
Sanjay Jadhav: आप्पा अंथरूणात आणि 'दुनियादारी'तला 'तो' सिन.. वडिलांच्या आजारपणाबाबत सांगताना संजय जाधव गहिवरले..
sanjay jadhav : 'तमाशा live', 'तु ही रे', 'दुनियादारी' असे कितीतरी दर्जेदार चित्रपट देणारे दिग्दर्शक संजय जाधव हे मराठी चित्रपटसृष्टीमधील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व. संजय जाधव यांनी आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. लवकरच त्यांचा ‘दुनियादारी २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण आज संजय जाधव यांनी आपल्या आयुष्यातील एक दुःखद अनुभव एका मुलाखतीत सांगितला आहे.
नुकत्याच देलेल्या एका मुलाखतीमध्ये संजय जाधव यांनी आपल्या वडिलांच्या आजारापणाविषयी सांगितलं आहे. अत्यंत काळीज पिळवटून टाकणारा हा अनुभव आहे. यावेळी संजय म्हणाले, ''माझे वडील माझ्यासाठी हिरो होते. मी त्यांना आप्पा म्हणायचो. ते सेवानिवृत्ती होते. ते मला एक दिवस म्हणाले की, त्यांचा हाताचा अंगठा हालत नाही. मलाही बरेच दिवस वेळ नव्हता.''
''पण एक दिवस अमेय खोपकरने मला हिंदुजा रुग्णालयामध्ये डॉक्टरची अपॉईमेंट मिळवून दिली. मी तिथे आप्पांना घेऊन गेलो. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना नेमकं काय होतंय हे विचारलं. आम्ही एकत्रच होतो. डॉक्टरांनी विचारपूस केल्यानंतर बाहेर जाऊन जरा आमचं रुग्णालय बघा कसं आहे असं आप्पांना सांगितलं.''
''आप्पा बाहेर गेल्यानंतर डॉक्टर मला म्हणाले फक्त दीड वर्ष. मला कळेना नेमका याचा अर्थ काय? डॉक्टरांनी मला सांगितलं त्यांना एक आजार आहे. यामध्ये त्यांच्या शरीराचा एक एक अवयव निकामी होत जाईल. फक्त शेवटी फुफ्फुसं राहतील. पुढेच सहा ते सात तास मला कोणत्याच गोष्टीचा अर्थ लागत नव्हता.''
''प्रत्येक दिवशी माझ्या वडिलांचे अवयव निकामी होताना मी पाहिले. यानंतर माझं चित्रीकरणही रद्द होऊ लागलं. सहा ते सात महिने माझं चित्रीकरण बंद राहिलं. यादरम्यान मी फक्त घरातच राहिलो. वडिलांबरोबर एकत्र वेळ घालवू लागलो. आप्पांना विस्की प्यायला खूप आवडायची. मग आईपासून लपवत मी आप्पांबरोबर बसायचो.''
''त्याचदरम्यान ‘दुनियादारी’ चित्रपटाचं काम सुरू झालं. या चित्रपटाचं कामंही माझ्या घरी सुरू होतं. आप्पा एका रुममध्ये असायचे. ‘दुनियादारी’चं चित्रीकरण पुण्याला सुरू झालं. मीही पुण्यातच होते. तेव्हा आप्पा अंथरुणाला खिळले होते. एक दिवस ते प्रमिताला म्हणाले, मला ना जायचं आहे पण त्याचं चित्रीकरण पूर्ण होऊदे मग जातो. प्रमिताने आप्पांचं हे बोलणं मला सांगितल्यावर मला कळेना काय बोलावं. एक दिवस फोन आलाच.''
''त्यादिवशी योगायोगही असा होती की, ‘दुनियादारी’मधील एक सीन मी चित्रित करत होतो. तो सीन असा होता की श्रेयस हे पात्र अंथरुणाशी खिळलेल्या त्याच्या वडिलांना रुग्णालयामध्ये बघण्यासाठी जातो. हा सीन शूट केल्यानंतर मी आप्पांना भेटायला आलो. आप्पा रुग्णालयामध्ये होते.''
''दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा मी रुग्णालयामध्ये गेलो. त्यांनी माझ्याकडे बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव मला हे सांगत होते की, अरे वा, आलास तू. म्हणजे चित्रीकरण संपलं. त्यांनी मला बघितल्यानंतर जीव सोडला. मी दुनियादारीच्या यशाचं श्रेयही आप्पांनाच देतो.” असं संजय जाधव म्हणाले. हा भावनिक प्रसंग सर्वांनाच चटका लावून गेला.