दिल, दोस्ती : समजूतदार, सन्मित्र!

दिग्दर्शक विजय केंकरे आणि अभिनेते डॉ. गिरीश ओक हे दोघं खूप जुने मित्र. त्यांची ओळख १९८५पासूनची आहे.
dr girish oak and vijay kenkare
dr girish oak and vijay kenkaresakal
Summary

दिग्दर्शक विजय केंकरे आणि अभिनेते डॉ. गिरीश ओक हे दोघं खूप जुने मित्र. त्यांची ओळख १९८५पासूनची आहे.

- डॉ. गिरीश ओक, विजय केंकरे

दिग्दर्शक विजय केंकरे आणि अभिनेते डॉ. गिरीश ओक हे दोघं खूप जुने मित्र. त्यांची ओळख १९८५ पासूनची आहे. विजय केंकरे यांचं लौकिकार्थानं पहिलं व्यावसायिक नाटक ‘ससा आणि कासव’. यात गिरीश ओक यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतरही त्यांनी काही नाटकं एकत्र केली. आता दिग्दर्शक आणि अभिनेत्याच्या या जोडीची ‘३८ कृष्ण व्हिला’ आणि ‘काळी राणी’ ही दोन नाटकं रंगभूमीवर सुरू आहेत. त्यातील ‘काळी राणी’ हे विजय केंकरे यांचं शंभरावं नाटक आहे.

डॉ. ओक म्हणाले, ‘विजयचा स्वभाव खूपच चांगला आहे. इतक्या वर्षांमध्ये मी त्याला कधीही रागावलेलं, रुसलेलं किंवा चिडलेलंही पाहिलेलं नाही. तो सगळ्यांमध्ये खूप पटकन मिसळून जातो. त्याचा शांत राहण्याचा स्वभाव मला आत्मसात करायला आवडेल. त्याचं एका शब्दात वर्णन करायचं झाल्यास ‘सन्मित्र’ हाच शब्द योग्य ठरेल. तो दिग्दर्शक म्हणूनही तितकाच चांगला आहे. कलाकाराला त्याच्याइतकं स्वातंत्र्य देणारा दिग्दर्शक मी आत्तापर्यंत पाहिलेला नाही. तो कधीही त्याला काय हवंय हे नटाला करून दाखवत नाही. त्याला काय हवंय हे तो सांगतो, तसंच त्याला काय नकोय हेही तो सांगतो. त्यानं जगभरातली विविध प्रकारची नाटकं पाहिलेली, वाचलेली आहेत. बोलताना किंवा काहीही समजवताना त्याला कधी संदर्भ देण्याची वेळ आल्यास फक्त मराठीच नाही तर गुजराती, हिंदी, परदेशी साहित्यातले, कवितेतले, संगीत नाटकातले संदर्भ मला सांगतो. त्यामुळं तो माझ्यासाठी बहुश्रुत व्यक्ती आहे.’

विजय केंकरे यांनी सांगितलं, ‘आयुष्यात प्रत्येक गोष्टीत समतोल साधणारी मला आतापर्यंत जितकी माणसं भेटली त्यातलाच एक गिरीश आहे. तो कधीही टोकाची भूमिका घेत नाही. तो समरस होऊन काम करतो. तसंच तो खूप समजूतदार आहे. त्याला कलेची आणि साहित्याची उत्तम जाण आहे. त्याची प्रत्येक भूमिका ही वेगवेगळ्या शैलीची असते. त्याची आणखीन एक खासियत म्हणजे त्याचा हात लिहिता आहे. तो सतत नवीन काहीतरी लिहीत असतो. त्यामुळेच तो खूप संवेदनशील आहे. कलाकार म्हणून त्याच्याकडं अस्वस्थता हा आणखी एक गुण आहे. काम करताना तो सतत नव्या गोष्टींचा शोध घेत असतो आणि त्यामुळे तो अस्वस्थ असतो. त्याचप्रमाणे त्याला त्याच्या मर्यादांची जाणीव आहे आणि तो त्यावर मात कशी करायची हेही त्याला माहितेय. म्हणूनच तो उत्कृष्ट काम करू शकतो. त्याने खऱ्या अर्थानं कलाक्षेत्र हे व्यवसाय म्हणून निवडलं आहे. व्यावसायिकता हा त्याचा स्थायीभाव आहे. आम्ही आतापर्यंत अंतराअंतरानं काम केलं आहे. आधी त्यानंतर जास्त होतं तर कधी कमी होतं. मात्र, गिरीश मला भेटल्यावर बऱ्याच दिवसात आमचं बोलणं किंवा भेट झाली नाही हे आम्हाला जाणवतही नाही.’

त्यांच्या ‘काळी राणी’ या नाटकाबद्दल बोलताना विजय केंकरे म्हणाले, ‘‘माझी शंभर नाटकं कशी झाली हे मला कळलंच नाही. मी शंभरावं नाटक करतोय हेही मला अपघातानेच कळलं. त्यातून ‘काळी राणी’ सारखं नाटक हे आपलं शंभरावं नाटक असावं हा एक योगायोग होता. कारण रत्नाकर मतकरी यांचं मी दिग्दर्शित केलेलं हे दहावं नाटक आहे, त्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद आहे.’’ या नाटकाबद्दल गिरीश ओक म्हणाले, ‘ही भूमिका अतिशय तामसी आहे. त्याच्या वेशभूषेपासून देहबोली, भाषा सगळंच खूप वेगळं आहे. दुसरीकडं विजय केंकरे दिग्दर्शित ‘३८ कृष्ण व्हिला’ हे माझं नाटक हे रंगभूमीवर सुरू आहे. त्या नाटकाच्या पूर्णपणे विरुद्ध भूमिका मला ‘काळी राणी’ या नाटकात करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळं मी या नाटकात काम करणं खूप मनापासून एन्जॉय करतोय.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com