Exclusive Interview : विद्याने सांगितला 'शकुंतला देवी'चा प्रवास...

Exclusive Interview : विद्याने सांगितला 'शकुंतला देवी'चा प्रवास...

गेले अनेक दिवस प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करणारी गणिततज्ञ शकुंतला देवी यांचा बहुप्रतिक्षित बायोपिक म्हणजे "शकुंतला देवी" हा चित्रपट. शकुंतला देवी यांची ओळख कॅल्क्युलेटर आणि मानवी-संगणकापेक्षा वेगवान गणित अभ्यासक अशी होती. या सिनेमातून शकुंतला देवी यांची गणित क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी तसंच या गणित तज्ञाच्या यापूर्वी कधीही न पाहिलेला प्रवास दिसणार आहे. या सिनेमात अभिनेत्री विद्या बालन ही शकुंतला देवी यांची भूमिका साकारीत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याबद्दल विद्या बालनशी केलेली खास बातचीत

- यापूर्वीही तू द डर्टी पिक्चर आणि एक अलबेला हे बायोपिक केले होतेस. आता पुन्हा शकुंतला देवी हा बायोपिक करीत आहेस. बायोपिक अधिक करण्याचे कारण काय...
- बायोपिकच करायचे असे काही मी ठरविलेले नाही. मला एखाद्या चित्रपटाची कथा मनापासून आवडली की मी तो चित्रपट करण्यास होकार देते. मग तो चित्रपट काल्पनिक असो की बायोपिक किंवा एखाद्या सत्य घटनेवरील. ही कथा  प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवली पाहिजे असे मला वाटले की तो चित्रपट मी करते. त्यामुळे ठराविक असे साचेबद्ध काम मी करीत नाही. मी काम करते ते माझ्या मनाप्रमाणे आणि मला पसंत असेल तेच.

- मग शकुंतला देवी या चित्रपटात तुला काय खासियत वाटली...
- शकुंतला देवीची कहाणी सगळ्यांना प्रेरणा देणारी आहे. शकुंतला देवी अत्यंत हुशार आणि चाणाक्ष होती. आपण महिला आहोत म्हणून तिला अजिबात भीती वगैरे वाटत नव्हती. पन्नास वर्षांपूर्वी ती आपल्या मर्जीनुसार आणि शर्तीनुसार जीवन जगत होती. ती गणितात हुशार होतीच. पण नाच-गाणेही तिला खूप पसंत होते. फिरायलाही तिला आवडत होते. ती आपले जीवन स्वतःच्या मर्जीनुसार जगत होती.  १९७७ मध्ये तिने पहिले पुस्तक लिहिले. शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईननेदेखील तिचे कौतुक केले होते. मोठी मातब्बर महिला होती ती. त्यामुळे ही भूमिका आपण केली पाहिजे असे मला वाटले आणि मी हा चित्रपट करण्यास होकार दिला.

- हा चित्रपट करण्यापूर्वी शकुंतला देवीबाबत तुला किती माहिती होती...
- फारशी नव्हती. पण चित्रपट स्वीकारल्यानंतर खूप तयारी करावी लागली. खूप संशोधन मला करावे लागले. काही तिचे जुने व्हिडीओ मी पाहिले. काही माहिती या चित्रपटाची दिग्दर्शिका अनू मेननने मला दिली. कारण अनूकडे खूप माहिती होती. ती तिच्या जावई आणि मुलीला भेटली होती. त्यांच्याकडून तिने सगळी माहिती घेतली होती. ती माहितीही मला मिळाली.

- गणित हा विषय सगळ्यांना कठीण वाटतो..तुझा गणित विषय कसा होता
-ही गोष्ट खरी असली तरी शकुंतला देवीने सांगितले आहे की गणिताची अजिबात चिंता करायची नाही. कारण गणित हा विषय आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पावलोपावली आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. साधी भाजी खरेदी करायला गेलो तर आपण तेथे आकडेमोड करीत बसतो. जेवताना किंवा फिरताना अनेक ठिकाणी गणित आहे. त्यामुळे त्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. माझा गणित हा विषय चांगला होता. मला चांगले मार्कदेखील मिळायचे. मला शिकताना गणिताची भीती किंवा धास्ती कधी जाणवली नाही. मला कधी कुणाच्या गाडीचा नंबर किंवा फोन नंबर बरोबर लक्षात राहतो. त्याचा मला ही भूमिका साकारताना खूप मदत झाली.

- तुझा गणित हा विषय चांगला होता ही गोष्ट खरी. मात्र आयुष्यातील एखादे गणित सोडविताना तुला कधी त्रास झाला का...
- गणित हा आयुष्याचा एक हिस्सा आहे. कारण आपल्या आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात की ते सोडविताना आपल्याला खूप त्रास होतो. मलादेखील करिअरच्या सुरुवातीला खूप त्रास झाला. त्यानंतर माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आणि आताही येत आहेत. पण आयुष्याच्या या गणिताला कधी घाबरायचे नाही. मोठ्या धीराने आणि ध्यैर्याने सामोरे जायचे. आपल्या आयुष्यात प्राॅब्लेम आले नाहीत तर ते आयुष्य कसले...

- मगाशी तू म्हणालीस की हा चित्रपट सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे. परंतु तुला या चित्रपटाकडून काय प्रेरणा मिळाली...
- हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकाला वेगवेगळी प्रेरणा मिळेल हे नक्की. पन्नास वर्षांपूर्वी शकुंतला देवी आपल्या ध्येयपूर्तीसाठी ज्याप्रमाणे झगडली तर ते पाहता आजच्या महिलांना आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी काही अडचणी येऊ नयेत असे मला वाटते. महत्त्वाचे म्हणजे आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तरी केले पाहिजेत. शकुंतला देवीने मला ही गिफ्ट दिली की आपले ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने वाटचाल करा, पुन्हा मागे पाहू नका.

- चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे निराळे आणि ओटीटीवर चित्रपट पाहणे निराळे. थिएटर्समध्ये चित्रपट पाहण्याची मजा काही औरच असते. तुला काय वाटते..
- सध्या थिएटर्स बंद असल्यामुळे सगळे चित्रपट ओटीटीवर येत आहेत. तुमच्या घरी मी येत आहे. तुम्ही नाश्ता करताना किंवा चहा पिताना घरी बसूनच चित्रपट पाहावा. अगदी आपल्या कुटुंबासमवेत चित्रपटाचा आस्वाद घ्यावा. शिवाय चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर आम्ही चित्रपटगृहात येणारच आहोत. मला वाटते की भविष्यात ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित होणे आणि चित्रपटगृहात होणे ही वाटचाल समांतर असेल. काही चित्रपट ओटीटीवर तर काही थिएटर्समध्ये. हा नवीन प्लॅटफाॅर्म आहे म्हणून दुसऱ्याचा अंत होईल किंवा संपुष्टात येईल असे मला वाटत नाही.

- तू एखाद्या वेबसीरीजमध्ये काम करणार आहेस का...
-नक्कीच करीन. कारण ओटीटीवरही चांगले विषय येत आहेत आणि प्रेक्षक त्याचे स्वागत करीत आहेत. अनुष्का शर्माची पाताल लोक ही वेबसीरीज मी नुकतीच पाहिली. मला ती खूप आवडली. असे चांगले विषय आले तर काम का करणार नाही.

-  कोरोनानंतर चित्रपटसृष्टी कशी असेल असे तुला वाटते..
काही तरी बदल होईल हे नक्की. पण त्याबाबतीत आताच बोलणे योग्य ठरणार नाही. 

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com