esakal | 'डॅडी' होणार आजोबा; योगिता गवळीचं थाटामाटात डोहाळे जेवण

बोलून बातमी शोधा

yogita gawli}

कुणीतरी येणार गं!

'डॅडी' होणार आजोबा; योगिता गवळीचं थाटामाटात डोहाळे जेवण
sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

गँगस्टर अरुण गवळीचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. मुंबईच्या दगडी चाळीतील डॅडी म्हणून ते ओळखले जातात. अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी ही गरोदर असून तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच थाटामाटात पार पडला. योगिताने अभिनेता अक्षय वाघमारेशी लग्न केलं असून अक्षयने सोशल मीडियावर या डोहाळे जेवणाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. अक्षयने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत योगिता गरोदर असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली होती. योगिता व अक्षयवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लॉकडाउनदरम्यान या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. 

'पाहुणा घरी येणार येणार गं', असं कॅप्शन देत अक्षयने योगिताचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत योगिताच्या चेहऱ्यावरचा आनंद सहज पाहायला मिळतोय. 'आयुष्याचा एक नवीन प्रवास लवकरच सुरू करतोय. नव्या पाहुण्याच्या आगमनाची वाट पाहतोय', असं म्हणत अक्षयने योगिता गरोदर असल्याचं सांगितलं होतं. 

अक्षय-योगिताची लव्हस्टोरी
अक्षय आणि योगिता हे लग्नाच्या आधी पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. अक्षयने 'बेधडक', 'दोस्तीगिरी' यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याची 'फत्तेशिकस्त' या चित्रपटातील भूमिका विशेष गाजली होती. तर योगिता एका सामाजिक संस्थेसाठी काम करते. योगिताने काही मराठी चित्रपटांची निर्मितीदेखील केली आहे. याचदरम्यान या दोघांची ओळख झाली आणि हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. 

लॉकडाउनमध्ये पार पडलं लग्न
अक्षय आणि योगिता २९ मार्च २०२० रोजी लग्नगाठ बांधणार होते. मात्र कोरोना महामारी आणि अचानक जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे त्यांना लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली होती. नंतर मे महिन्यात लॉकडाउनचे नियम थोडे शिथिल झाल्यानंतर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत, सर्व नियम पाळत मुंबईतल्या दगडी चाळीत यांचा विवाहसोहळा पार पडला.