पडद्यावरील ‘अंधार’ दूर व्हावा...

धनंजय बिजले
Monday, 12 October 2020

बार, मॉल्स हे सुरू होत असताना या क्षेत्रावर अवलंबून असलेल्यांचा आणि मनोरंजनासाठी आसुसलेल्यांचाही विचार करणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग न होताही काय करता येईल याचा विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे.

देशात चित्रपटगृहे सुरू होत असताना महाराष्ट्रात मात्र अजून ती सुरू होण्याची चिन्हे नाहीत. ही चित्रपटगृहे हळूहळू कमी क्षमतेने का होईना सुरू होणे गरजेचे आहे. बार, मॉल्स हे सुरू होत असताना या क्षेत्रावर अवलंबून असलेल्यांचा आणि मनोरंजनासाठी आसुसलेल्यांचाही विचार करणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग न होताही काय करता येईल याचा विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे.

लॉकडाउननंतर शहर आता बऱ्यापैकी पूर्वपदावर येऊ लागले आहे. दुकाने, हॉटेल, मॉल्स सुरू झाल्याने शहराचे अर्थकारण गती पकडू लागले आहे. मात्र, कोरोनाच्या कचाट्यातून अजूनही चित्रपटगृहे सुटलेली नाहीत. केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून देशातील चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे; पण महाराष्ट्र सरकारने अद्याप हिरवा कंदील न दिल्याने चित्रपटगृहचालकांवरील टांगती तलवार कायम आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मल्टिप्लेक्‍स कल्चरला खीळ 
पुण्याचा विचार करता शहराला चित्रपटगृहांची समृद्ध परंपरा आहे. काळानुरूप या व्यवसायाने वेगाने कात टाकली. बदलत्या प्रवाहाची नस पकडून चित्रपटगृहचालकांनी आपल्यात वेगाने बदल घडवले. त्यामुळे गेल्या काही वर्षांत शहरात एकपडदा चित्रपटगृहांची संख्या झपाट्याने कमी झाली आणि त्याची जागा मल्टिप्लेक्‍सनी घेतली. आजच्या घडीला पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये २६ मल्टिप्लेक्‍स असून, दहा सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे आहेत. देशातील मल्टिप्लेक्‍सच्या साखळीतील पीव्हीआर, सिनेपोलिस, आयनॉक्‍स; तसेच सिटीप्राईड अशी चांगली मल्टिप्लेक्‍स पुण्यात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका मल्टिप्लेक्‍समध्ये किमान चार तरी स्क्रीन असतात. त्यामुळे एकाचवेळी शहरात शंभर ते सव्वाशे स्क्रीनवर चित्रपट झळकत असतो. राज्याचा विचार करता मल्टिप्लेक्‍सचे जवळपास चार हजार स्क्रीन्स आहेत, तर सिंगल स्क्रीनची संख्या साडेचारशेच्या आसपास आहे. ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मच्या जमान्यातही मल्टिप्लेक्‍सला पुणेकरांनी कायम भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळेच पुण्यात कळत नकळत मल्टिप्लेक्‍स कल्चर वेगाने रूजले व वाढले. मात्र, कोरोनाचे सावट जसजसे गडद होऊ लागले, तसे चित्रपटगृहे बंद झाली आणि शहरातील मल्टिप्लेक्‍स कल्चरला खीळ बसली. 

आर्थिक घडी सावरणे कठीण 
एकाचवेळी किमान दोनशे ते तीनशे लोक एकाच ठिकाणी, बंदिस्त जागेत त्यातही ‘एसी’मध्ये एकत्र बसणे हे कोरोनासाठी आमंत्रणच. त्यामुळे सरकारला मार्चमध्ये ती बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. महाराष्ट्रात मुंबई व पुण्यात सर्वाधिक मल्टिप्लेक्‍स आहेत आणि याच शहरात कोरोनाही वेगाने वाढला. त्यामुळे सरकारचा निर्णय योग्यच होता. मात्र, या काळात या व्यवसायाचे आर्थिक कंबरडेच मोडले. मल्टिप्लेक्‍स; तसेच सिंगल स्क्रीनला मोठा फटका बसला. देशातील चित्रपटगृहांचा विचार करता अंदाजे नऊ हजार कोटी, तर राज्यातील अंदाजे तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे मानले जाते. यात मुंबई, पुण्याचा वाटा मोठा आहे. एकूणच ही बिघडलेली आर्थिक घडी सावरणे कठीण आहे. सिंगल स्क्रीनची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. आता तर ही संख्या अधिक घटणार आहे; शिवाय काही सिंगल स्क्रीन पुन्हा उभी राहतील की नाही, अशी शंका आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता वेगळा विचार व्हावा 
गेले सात महिने चित्रपटगृहे बंद आहेत. मात्र, आता ती सुरू करण्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. केवळ चित्रपटगृहांसाठीच नव्हे, तर संपूर्ण चित्रपट उद्योगासाठी ते आवश्‍यक आहे. राज्याला मोठा महसूल मिळवून देणारा हा उद्योग आहे. अर्थात, तो सुरू करण्याआधी पुरेशी काळजी घेणे सहज शक्‍य आहे. चित्रपटगृहांत एक किंवा दोन सीट सोडून प्रेक्षकांना बसू दिले, तर सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल. मास्क बंधनकारक करता येईल. त्याचप्रमाणे टेंपरेचर गन, सॅनिटायझरचा वापर करून पुरेशी खबरदारीही घेता येईल. प्रश्‍न आहे तो एसीचा. कारण बंदिस्त जागेत वातानुकुलित यंत्रणा सुरू राहिल्याने प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो. तो आजही कायम आहे. त्यामुळे एसीला पर्याय शोधून चित्रपटगृहे सुरू करण्याची गरज आहे. 

अर्थात यावर विविध मतप्रवाह आहेत. पुण्यातील सिटीप्राईडचे अरविंद चाफळकर म्हणाले, ‘‘दिवाळीच्या आसपास नवे सिनेमे रिलीज होतील. सध्या घरात बसून लोक कंटाळले आहेत, शिवाय ‘ओटीटी’ हा पर्याय होऊ शकत नाही. तेथे सेन्सॉर नसल्याने कोणतीही बंधने नसतात. त्यामुळेच ओटीटीवर रिलीज झालेल्या चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपटगृहे लगेच सुरू झाली, तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळण्यास, तसेच हा व्यवसाय रुळावर येण्यास दोन ते तीन महिने नक्कीच लागतील.’’ 
दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी म्हणाले, ‘‘सध्याच्या स्थितीत सरकारचा निर्णय योग्यच आहे. कारण नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य हवे. सुरक्षिततेबाबत मनात शंका असेल, तर प्रेक्षकही येणार नाहीत. माणसांना आउटडोअरचे आकर्षण असते. त्यामुळे काही काळाने चित्रपटगृहे सुरू झाली, तरी त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. शिवाय चित्रपट जर समाजाची गरज असेल, तर समाजानेच तो टिकवण्यासाठी हातभार लावला पाहिजे आणि ते लावतीलही.’’ 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रेक्षकांचीही मोठी गरज 
थिएटर्स सुरू होणे ही रसिकांचीदेखील गरज आहे. माणसाला मानसिक विरंगुळाही अत्यावश्‍यक असतो. कोरोनामुळे आधीच आजूबाजूला निराशेचे मळभ दाटले आहे. अशा नकारात्मक वातावरणात सातत्याने घरात राहणेही मानसिक स्वास्थासाठी योग्य नाही. उलट याच काळात त्याला रिक्रिएशनची नितांत गरज आहे. याचाही विचार व्हायला हवा. शिवाय चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहणे ही एक मानसिक सवय असते. एकदा का त्यात मोठा खंड पडला, की ती सवयच मोडण्याची भीती असते. त्यामुळे बराच काळ चित्रपटगृहे बंद राहणे कोणालाच परवडणारे नाही. चित्रपटगृहे सुरू करावीत की नाही याबाबत मतमतांतरे असू शकतात; पण चित्रपटगृहात उजेड चालत नाही आणि पडद्यावर अंधार. पडद्यावरील हा अंधार फार काळ चालू ठेवणे योग्य नाही. तो जितक्‍या लवकर दूर करता येईल तितके योग्य ठरणार आहे.

हा विचार आवश्यक
- भारतभरात चित्रपटगृहे सुरू होणार असतील, तर महाराष्ट्रात का नाही?
- लोकांची चित्रपट बघण्याची सवयच मोडली, तर हा व्यवसायच मोडकळीला येण्याचा धोका.
- बार, मॉल्स यांना दिलेला न्याय चित्रपटगृहांना का नाही?
- चीन, अमेरिकासारख्या देशांमध्ये चित्रपटगृहे सुरू झाल्याचे लक्षात घेणे आवश्यक.

असे करता येईल...
चित्रपटगृहे किमान तीस टक्के क्षमतेने हळूहळू सुरू व्हावीत. 
प्रेक्षकांनी मास्क घालणे अत्यावश्यक
सोशल डिस्टन्सिंगसाठी एक किंवा दोन खुर्च्या सोडून बसणे आवश्यक.
प्रत्येक खेळ झाल्यावर निर्जंतुकीकरण आवश्यक.
अन्नपदार्थ खाण्यास मज्जाव हवा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhananjay bijale writes article about theaters is starting to be even less capacity