Exclusive Interview : परिक्षक म्हणून प्रशांत दामले यांची नवी इनिंग; त्यांच्याशी साधलेला खास संवाद

Exclusive Interview : परिक्षक म्हणून प्रशांत दामले यांची नवी इनिंग; त्यांच्याशी साधलेला खास संवाद

अभिनेते प्रशांत दामले हे मराठी रंगभूमीवरचं खणखणीत नाणं. रंगभूमीबरोबरच छोट्या व मोठ्या पडद्यावरही हे नाणे चांगलेच वाजले आणि गाजले. आता प्रशांत दामले एक वेगळी इनिंग खेळायला जात आहे. आता सोनी मराठी वाहिनीवरील सिंगिंग स्टार...गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे या कार्यक्रमात ते परीक्षक बनले आहेत. परीक्षक म्हणून पहिल्यांदाच ते काम करीत आहेत. त्याबद्दल त्यांच्याशी साधलेला संवाद..

ः तुम्ही छोट्या पडद्यावर यापूर्वी काम केले आहे. आता छोट्या पडद्यावरील एका सिंगिंग शोमध्ये काम करण्याचा निर्णय तुम्ही कसा काय घेतला...
-सन २०१२-१३ मध्ये मी सारेगमप हा कार्यक्रम केला होता. त्यामध्ये मी एक स्पर्धक म्हणून सहभागी झालो होतो. आता परीक्षक म्हणून सहभागी झालो आहे. हे एक मोठे आव्हान आहे. आणि गाणं हा माझा वीक पाॅइंट राहिला आहे आणि ही कला मला फारशी विकसित करता आली नाही. पण आता मला छान छान गाणी ऐकायला मिळणार आहेत आणि मलाही गाणी गायला मिळणार आहेत. खरं तर मला गायनाने तारलं आहे. मी नुसता कलाकार असतो तर येथे टिकलो असतो का, असा प्रश्न कधी कधी मला पडतो. माझ्या करिअरला सपोर्ट माझ्या गायनाने दिला आहे.  सोनी मराठीने मला आॅफर दिली आणि मीदेखील विचार केला की यापूर्वी असे काही काम केलेले नव्हते. चला हे कामदेखील करून  बघूया असे ठरविले.
 

ः अशा प्रकारचा शो करणं म्हणजे एक प्रकारचं चॅलेंज असतं. कधी आपल्या शाब्दिक फटकाऱ्याने एखादा दुखावला जाण्याची शक्यताही असते. तुम्हाला काय वाटतं.
- शब्दांचा वापर कसा करावा ही कला मला नाटकामुळे चांगलीच अवगत आहे. त्यामुळे तसे काही होईल असे मला वाटत नाही. परंतु हा शो म्हणजे एक मोठे चॅलेंज आहे हे नक्की.
कारण सगळेच गायक-कलाकार ओळखीचे आहेत. काही जणांनी माझ्याबरोबर नाटकातही काम केले आहे. परंतु येथे मी परीक्षकाच्या भूमिकेत आहे आणि मला तटस्थपणे निर्णय द्यायचा आहे. ही खुर्ची मानाची आहे आणि तिचा मान ठेवूनच निष्पक्षपातीपणे काम करायचे आहे. कधी कधी एखाद्या स्पर्धकांचे कौतुक करायचे तर कधी कधी त्याच्यावर टीका आणि त्याच्या चुकाही दाखवायच्या आहेत. या शोमधून चांगला गायक कलाकार निवडायचा आहे आणि तीच बाब कठीण आहे. कारण सगळेच जण पूर्णपणे तयारीनिशी उतरणार आहेत.

ः रिअॅलिटी शोमध्ये म्हणजे वादाचा फड असतो. आतापर्यंत अशा प्रकारच्या शोमध्ये परीक्षकांमध्ये वादविवाद झाले आहेत. आता येथे सलील कुलकर्णी, बेला शेंडे व तुम्ही आहात. तुमच्यामध्ये वाद  झाले तर कसे सोडविणार आहात...
- वाद होण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही एकमेकाला ओळखत असलो तरी येथे तटस्थपणे परीक्षक म्हणून काम करणार आहोत. मी केवळ ते स्पर्धक गातात कसे हेच पाहणार नाही तर त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव कसे आहेत...त्यांचे सादरीकरण कसे आहे या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. कौतुकाबरोबरच मार्गदर्शनही करणार आहोत. त्यांच्यातील गायनाची कला अधिक विकसित कशी होईल ते पाहायचे आहे. त्यांच्या गायन कलेला प्रोत्साहन द्यायचे आहे. शेवटी हा सिंगिंग शो आहे आणि प्रत्येकाला चांगला परफाॅर्न्मन्स द्यावाच लागणार आहे.

ः छोट्या पडद्यावरचा माहौल सध्या बदललेला आहे. विविध विषयांवरील मालिका आणि कार्यक्रम आले आहेत. या बदलाकडे तुम्ही कसे पाहता..
- नक्कीच छोट्या पडद्यावर वेगवेगळे प्रयोग होत आहेत आणि काही तरी वेगळे करावे म्हणून मी हा शो करीत आहेत. कारण सगळ्याच गोष्टी चाचपून पाहायच्या असतात. सगळ्याच गोष्टींमध्ये आपले नशीब अजमावयाचे असते. मी एक कलाकार आहे आणि मला अभिनयाबरोबरच सूत्रसंचालन वगैरे अशा सगळ्या गोष्टी करायला आवडतात.


ः तुम्ही उत्तम सूत्रसंचालक आणि अॅक्टरही आहात. गायनाची कलादेखील तुम्हाला चांगलीच अवगत आहे. आता परीक्षकाची नवी भूमिका बजावीत आहात. तर परीक्षक म्हणून कोणत्या गोष्टीचे भान ठेवावे लागते असे तुम्हाला वाटते...
- सुरांचे भान असणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. आपल्याकडे मोठमोठे गायक होऊन गेले आहेत आणि आताही आहेत.  त्यांची
जागा कुणीच घेऊ शकत नाही. त्यांनी गायलेली गाणी कुणीही जशीच्या तशी गाऊ शकत नाही. खरे तर कोणत्याही मोठ्या गायकाने गायलेले गाणे दुसऱ्याने गाणे म्हणजे एक मोठे चॅलेंज असते. पण आता हे गायक कलाकार सूर कसा पकडतात..कोणती जागा रिकामी ठेवतात हे पाहणे मोठे आव्हान आहे. पण ते गाणे सुरेल होणे आवश्यक आहे.
े  

ः अशा प्रकारच्या सिंगिंग शोमुळे इंडस्ट्रीला काही उपयोग होतो असे तुम्हाला वाटते का..
-नक्कीच होतो. कोणता कलाकार उत्तम गातो हे कळते आणि भविष्यात एखादा निर्माता आपल्या नाटकाची किंवा चित्रपटाची स्क्रीप्ट तशा प्रकारची तयार करतो. अनेक निर्माते व दिग्दर्शक अशा शोकडे लक्ष ठेवून असतात. त्याचा फायदा अशा गायक कलाकारांना होतो.

ः तुम्हाला गायनाचे चांगले अंग आहे. त्यामुळे एखादा कार्यक्रम म्हणजे प्रशांत दामले म्युझिकल शो असा करावा असे कधी वाटले नाही.
-मी आधी उत्तम कानसेन आहे. त्यामुळे काय गायचे नाही हे मला चांगले ठाऊक आहे. कारण उत्तम गाणे गाण्यासाठी आपण परफेक्ट असले पाहिजे. मी हौस म्हणून काही गाणी कधी कधी गातो. सोशल मीडियावर मी गायलेले एखादे गाणे टाकतो. छोट्या पडद्यावर किंवा एखाद्या नाटकत गाणे गाणे वेगळे असते पण लाईव्ह शो करताना परफेक्ट असावे लागते. तेथे आत्मविश्वास मोठा असावा लागतो.  छोट्या पडद्यावर एखादे गाणे चुकले तरी तेथे रिटेक करता येते परंतु एखादा लाईव्ह शो करताना तसे करता येत नाही. ते सगळे परफेक्ट असावे लागते.  

ः नाटक हा तुमचा श्वास आहे आणि चित्रपट व टीव्ही....
- सिलिंडर आणि आॅक्सिजन.

ः कोरोनामुळे नाट्यव्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला आहे. सध्या आॅनलाईन नाटक सुरू आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल...
- कोरोनाच्या काळात आॅनलाईन नाटक हा एक पर्याय आहे. तो कायमचा पर्याय होऊ शकत नाही. नाटक हे माध्यम असे आहे की ते लाईव्ह पाहण्यात खरी मजा आहे. ती मजाच वेगळी आहे. नाटकाला कधीही मरण नाही. परंतु आता कोरोनामुळे परिस्थिती बदललेली आहे. नाट्यव्यवसायावर खूप गंभीर परिणाम झाला आहे. परंतु लवकरच परिस्थिती सुधारेल हे नक्की आणि नाट्यव्यवसाय पुन्हा भरारी घेईल अशी आशा करायला हरकत नाही.

ः मराठी रंगभूमीवर तुम्ही वेगवेगळे विक्रम केले आहेत. तुम्हाला विक्रमादित्य म्हटले जाते. आता कोणता विक्रम बाकी आहे असे तुम्हाला वाटते...
- कोरोनाच्या काळात एवढे दिवस घरी आहे हाच एक मोठा विक्रम आहे असे मला वाटते. 27 डिसेंबर  1985 रोजी माझे लग्न झाले आणि त्यानंतर 29 डिसेंबरपासून जे काम करतोय ते 14 मार्च 2020 पर्यंत करीतच आलो आहे. एवढी मोठी सुट्टी कधी घेतली नाही. आता कोरोनामुळे ती मला मिळाली, आता पुढील वर्षीच्या नाटकाची तयारी करीत आहे.

ः एखाद्या निर्मात्याने किंवा दिग्दर्शकाने तुमची बायोपिक काढण्याचा निर्णय घेतला आणि त्या चित्रपटाचे नाव विक्रमादित्य असे ठेवले तर तुमची भूमिका कोणत्या कलाकाराने साकारावी असे तुम्हाला वाटते.
- अरे बापरे. फारच अवघड प्रश्न आहे. मी कधी आयुष्यात असा विचारच केला नाही. परंतु याचा निर्णय त्या चित्रपटाचा दिग्दर्शक घेईल. मी याबाबतीत काही सांगू शकत नाही. 

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com