esakal | अनुराग, तापसीकडून तब्बल ६५० कोटींची हेराफेरी; आयकर विभागाला सापडले महत्त्वाचे पुरावे
sakal

बोलून बातमी शोधा

anurag taapsee

मुंबई आणि पुण्यातील २८ ठिकाणी आयकर विभागाचे धाडसत्र सुरू

अनुराग, तापसीकडून तब्बल ६५० कोटींची हेराफेरी; आयकर विभागाला सापडले महत्त्वाचे पुरावे

sakal_logo
By
स्वाती वेमूल

दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक विकास बहल व मधू मंटेना यांच्या मुंबई व पुणे इथल्या संपत्तीवर आयकर विभागाने बुधवारी धाडी टाकल्या. आयकर विभागाची छापेमारी सलग दोन दिवस सुरू होती. 'फँटम फिल्म्स' या कंपनीने कर बुडवल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली होती. या कंपनीच्या उत्पन्नात तब्बल ६५० कोटी रुपयांची हेराफेरी झाल्याचं आयकर विभागाला समजलं आहे. बॉक्स ऑफिसवर झालेल्या कमाईतही बरीच तफावत दाखवल्याची माहिती आयकर विभागाने दिली. 

याविषयी अधिक माहिती देताना अधिकारी म्हणाले, "जवळपास ३०० कोटी रुपयांच्या तफावतीबद्दल प्रॉडक्शन हाऊसचे कर्मचारी स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. तापसी पन्नूच्या नावाने पाच कोटी रुपयांची कॅश रिसीटही सापडली आहे, ज्याचा पुढील तपास सुरू आहे." त्याचसोबत ३५० कोटींची करचोरी झाल्याचेही पुरावे सापडल्याचे आयकर विभागाने सांगितले. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून छापेमारीची कारवाई अद्याप सुरूच आहे. 

बुधवारी मुंबई आणि पुण्यातील २८ ठिकाणी आयकर विभागाने छाडी टाकल्या. रिलायन्स एंटरटेन्मेंट ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिबासिश सरकार, टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वान (KWAN) आणि एक्सीड यांच्याशी संबंधित संपत्तींवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. यादरम्यान सात बँक लॉकर असल्याचीही माहिती समोर आली आहे. पुढील दोन-तीन दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याचं कळतंय. 

'फँटम फिल्म्स'बाबतची माहिती- 
२०११ मध्ये अनुराग कश्यप, निर्माते-दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने, निर्माता विकास बहल, निर्माते-वितरक मधू मंटेना यांनी 'फँटम फिल्म्स' नावाची कंपनी सुरु केली होती. या कंपनीने 'क्वीन', 'लुटेरा', 'एनएच १०', 'मसान', 'उडता पंजाब' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. मात्र २०१८ मध्ये ही कंपनी विसर्जित करण्यात आली. त्यानंतर अनुराग कश्यपने 'गुड-बॅड फिल्म्स' तर मोटवाने यांनी 'आंदोलन फिल्म्स' या नावाने स्वतंत्र कंपन्या सुरु केल्या. 'फँटम कंपनी'ने केलेल्या अंतर्गत आर्थिक व्यवहारांची तपासणी आयकर विभागाकडून होत आहे. त्याचप्रमाणे या छाप्यांमधून कर बुडवल्याच्या पुराव्यांची शोधाशोध करण्यात आली, अशीही माहिती समोर येत आहे. 

अनुराग आणि तापसीने २०१८ मध्ये 'मनमर्जिया' या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. सध्या ते 'दोबारा' या चित्रपटासाठी एकत्र काम करत आहेत.

loading image