कोरोना काळात चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण कसे चालते; जाणून घ्या कलाकारांकडून

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 22 September 2020

मनोरंजनासाठी चित्रपट, मालिकांचे‌ चित्रीकरण सुरू झाले आहे.

मनोरंजनासाठी चित्रपट, मालिकांचे‌ चित्रीकरण सुरू झाले आहे. पण सध्याचा काळ हा कोरोनाचा आहे, अशा स्थिती‌ प्राॅडक्शन हाऊसने सुरक्षेची काळजी घ्यावी म्हणून कलाकार आणि तंत्रज्ञांना आग्रही असले पाहिजे. त्याबरोबरच प्रत्येकाने स्वत: देखील आरोग्याबद्दल खूप सतर्क राहिले पाहिजे. सेटवर कोरोनाचा संसर्ग झाला, तर काही दिवस चित्रीकरण थांबविले पाहिजे. यातून जीवही वाचेल आणि काही दिवसांनंतर अर्थार्जनासाठी कामही सुरू राहील, अशी भावना अभिनेत्यांमध्ये आहे.

चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणादरम्यान निर्माते सर्वांची नेमकी कोणती काळजी घेतात, तसेच कलाकारांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि जबाबदारी काय याबद्दल काही कलाकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी व्यक्त केली आपली मते..

प्राजक्ता माळी ही सध्या सोनी टीव्हीवरील हास्यजत्रा या कार्यक्रमाचे चित्रीकरण करते. ती सांगते, की आमच्या सेटवर अजून तरी कोरोना कुणाला झालेला नाही. आमचे प्राॅडक्शन हाऊस आमची खूप काळजी घेते शिवाय आमचे चित्रीकरण दररोज नसते. दोन किंवा तीन दिवसांनी असते. त्यामुळे आम्ही सगळेच कलाकार व अन्य मंडळी खूप काळजी घेतो.

ड्रग्स प्रकरणः रिया, शौविकची मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव

आमच्या सेटवर दिवसातून चारेक वेळा सॅनिटायझर्स केले जाते. शिवाय आमच्याकडे सॅनिटायझर्स असते. शाॅट दिला की हात स्वच्छ धुणे वगैरे बाबी आम्ही काटेकोर पाळतो. हात धुतल्याशिवाय किंवा सॅनिटाईज केल्याशिवाय कोणत्याही वस्तूला हात लावीत नाही.  एखाद्या कलाकारा उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असेल तर त्याने दुप्पट किंवा तिप्पट काळजी घेतली पाहिजे. मला असे वाटते की प्राॅडक्शन हाऊसपेक्षा आपण स्वतः आपली काळजी घेणे आवश्यक आहे.
-----
रेश्मा शिंदेच्या स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेचे चित्रीकरण गोरेगाव येथे चालते. रेश्मा म्हणते, की आशाताईंचे निधन ही खूप दुःखद घटना आहे. आमच्या मालिकेच्या सेटवर दर दोन तासांनी सॅनिटायझेशन केले जाते. डाॅक्टर येतात आणि तपासणी करतात. एखाद्या मालिकेचे युनिट म्हणजे आपले कुटुंब असते. आपण आपल्या कुटुंबाची जशी काळजी घेतो तशी काळजी सेटवरदेखील प्रत्येकाने घेतली पाहिजे. कारण कोरोना महामारी कधी जाईल हे सांगता येणार नाही. आमचे प्राॅडक्शन हाऊस आणि वाहिनी खूप काळजी घेते. आम्ही सगळेदेखील खूप काळजी घेतो. केवळ सेटच नाही तर आमच्या स्वतःच्या गाड्या आणि सामानदेखील सॅनिटाईज केले जाते. सेटवर वाहिनी किंवा प्राॅडक्शन हाऊस आपली काळजी घेतेच पण सेटवरून बाहेर आल्यानंतर आपण आपली काळजी घेतली पाहिजे. सोशल डिस्टंसिंग पाळले पाहिजे. कुठे जायचे आणि कसे राहायचे हे प्रत्येकाने ठरविले पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे.
-----
आशुतोष पत्की याच्या झी मराठीवरील अगंबाई सासूबाई या मालिकेचे चित्रीकरण अंधेरी येथे चालते. आशुतोष सांगतो, की आमच्या मालिकेच्या निर्मात्यांनी आम्ही कलाकार मंडळी सोडली तर अन्य जणांची राहण्याची सोय सेटवरच केली आहे. त्यामुळे बाहेरील कुणीही व्यक्ती येऊ शकत नाही. त्यामुळे संपर्कात फारसे कुणी येत नाही. डाॅक्टर दररोज येतात आणि सगळ्यांचे चेकअप करतात. शिवाय काम तर केलेच पाहिजे. घरी बसून काही उपयोग नाही. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घेणे आणि काम करणे महत्वाचे. सेटवर कुणाला सर्दी जरी झाली तरी चित्रीकरण करायला देत नाहीत. प्राॅडक्शन हाऊसबरोबरच आपणदेखील आपली काळजी घेतली पाहिजे.
----
महिन्याभरात सोन्याची झळाळी उतरली; वाचा आजचे दर

अनिता दातेच्या झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेचे चित्रीकरण इगतपुरी येथे सुरू आहे. ती म्हणते, की कोरोना सगळीकडे पसरला आहे आणि तो कसा होईल व कुठून येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपणच आपली काळजी घेणे आवश्यक झाले आहे. आमच्या सेटवर दरोज तापमान तपासले जाते. संपूर्ण सेट सॅनिटाईज केला जातो. परंतु कधी
कधी काय होते की काही कलाकार निष्काळजी घेतात. फारशा गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला सर्दी वगैरे किंवा ताप आला असेल तर चित्रीकरणात सहभागी होऊ नये. किवा युनिटने चित्रीकरण थांबविले पाहिजे. कारण एका व्यक्तीमुळे संपूर्ण युनिटवर त्याचा परिणाम होऊ शकतो. प्राॅडक्शन हाऊस आमची सगळ्यांची काळजी घेते. वाहिनीतडूनही खूप काळजी घेतली जाते. परंतु आपणदेखील आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. वरिष्ठ कलाकार चित्रीकरणात सहभागी झाला तर त्यांची अधिक काळजी घेतली पाहिजे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Films in the Corona period how the filming of the series goes artists