Exclusive Interview : 'खुदा हाफीज' फेम शिवलिका ओबेराॅयशी केलेली विशेष बातचीत

Exclusive Interview : 'खुदा हाफीज' फेम शिवलिका ओबेराॅयशी केलेली विशेष बातचीत

फारूख कबीर दिग्दर्शित खुदा हाफीज हा चित्रपट पुढील आठवड्यात डिस्नी हाॅटस्टारवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात विद्युत जामवाल आणि शिवलिका ओबेराॅय मुख्य भूमिका साकारीत आहे. यानिमित्त शिवलिकाशी केलेली बातचीत...

-------------------------------------

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ते काही उगीच नाही. माझ्या आई-वडिलांना लहान असतानाच वाटले होते की मोठेपणी मी कलाकार होणार. कारण लहान असताना मी करिना कपूरची डाय हार्ट फॅन होते. तिचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला की मी तो नक्कीच पाहायचे. त्यामुळे तेव्हा मला आईने सांगितले की पहिल्यांदा शिक्षणावर लक्ष दे आणि नंतर करिअरचा विचार कर. त्याप्रमाणे मी माझे शिक्षण पूर्ण केले.  ग्रॅज्युएशन करता करता अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग शाळेत मी प्रवेश घेतला आणि तेथे अॅक्टिंगचे धडे गिरविले.

त्यानंतर मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. परंतु ते करीत असताना माझ्या मनात असा विचार आला की आपण सुरुवातीला कुठे तरी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले पाहिजे. चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्यापूर्वी या गोष्टींचे ज्ञान घेतले पाहिजे. कारण ते खूप महत्त्वाचे असते आणि ती सुरुवातीची पायरी असते असे मला वाटले आणि मी किक, हाऊसफुल ३ या चित्रपटांसाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम पाहू लागले. त्यावेळचा एक किस्सा मला अजूनही आठवतो. किक या चित्रपटात सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ही जोडी आहे. किकच्या प्री-प्राॅडक्शनच्या वेळीच मी तेथे होते. नंतर मला कळले की या चित्रपटात सलमान आहे आणि मला त्यांना क्लॅप द्यायची आहे. त्यामुळे सुरुवातीला मी कमालीची नर्व्हस होते. मनात काहीशी चलबिचल सुरू होती. परंतु जेव्हा सलमान यांना भेटले तेव्हा त्यांनी मला खूप सहकार्य केले. रिहर्सलही आम्ही अगदी हसत खेळत केली. तेव्हा सलमान यांना माहीत नव्हते की मला अभिनेत्री बनायचे आहे ते. जेव्हा त्यांना हे कळले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. त्यांना शाॅकही बसला मग मीच त्यांना सांगितले की मला डिरेक्शन वगैरे गोष्टी शिकायच्या आहेत म्हणून मी हे काम करते आहे. मग त्यांनी माझे कौतुक केले.

हाऊसफुल ३ हा चित्रपट असिस्टंट डिरेक्टर म्हणून पूर्ण केला आणि त्यानंतर आता आपल्याला चित्रपटात काम करायचे आहे आणि तेदेखील हिरोईन म्हणून. त्यामुळे मी तयारी करू लागले. आॅडिशन्स देऊ लागले. त्याच दरम्यान काही जाहिरातीही करू लागले. साऊथमधील काही जाहिराती केल्या आणि आॅडिशन्स देत असतानाच मला ये साली आशिकी हा चित्रपट मिळाला. चिराग रुपारेल हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि माझ्या अपोझिट होता अमरीश पुरी यांचा नातू वर्धन पुरी. या चित्रपटासाठी मला काही महिने वर्कशाॅप करावे लागले. या भूमिकेसाठीही खूप तयारी करावी लागली. हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर आठेक महिन्यांनी मला खुदा हाफीज या चित्रपटाची आॅफर आली. मग मी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भेटले. सुरुवातीला माझी लूक टेस्ट दोन-तीन वेळा झाली आणि त्यानंतर  माझी आॅडिशन्स घेण्यात आली.  हा चित्रपट मिळाल्याचा मला खूप आनंद झाला कारण मी सुरुवातीला विचार करीत होते की रियल स्टोरी असणारी एखादी फिल्म करावी आणि ती संधी मला माझ्या करिअरच्या दुसऱ्या चित्रपटात मिळाली.    

खुदा हाफीज हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक फारूक कबीर यांनी सन २००८मध्ये एका वर्तमानपत्रात आलेली बातमी वाचली आणि त्यावर त्यांनी चित्रपट बनविण्याचे ठरविले. त्यांनीच हा चित्रपट लिहिला आहे आणि दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट म्हणजे लव्हस्टोरी आहे. समीर आणि नर्गीस या दोन व्यक्तिरेखांभोवती फिरणारी ही कथा आहे. हे दोघे पती-पत्नी असतात आणि लखनौ येथे राहात असतात. येथे आर्थिक मंदी आल्यामुळे पहिल्यांदा नर्गीस परदेशात जाते आणि तेथे ती हरवते. मग तिला शोधण्यासाठी  समीर जातो. मग पुढे काय आणि कशा घडामोडी घडतात हे चित्रपटात दाखविले आहे. खऱ्या प्रेमात किती ताकत असते हे या चित्रपटात दर्शविण्यात आले आहे. ही कथा आज कोरोनासाराखी जी परिस्थिती उद्भवली आहे त्या परिस्थितीशी साधर्म्य सांगणारी आहे. कारण आताच्या परिस्थितीत कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत...आर्थिक चणचण कित्येकांना भासत आहे...डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह उभे आहे.. भविष्याबद्दल काहींना चिंता लागलेली आहे. या चित्रपटाची साधारण कथा याच प्रकारची आहे आणि या कालावधीत हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

नर्गीसची भूमिका  मी या चित्रपटात साकारीत आहे. माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध अशी ही भूमिका आहे. मी बोलघेवडी आहे . मला गप्पा मारायला आणि तेही विविध विषयांवर खूप आवडते. परंतु नर्गीस अत्यंत शांत व संयमी आहे. या चित्रपटाची कथा मी वाचली आणि तेव्हाच या भूमिकेच्या प्रेमात पडले. या भूमिकेच्या तयारीसाठी मला अवघे वीस दिवस मिळाले. या दिवसांमध्ये जितकी काही तयारी करता येईल ती केली आणि आम्ही चित्रीकरण केले. विद्युतची या चित्रपटात निराळी भूमिका आहे. सध्या जान बन गये हे रोमॅटिक गाणे कमालीचे लोकप्रिय ठरलेले आहे. हे गाणे दिवसातून दहा ते पंधरा वेळा मी ऐकते. रात्री हे गाणे ऐकूनच झोपते. या गाण्याकरिता चार दिवस मी रिहर्सल केली आणि त्यानंतर लखनो येथे ते चित्रित झाले. असो. आतापर्यंत एकूणच प्रवास झकास झाला आहे आणि यापुढेही असाच होईल अशी आशा आहे.

---------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com