
Sulochana didi: घड्याळ जपून ठेवलंय पण आता त्यातली वेळ थांबली.. दिग्दर्शक महेश टिळेकर यांची भावूक पोस्ट..
Sulochana didi passed away: अवघ्या मनोरंजन विश्वाच्या सुलोचना दीदी.. म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.
त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज कलाकारांनी शोक व्यक्त केल्या आहेत. सोशल मिडियावर देशील अनेकजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अशातच दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी दीदींच्या आठवणीत एक पोस्ट शेयर केली आहे. सुलोचना दिदींचा सहवास, त्यांचे प्रेम.. याविषयी त्यांनी भरभरून लिहिलं आहे.
(director mahesh tilekar shared emotional post for veteran actress Sulochana latkar)
महेश टिळेकर लिहितात की, 'दरवर्षी न चुकता पाच जूनला माझ्या वाढदिवसा दिवशी शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी येणारा सुलोचना दिदिंचा फोन कॉल आता कधीच येणार नाही ही भावनाच मनाला खोलवर दुःख देणारी आहे.अगदी न चुकता 5 जूनला दुपारच्या वेळेत सुलोचना दीदींच्या येणाऱ्या कॉल मध्ये कधीच खंड पडला नाही.'
'त्यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त माझ्या मराठी तारका टीम बरोबर दीदींच्या घरी जाऊन त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला होता.. वार्धक्यामुळे त्यांच्या शरीराच्या हालचाली जरी मंदावल्या होत्या तरी त्यांचा आवाज खणखणीत होता आणि जुन्या गोष्टी त्यांना सगळ्या आठवत होत्या.'
'अधून मधून त्यांची मी सदिच्छा भेट घ्यायचो आशिर्वादासाठी वाकून नमस्कार केल्यावर मायेने डोक्यावरून फिरणारा तो हात, त्या हाताचा स्पर्श आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करताना बळ देणारा असायचा.'
पुढे महेश टिळेकर लिहितात की, 'चित्रपटसष्टीतील माझ्या शून्यापासून सुरू झालेल्या प्रवासाच्या सुलोचना दीदी एक साक्षीदार होत्या.मराठी तारका कार्यक्रमाच्या पहिल्या शो ला , मराठी तारका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला, माझ्या वन रूम किचन सिनेमाच्या प्रीमियर शो ला ही दीदी आशीर्वाद द्यायला उपस्थित होत्या.'
'सिनेमातून अभिनय करणे त्यांनी बंद केलं होतं तरी माझ्या आग्रहा खातर 2010 मध्ये माझ्या ' लाडी गोडी ' या सिनेमातून त्यांनी पुनरागमन केलं. यात गेस्ट ॲपीरन्स म्हणून भरत जाधवच्या आईची भूमिका केली होती हा त्याचा अखेरचा चित्रपट.'
'टिव्हीवर माझा एखादा कार्यक्रम ,चित्रपट त्यांनी पाहिला की त्या हमखास फोन करायच्या. 2007 मध्ये मराठी तारका हा माझा कार्यक्रम पाहून त्यांनी मला एक भारीतलं घड्याळ भेट म्हणून दिले होते.तेंव्हा फोन करून मी त्यांना सांगितलं " दीदी मी हातात घड्याळ घालतच नाही, तुम्ही कश्याला उगाच खर्च केला"
'त्यावर.. तुम्ही बाहेर कुठं गेलात की प्रेमाने माझ्यासाठी साडी आणता मग माझाही हक्क आहे तुम्हाला भेट द्यायचा असे आपलेपणाने त्यांनी सांगितल्यावर मी एक मौल्यवान नजराणा म्हणून ते घड्याळ जपून ठेवलं आहे पण आता त्यातील वेळ थांबली आहे..'' अशी भावनिक पोस्ट महेश टिळेकर यांनी लिहिली आहे.