esakal | 'त्याच्या उत्साहाचा खून करू नका'; अर्जुन तेंडुलकरला ट्रोल करणाऱ्यांना फरहानने फटकारलं
sakal

बोलून बातमी शोधा

farhan akhtar and arjun tendulkar

वडील सचिन तेंडुलकरमुळे आयपीएलमध्ये संधी मिळाली, अशी टीका सोशल मीडियावर होत आहे.

'त्याच्या उत्साहाचा खून करू नका'; अर्जुन तेंडुलकरला ट्रोल करणाऱ्यांना फरहानने फटकारलं

sakal_logo
By
स्वाती वेमूल

आयपीएल २०२१ साठीचा लिलाव नुकताच पार पडला. या लिलावात मुंबई इंडियन्स संघानं सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची निवड केली. २० लाखांच्या मूळ किमतीला अर्जुन संघात घेतलं गेलं. यावेळी इतर अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लागली नाही, पण मुंबईने अर्जुनला विकत घेतल्यावरून सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे. वडिलांमुळे त्याला संधी मिळाली, असं म्हणत त्याच्यावर घराणेशाहीची शेरेबाजी करण्यात येत आहे. यावर आता अभिनेता फरहान अख्तरने अर्जुन तेंडुलकरची बाजू घेत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

काय म्हणाला फरहान अख्तर?
'अर्जुन तेंडुलकरबद्दल मी बोलावं असं मला वाटतंय. आम्ही एकाच जिममध्ये जातो आणि फिटनेसवर तो किती मेहनत घेतो हे मी स्वत: पाहिलंय. उत्तम क्रिकेटर होण्यासाठी तो एकाग्रतेने काम करत असल्याचं मी पाहिलंय. त्याच्यासाठी घराणेशाही हा शब्द वापरणं हे अत्यंत अयोग्य आणि क्रूर आहे. त्याच्या उत्साहाचा खून करू नका आणि सुरुवात करण्याआधीच त्याचे पाय खेचू नका,' असं ट्विट फरहानने केलं. 

बहीण सारा तेंडुलकरनेही ट्रोलर्सना फटकारलं
'तुला आयपीएलमध्ये जे स्थान आणि संधी मिळाली आहे ती केवळ तुझ्या स्वत: मेहनतीच्या जोरावर मिळाली आहे. या कष्टाचं श्रेय तुझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे', असं साराने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं. यासोबतच तिने अर्जुनचा मैदानातला फोटो शेअर केला. 

वेगवान गोलंदाज म्हणून अर्जुन तेंडुलकरची ओळख आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली असून आयपीएलच्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने त्याला २० लाखांच्या मूळ किंमतीत घेतलं. त्याच्या निवडीनंतर सोशल मीडियावर टीका होण्यास सुरुवात झालीये. आता आयपीएलमध्ये अर्जुनच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष आहे.