बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची मेजवानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Movies
बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची मेजवानी

बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची मेजवानी

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर अनेक मराठी चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी येत आहे. त्यामुळे हे चित्रपट नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच चित्रपटसृष्टीला उभारी देण्यासाठी मदत करतील, यात शंका नाही. या आगामी चित्रपटांबाबत....

चित्रपट- चंद्रमुखी

प्रदर्शित - २९ एप्रिल

प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' या चित्रपटाची अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. 'चंद्रमुखी'ची घोषणा झाल्यापासून 'ही' चंद्रमुखी ऊर्फ चंद्रा नक्की कोण असणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. काही दिवसांपूर्वी एका आगळ्यावेगळ्या बहारदार रूपात चंद्रा प्रेक्षकांसमोर आली. यावेळी आपल्या मोहमयी नजाकतीने या लावण्यवतीने सर्वांचीच मने जिंकली आणि याला साथ लाभली ती अजय -अतुल यांच्या दमदार संगीताची. सध्या सोशल मीडियावर 'चंद्रा' या गाण्याच्या नृत्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. अमृता खानविलकर हिने ज्याप्रमाणे 'चंद्रा' प्रेक्षकांसमोर सादर केली, त्याला तोड नाही. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील सोशल मिडियावर 'चंद्रा'चा नृत्य व्हिडिओ शेअर केला असून 'लावणीच्या प्रेमाखातर' असे कॅप्शन देत 'प्लॅनेट मराठी' आणि 'चंद्रमुखी' या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'चंद्रमुखी' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे, तर चिन्मय मांडलेकर यांचे पटकथा-संवाद आहेत. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

चित्रपट- ‘दिल, दिमाग और बत्ती’

प्रदर्शित - ६ मे

सा क्रिएशन्स निर्मित आणि डॉ. निवेदिता एकबोटे प्रस्तुत "दिल दिमाग और बत्ती" हा मराठी चित्रपट आता २२ एप्रिल ऐवजी ६ मे २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतीच याची घोषणा चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियाद्वारे केली आहे. प्रदर्शित झालेले पोस्टर्स, टीझर आणि ट्रेलर प्रेक्षकांना ८० च्या दशकातील इस्टमन कलर चित्रपटांच्या काळात घेऊन जाण्यात यशस्वी ठरले आहेत. सिनेमामध्ये सिनेमा असे दुहेरी मनोरंजन बघायला मिळणाऱ्या ‘दिल, दिमाग और बत्ती’ या चित्रपटातून अभिनेता सागर संत मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

‘दिल, दिमाग और बत्ती’ या चित्रपटाला अवधूत गुप्ते यांचे संगीत असून यात विविध धाटणीची चार गाणी आहेत. गीतकार हृषिकेश गुप्ते यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, रोहीत राऊत, जान्हवी प्रभू अरोरा, मुग्धा कराडे यांचा आवाज लाभला आहे. सा क्रिएशन्सची पहिलीच निर्मिती असलेल्या ‘दिल, दिमाग और बत्ती’ या मराठी चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते आहेत. सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, आनंद इंगळे, वैभव मांगले, सागर संत, मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे, सखी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, रेवती लिमये, मेघना एरंडे, संजय कुलकर्णी, विनीत भोंडे अशी तगडी स्टारकास्ट असून छायांकन सलिल सहस्रबुद्धे यांचे आहे.

चित्रपट - भारत माझा देश आहे

प्रदर्शित - ६ मे

एबीसी क्रिएशन प्रस्तुत डॉ. आशिष आग्रवाल निर्मित आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित 'भारत माझा देश आहे' हा देशभक्तिपर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरने वाढवलेल्या उत्सुकतेनंतर 'भारत माझा देश आहे'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात देशाच्या सीमेवर सुरू झालेली लढाई ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून सर्वांच्या घराघरांत पाहायला मिळत आहे. ही बातमी पाहून सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या घरच्यांची होत असलेली तळमळ या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.कोल्हापुरातील ज्या सैनिक टाकळी गावात हा चित्रपट चित्रित झाला, त्याच गावात 'भारत माझा देश आहे'चे टीझर प्रदर्शित करण्यात आले.

दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणतात, 'हा देशभक्तीवर आधारित चित्रपट असला तरी या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला सैनिक सीमेवर तैनात असताना त्यांच्या कुटुंबीयांच्या मनातील भीती, घालमेल दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या चित्रपटाची कथा मनाला स्पर्शून जाणारी आहे. देशसेवेवर आधारित हा चित्रपट असला तरी यातून सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. सर्वांनाच विचार करायला लावणारी ही कथा आहे.’

या चित्रपटाची कथा पांडुरंग जाधव यांनीच लिहिली असून या चित्रपटाला समीर सामंत यांचे गीत लाभले असून अश्विन श्रीनिवास यांनी संगीत दिले आहे. तर निशांत नाथाराम धापसे यांची पटकथा, संवाद आहेत. नीलेश गावंड यांनी 'भारत माझा देश आहे'चे संकलन केले असून छायांकन नागराज यांनी केले आहे. या चित्रपटात राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत या बाल कलाकारांसह मंगेश देसाई, शशांक शेंडे, हेमांगी कवी, छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपट- धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे

प्रदर्शित - १३ मे

लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणा-या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या टिझरची सर्वत्र चर्चा आहे. अभिनेता प्रसाद ओकने साकारलेल्या आनंद दिघेंची झलक बघून तर सर्वजण अवाक् झाले आहेत. केवळ दिसण्यातील साधर्म्यच नाही तर दिघे साहेबांच्या नजरेतील ती जरब, चेहऱ्यावरचे ते तेजस्वी आणि कणखर बाण्याचे भाव, त्यांची देहबोली, संवादफेक हे सर्वच प्रसाद ओक यांनी एवढं लिलया साकारलं आहे की साक्षात दिघे साहेबच पडद्यावर बघितल्याचा भास होतोय अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून उमटत आहेत.

प्रसाद ओक म्हणाले की, 'आपण या चित्रपटाच्या टिझरमधून एक फार सुंदर वाक्य ऐकलं ते म्हणजे, 'सर्वच राजकारणी सारखे नसतात, काही आनंद दिघे सुद्धा असतात'. लोकमान्य टिळकांनी ज्या भावनेने गणेश उत्सव सुरू केला त्याचं भावनेने मंगेश देसाई यांनी आनंदोत्सव केला. आनंद मूर्तीची स्थापना करण्याचा घाट घातला आणि त्या मूर्तीला अतिशय सुरेख रूप दिलं आणि त्या मूर्ती मध्ये प्राण-प्रतिष्ठा केली ती दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी. मी दिघे साहेब यांच्याबदल खूप वाचलं, ऐकलं. माझ्यासारख्या अभिनेत्याला ९५ चित्रपटानंतर प्रमुख भूमिका साकारण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली, याचा मला फार आनंद वाटत आहे. या चित्रपटात ज्या-ज्या महारथीनी मला मदत केली, त्यांचे मी आभार व्यक्त करतो.'

अभिनेते-निर्माते मंगेश देसाई म्हणाले, 'कोणत्याही चित्रपटात नेहमी काळ वेळ आणि प्रारब्ध हे अतिशय महत्त्वाचा घटक असतो. मला कधीही वाटलं नव्हत, की मी एक निर्माता होईल, परंतु आज माझं भाग्य आहे की आनंद दिघे यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची संधी मला मिळाली.’

लेखक- दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की, 'मी वेगवेगळे विषय असणारे चित्रपट बनवले. शेतकरी, अध्यात्म, इतिहास या विषयांचे चित्रपट बनवल्यानंतर जीवनपट बनवण्याचा विचार होता, पण कोणाच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार हा प्रश्न होता. अनेक राजकीय नेत्यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट होऊन गेले; पण का झाले माहिती नाही हा समज धर्मवीर हा चित्रपट बदलवणार हे नक्की. आणि झी स्टुडिओज मार्फत हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.’

चित्रपट- ‘समरेणू’

प्रदर्शित - १३ मे

‘समरेणू’तील सम्या, रेणू व संत्या यांचे चेहरे काही दिवसांपूर्वीच सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. तसेच 'समरेणू' चित्रपटातील शीर्षकगीताला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यानंतर आता चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून टिझरच्या माध्यामातून आपल्याला सम्या आणि रेणूची एकमेकांमध्ये आकंठ बुडालेली प्रेमकहाणी पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. यात महेश डोंगरे, रुचिता मांगडे, भारत लिमण हे मुख्य भूमिकेत असून चित्रपटाचे दिग्दर्शन महेश डोंगरे यांनी केले आहे.

टिझरमध्ये एका ठिकाणी सम्या आणि रेणूची हळूहळू बहरत जाणारी प्रेमकहाणी दिसत आहे तर सोबत बदल्याची आग मनात भरलेला संत्याही दिसत आहे. या दोघांमध्ये मनाची घालमेल होत असलेल्या रेणूचे आयुष्य एक वेगळ्याच वळणावर आलेले दिसत आहे. हे वळण नक्की कोणते असेल, यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.

'समरेणू'चे दिग्दर्शक महेश डोंगरे म्हणतात, ‘समरेणू’ चित्रपट माझा अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. त्यामुळे माझ्यासोबत संपूर्ण टीमला या चित्रपटाची नक्कीच उत्सुकता आहे. सम्या आणि रेणू यांच्या प्रेमकहाणीत वेगळाच ट्विस्ट अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटातील संगीत टीम खूप अनुभवी आणि कसलेली आहे. त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटासोबतच गाणी सुद्धा आवडतील.’

एमआर फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखनही महेश डोंगरे यांनी केले आहे. सूरज- धीरज यांचे संगीत असलेल्या या गाण्यांना गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांचे शब्द लाभले आहेत. तर या गाण्यांना कुणाल गांजावाला, नीती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांचा आवाज लाभला आहे. धमाकेदार संगीत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.

Sarsenapati Hambirrao Marathi Movie

Sarsenapati Hambirrao Marathi Movie

चित्रपट - सरसेनापती हंबीरराव

प्रदर्शित - २७ मे

सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली होती. जगभरातील शिवप्रेमी या ऐतिहासिक मराठी चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे, 27 मे 2022 रोजी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा महाराष्ट्राचा महासिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या रक्त उसळवणाऱ्या टीझरला जबरदस्त संवाद आणि धमाकेदार ऍक्शन सिक्वेन्समुळे जगभरातील प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रविण तरडे साकारत आहेत. मराठीतील ‘हँडसम हंक’ अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे तर सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते यांची भूमिका स्नेहल तरडे साकारत आहेत. याशिवाय अनेक दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत, परंतु कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार? प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रेक्षकांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

संदीप मोहितेपाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्सच्या शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य, ऐतिहासिक महाराष्ट्राचा महासिनेमा येत्या 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.

चित्रपट- 'इर्सल'

प्रदर्शित - ३ जून

बहुचर्चित 'इर्सल' या आगामी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भलरी प्रॉडक्शन्सची निर्मिती, राज फिल्म्स प्रस्तुत ‘इर्सल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार यांनी केले आहे.

'राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!!' अशी टॅगलाईन असलेल्या 'इर्सल' चित्रपटाचा फर्स्ट लुक अतिशय लक्षवेधी असून चित्रपटाचे हटके नाव आणि उत्कंठावर्धक पोस्टर यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली आहे. 'इर्सल' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये गुलालाची उधळण दिसते, त्यामध्ये एका व्यक्तीचा हात असून त्या हातात पिस्टल दिसत आहे. पोस्टरच्या खालच्या बाजूला झोपडपट्टीसारखा परिसर आणि काही उंच इमारती तसेच कबुतरांचा थवा दिसतोय. भलरी प्रॉडक्शनची पहिली निर्मिती आणि राज फिल्म्स प्रस्तुत 'इर्सल' या चित्रपटाचे निर्माते विनायक आनंदराव माने आहेत.

'इर्सल' चित्रपटातून विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे पाटील ही फ्रेश जोडी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, अभिनेत्री माधुरी पवार यांच्यासह सुजाता मोगल, शरद जाधव, अजिंक्य निकम, विश्वास सुतार, संजय मोहिते, आदर्श गायकवाड, दिग्विजय कालेकर, ओंकार भस्मे, केतन विसाळ, हर्षाली रोडगे, नागेश नाईक, वैशाली घोरपडे, चैताली बर्डे, अप्पासाहेब कुंडले, सर्जेराव जाधव, हनिफ शेख या कलाकारांच्या भूमिका आहेत.

चित्रपटाची टॅग लाईन, पोस्टर यावरून चित्रपटाच्या कथेचा नेमका अंदाज लावता येत नाही. 'इर्सल' या शब्दाचा अर्थ ईर्षा असल्यामुळे 'इर्सल' हा मराठी चित्रपट शहरी, निमशहरी किंवा मोठ्या महानगरांतील राजकारण आणि गुन्हेगारी विश्वाभोवती फिरणार असल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे.

'इर्सल' चित्रपटाची कथा अनिकेत बोंद्रे यांची असून पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची आहे. संवाद विश्वास सुतार यांचे तर गीत- संगीत दिनकर शिर्के यांनी दिले आहे. 'इर्सल'चे छायांकन आनंद पांडे व वीरधवल पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता म्हणून संजय ठुबे यांनी जबाबदारी पार पाडली आहे. तसेच चित्रपटाचे संकलन संतोष गोठोसकर, ध्वनी पियुष शाह, कला सिद्धार्थ तातूसकर, नृत्य धैर्यशील उत्तेकर, वेशभूषा सोनिया लेले - सहस्रबुद्धे, रंगभूषा सुहास गवते व महेश बराटे, केशभूषा दीपाली ढावरे यांनी केले आहे.

चित्रपट- 'वाय'

प्रदर्शित - २४ जून

सत्य घटनांवर आधारित 'वाय' हा चित्रपट येत्या २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कन्ट्रोल-एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर करण्यात आली आहे. अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित 'वाय' या चित्रपटात मुक्ता बर्वेची प्रमुख भूमिका आहे.

पोस्टरमध्ये मुक्ताच्या संघर्षपूर्ण डोळ्यांत खंबीरपणे लढण्याची ताकद दिसत असून आजूबाजूला आगीचे लोळ दिसत आहेत. तर लाल रंगाच्या 'वाय'मध्ये ग्लोव्हस घातलेले हात वैद्यकीय हत्यार हाताळताना दिसत आहे. पोस्टरवरून हा चित्रपट महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य करणारा दिसतोय. चित्रपटाच्या 'वाय' या शीर्षकाच्या पार्श्वभागी असणाऱ्या WHY या इंग्रजी अक्षरामुळे ही चित्रपटाच्या आशय आणि विषयाबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे. ‘वाय’ एक दमदार कथा आणि आशय घेऊन प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे दिसतेय.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, ‘सत्य परिस्थिती दाखवणारी, आजच्या काळात घडणारी ही कथा आहे. या भूमिकेसाठी मुक्ताशिवाय दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीचा विचार माझ्या मनात नव्हता. मला खात्री आहे, या चित्रपटाला तुम्ही भरपूर प्रतिसाद द्याल.’

Web Title: Entertainment Of Many Marathi Movies Is Coming To The Box Office

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top