Video : नचिकेतची रोमॅंटिक ‘गर्लफ्रेंड’ येतीय!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

बिनधास्त आणि गूढ स्वभावाच्या अलिशाला सरळमार्गी, सज्जन असा नचिकेत प्रधान भेटतो; मग पुढे काय होतं, याचं मजेशीर आणि तितकंच भावनिक चित्रण असलेला ‘गर्लफ्रेंड’ हा मराठी चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित होतोय. सई ताम्हणकर आणि अमेय वाघ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतील.

पुणे : बिनधास्त आणि गूढ स्वभावाच्या अलिशाला सरळमार्गी, सज्जन असा नचिकेत प्रधान भेटतो; मग पुढे काय होतं, याचं मजेशीर आणि तितकंच भावनिक चित्रण असलेला ‘गर्लफ्रेंड’ हा मराठी चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित होतोय. सई ताम्हणकर आणि अमेय वाघ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतील. 

आजकाल सोशल मीडियाने भरलेल्या या जगात फिट होण्यासाठी ‘गर्लफ्रेंड’ असणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि प्रतिष्ठेचं झालं आहे. अशातच साध्या सरळ आणि ग्राफिक डिझायनर असलेल्या नचिकेतच्या सगळे मागे लागलेत की गर्लफ्रेंड पटव! आश्‍चर्य म्हणजे त्याला याच दरम्यान भेटते ती मनस्वी अलिशा. नचिकेत आणि अलिशाच्या स्वभावात बरंच अंतर असलं तरी दोघं एकत्र राहतात का, त्यांचं प्रेम कसं बहरतं आणि या सगळ्यांत नचिकेतला गर्लफ्रेंड मिळाली म्हणून इतर सगळे खुश होतात का, याची उत्तर चित्रपटातच मिळतील. 

‘मला खूप दिवसांनी माझ्याच वयाची भूमिका करायला मिळाली आहे म्हणून मी खुश आहे,’ अशी भावना सई ताम्हणकरने व्यक्त केली, तर अमेय म्हणाला, ‘माझ्या स्वभावापेक्षा खूप वेगळा असा हा नचिकेत आहे आणि अशाच भिन्न स्वभावाच्या भूमिका करणं मला आव्हानात्मक वाटतं.’ ‘माझा हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याने या सगळ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मजा आली,’ अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक उपेंद्र सिधये यांनी व्यक्त केली. ‘चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केल्याने ‘गर्लफ्रेंड’ प्रदर्शनापूर्वीच सगळीकडे पोहोचला आहे,’ असे निर्माते अनिश जोग यांनी सांगितले. रणजित गुगळे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 

नचिकेतच्या आईच्या भूमिकेत कविता लाड, तर वडिलांच्या भूमिकेत यतिन कार्येकर दिसतील. याचबरोबर रसिका सुनील, ईशा केसकर, सुयोग गोऱ्हे अशी कलाकार मंडळी या रोमॅंटिक, कॉमेडी अशा ‘गर्लफ्रेंड’मध्ये दिसतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girlfriend movie will be release on 26 july