन्माने आणि मनानं कोल्हापूरचाच आहे. त्यामुळं वर्षातून किमान पाच ते सहा वेळा कोल्हापुरात हमखास येतो. मुंबईपेक्षाही कोल्हापुरात माझा मित्रांचा गोतावळा मोठा आहे. या साऱ्या गोतावळ्याच्या शुभेच्छांच्या बळावरच आजवरची वाटचाल सुरू आहे.

- तनिष्क नाबर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com