Chhapaak movie review : मन हेलवणारी कथा आणि दीपिकाचा पावरफूल अभिनय !

संतोष भिंगार्डे
गुरुवार, 9 जानेवारी 2020

वास्तववादी विषय तसेच सामाजिक मुद्दे आपल्या चित्रपटात हाताळणारी धीरगंभीर आणि संवेदनशील दिग्दर्शिका म्हणजे मेघना गुलजार. तिच्या प्रत्येक चित्रपटागणिक ती एकेक पायरी पुढे टाकीत असल्याचे दिसते. आता तिने "छपाक' हा चित्रपट आणलेला आहे.

वास्तववादी विषय तसेच सामाजिक मुद्दे आपल्या चित्रपटात हाताळणारी धीरगंभीर आणि संवेदनशील दिग्दर्शिका म्हणजे मेघना गुलजार. तिच्या प्रत्येक चित्रपटागणिक ती एकेक पायरी पुढे टाकीत असल्याचे दिसते. आता तिने "छपाक' हा चित्रपट आणलेला आहे. दिल्लीतील ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या लक्ष्मी अग्रवाल हिची संवेदनशील आणि तितकीच मन हेलावणारी ही कथा आहे. मालती (दीपिका पदुकोण) ही सर्वसामान्य कुटुंबातील तरुणी. आई-वडील आणि भावाबरोबर ती राहात असते. तिची घरची परिस्थिती तशी जेमतेम असते. ती एका गर्ल स्कूलमध्ये शिकत असते. तेथेच बाजूला असलेल्या बॉईज स्कूलमध्ये राजेश (अंकित बिश्‍त) नावाचा तरुण शिकत असतो. मालती आणि राजेश एकमेकांचे चांगले मित्र असतात. त्याच वेळी तेथेच राहणारा व टेलरिंगचे काम करणारा बशीर खान हा मालतीवर मनोमनी प्रेम करू लागतो. एके दिवशी राजेश व मालतीला एकत्र येताना पाहतो आणि तो प्रचंड चिडतो.

त्यातूनच मालतीवर ऍसिड हल्ला होतो. त्यानंतर मालतीचे संपूर्ण जीवनच पालटून जाते. खरे तर तिला मोठी झाल्यानंतर सिंगर बनावे असे तिचे स्वप्न असते. परंतु तिचे स्वप्न हे स्वप्नच राहते. ऍसिड हल्ल्यानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. 
तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया केली जाते. आपला चेहरा आरशात पाहिल्यानंतर तिला मोठा धक्का बसतो. मग तिला न्याय मिळवून देण्यासाठी वकील अर्चना (मधुजित सारगी) पुढे सरसावते. मालतीला न्याय मिळावा...गुन्हेगाराला कडक शासन व्हावे...ऍसिड विक्रीवर बंदी आणावी याकरिता तिचा वकील आणि ती न्यायालयीन लढाईला सुरुवात करतात. दरम्यान मालती नोकरीच्या शोधात फिरत असते. परंतु तिला सगळीकडून नकार पत्करावा लागतो. ऍसिड हल्ल्यातून वाचलेल्यांसाठी काम करणाऱ्या एका एनजीओमध्ये तिला काम मिळते. तेथे तिची ओळख अमोल (विक्रांत मेस्सी) याच्याशी होते. नोकरी करीत असतानाच कोर्टाच्या तारखा, आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेले आई-वडील या सगळ्यामध्ये तिची स्थिती दोलायमान होते.

तिला खूप संघर्ष करावा लागतो आणि पुढे सरतेशेवटी काय होते ते पडद्यावर पाहिलेले बरे. सर्वसामान्य कुटुंबातील तरुणी, ऍसिड हल्ल्यानंतरच्या तिच्या व्यथा-वेदना. तिची न्यायालयीन लढाई, घरची आर्थिक खालावलेली परिस्थिती यामध्ये तिची झालेली दोलायमान स्थिती या सगळ्या गोष्टी मनाला खूपच भिडतात आणि विचारही करायला लावतात. दिग्दर्शिका मेघना गुलजारने ही सत्य घटना पडद्यावर मंडताना आपल्या न्यायव्यवस्थेलाही प्रश्‍न केला आहे. दीपिका पदुकोनने मालतीची व्यक्तिरेखा समरसून केली आहे. "उसने मेरी सूरत बदली है...मेरा मन नही' या मालतीच्या संवादामध्येच आत्मविश्‍वास जाणवतो.

एकूणच मालतीच्या भूमिकेला दीपिकाने पूरेपूर न्याय दिला आहे. विक्रांत मेस्सीदेखील अमोलच्या भूमिकेत भाव खाऊन गेला आहे. शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत आहे. चित्रपटाच्या शीर्षक गीतामध्ये चित्रपटाचे सार आहे. चित्रपटाच्या पूर्वार्ध संथ आहे. काही वेळा चित्रपट फारसा पुढे सरकत नाही. मात्र उत्तरार्धात चित्रपट वेग घेतो. एकूणच एका तरुणीचा हा संघर्ष लक्षवेधक आहे. या चित्रपटानंतर तरी सरकारला जाग येईल आणि ऍसिड विक्रीवर निर्बंध घातले जातील अशी आशा करुया. 

तीन स्टार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deepika padukones Chhapaak movie review