
सलमान खान आणि त्याची ‘दबंग’ मालिका त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. या मालिकेतील तिसरा चित्रपट ‘दबंग ३’ पुन्हा एकदा (केवळ) त्याच्याच चाहत्यांना खूष करण्यात यशस्वी ठरतो.
सलमान खान आणि त्याची ‘दबंग’ मालिका त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. या मालिकेतील तिसरा चित्रपट ‘दबंग ३’ पुन्हा एकदा (केवळ) त्याच्याच चाहत्यांना खूष करण्यात यशस्वी ठरतो. तेच ते कथानक, नावीन्याचा पूर्ण अभाव, प्रत्येक तुफान हाणामारीनंतर एका गाण्याचा डोस, सर्व प्रकारच्या मसाल्याचा अतिरेक यांमुळं हा मोठी लांबी असलेला चित्रपट मनोरंजन करतो, मात्र लक्षात राहत नाही.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
चुलबुल पांडे (सलमान खान) आता पोलिस खात्यात स्थिरावला आहे आणि गुंडांचा कर्दनकाळही ठरतो आहे. आपली पत्नी रज्जोबरोबर (सोनाक्षी सिन्हा) त्याचा संसारही सुखात सुरू आहे. गुन्हेगारीच्या अशाच एका प्रकरणात तो मुलींची तस्करी करणाऱ्या गॅंगला पकडतो आणि त्याच्या मुळापर्यंत जाताना त्याला शोध लागतो बली सिंग (सुदीप) या गुंडांचा. कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते. रज्जोला भेटण्याआधी चुलबुलच्या आयुष्यात खुशी (सई मांजरेकर) ही तरुणी आलेली असते. तिला मेडिकलचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी चुलबुल मदत करतो. मात्र बली तिला रस्त्यात पाहतो आणि तिच्या प्रेमात पडतो. खुशी आणि चुलबुलचं प्रेमप्रकरण समजताच तो भयंकर निर्णय घेतो आणि चुलबुलचं आयुष्य बदलून जातं. बली पुन्हा सामोरा आल्यानंतर चुलबुल त्याच्यामागं हात धुऊन लागतो. रज्जो त्याला आततायी निर्णय घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते, मात्र घटना अशा घडतात, की चुलबुलला बलीवर निर्णायक हल्ला करावाच लागतो.
‘दंबग’ मालिकांतील चित्रपटांच्या कथांत आता फारसं नावीन्य उरलेलं नाही. पोलिस आणि गुंडाचा सामना, चुलबुलच्या भावाचं घरभेदी वागणं, रज्जो आणि चुलबुलचे प्रेमाचे आणि तुफान संवाद असलेले विनोदी प्रसंग आणि शेवटी चुलबुलची शर्ट काढून केलेली तुफान हाणामारी आणि खलनायकचा खातमा हा फॉर्म्युला प्रेक्षकांच्या परिचयाचा झाला आहे. या कथेतही फ्लॅशबॅकमुळं थोडी उत्सुकता निर्माण होते, मात्र कथा काही वेळात मूळ पदावर येते. अनेक अनाकलनीय प्रसंग आणि त्यात चुलबुलची मर्दुमकी हा प्रकार आता पाहवत नाही. एका बुक्कीत उडून पडणारे गुंड आणि असे प्रसंग संपताच एक अतरंगी स्टेप्स असलेल्या गाण्याचा डोस हा प्रकार दळणासारखा एकामागून येत राहतो. अशा कथांचा शेवटी माहिती असल्यानं प्रेक्षक केवळ समोर दिसणाऱ्या गोष्टी डोळ्यानं पाहत आणि एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं बाहेर सोडत राहतो.
सलमान खान चुलबुलची भूमिका नेहमीच्या तोऱ्यात साकारतो. एन्ट्रीपासून ‘स्वागत तो नहीं करोगे हमारा,’ म्हणत तो टाळ्या घेत राहतो. हुड हुड दबंगच्या तालावर गुडांना कुटत राहतो. गाण्यांमध्येही त्याच्या स्टेप्स छान मनोरंजन करतात. विनोदी प्रसंगांतील त्याचं टायमिंगही जबरदस्त. सोनाक्षी सिन्हाला या वेळी फारशी संधी नाही आणि तिनं मागील मालिकांतील टोन पकडत अगदी तसाच अभिनय केला आहे. सई मांजरेकर चित्रपटातील सरप्राइज पॅकेज ठरली आहे. खुशीच्या भूमिकेत तिनं छान रंग भरले आहेत. तिचा निरागसपणा आणि संकटात सापडल्यावरची अगतिकता तिनं छान टिपली आहे. महेश मांजरेकर यांची ही कन्या हिंदी चित्रपटात आपला ठसा उमटवणार, असंच तिचा अभिनय सांगून जातो. सुदीपनं बलीच्या भूमिकेत निष्ठुरपणाच्या अनेक छटा दाखवल्या आहेत. संगीत श्रवणीय असलं, तरी सारखी येणारी गाणी रसभंगच करतात.
एकंदरीतच, दबंग मालिकेचा हा भाग सलमानच्या चाहत्यांना खूष करणारा असला, तरी इतरांना अजीर्ण होण्याचीच शक्यता अधिक.