Budget 2021: अर्थसंकल्पात मनोरंजन क्षेत्राच्या तोंडाला पुसली पाने

स्वाती वेमूल
Monday, 1 February 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. मात्र जवळपास एक तास 49 मिनिटांच्या भाषणात त्यांनी मनोरंजन क्षेत्राचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही.

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला असून त्यांनी अर्थसंकल्पात जवळपास प्रत्येक क्षेत्रासाठी काहीतरी जाहीर केलं. मात्र जवळपास एक तास 49 मिनिटांच्या भाषणात त्यांनी मनोरंजन क्षेत्राचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही. आधीच करोनाच्या महामारीमुळे मनोरंजन क्षेत्राला मोठा फटका सहन करावा लागला होता. अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत, तर चित्रपटगृहे बंद असल्यामुळे अनेक निर्मात्यांचे नुकसानही झाले. त्यामुळे किमान अर्थसंकल्पातून तरी या क्षेत्राला थोडाफार दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यातही मनोरंजन क्षेत्राची निराशा झाली आहे. 

करमणूक कर कमी करण्याची मागणी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे केली जात होती. जीएसटी आणि अर्थसंकल्पात करमणूक कर कमी करण्याची मागणी वारंवार केली गेली, मात्र याकडेही साफ दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं. "दुर्देवाने अर्थसंकल्पात मनोरंजन क्षेत्राचा उल्लेखच झाला नाही. पण किमान कोणतंही अधिकचं ओझंसुद्धा टाकलं गेलं नाही हे बरं झालं. करोनामुळे मनोरंजन क्षेत्राला खूप मोठा फटका बसला आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील असतील अशी मी अपेक्षा करतो," अशी प्रतिक्रिया चित्रपट प्रदर्शिक अक्षय राठी यांनी 'पिंकविला'शी बोलताना दिली. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ११ वाजता सुरु केलेलं अर्थसंकल्प वाचन १२ वाजून ५० मिनिटांनी थांबवलं. अर्थसंकल्प सादर करताच शेअर बाजारात मोठी उसळी पहायला मिळाली.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

finance minister nirmala sitharaman ignores entertainment industry during budget 2021


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: finance minister nirmala sitharaman ignores entertainment industry during budget 2021