नवा चित्रपट : गली बॉय

नवा चित्रपट : गली बॉय

जगण्याच्या आकांक्षांचा गहिरा पट
 

आई-वडिलांच्या अपेक्षा, त्यांनी शिक्षणावर केलेला खर्च व त्यामुळं त्यांनी सांगितलेलंच करिअर करण्याची पाल्यांवर होणारी सक्ती व या सर्वांत मुलांनी आपल्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा, स्वप्नं, कलागुण यांना दिलेली तिलांजली हे भारतातील प्रत्येकच घरातील दृश्‍य...झोया अख्तर दिग्दर्शित व रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेला 'गली बॉय' हा चित्रपट याच पारंपरिक संघर्षाला पुढं आणतो. भारतात रुजू पाहणाऱ्या रॅप संस्कृतीच्या पार्श्‍वभूमीवर धारावीच्या झोपडपट्टीत राहून मोठी स्वप्नं पाहणाऱ्या मुलांच्या वेगळ्याच विश्‍वाची ओळख करून देतो. रणवीर आणि आलिया भटचा जबरदस्त अभिनय, संवाद, छायाचित्रण व मांडणीतील नावीन्य यांच्या जोरावर अंगात झिरपत जात हा चित्रपट वेगळाच अनुभव देतो. 

'गली बॉय'च्या सुरवातीच्या प्रसंगात एक गुंड रात्रीच्या अंधारात कार चोरत असतो व मुराद (रणवीर सिंग) हा त्याचा तिसरा साथीदार बनून त्याला स्वतःच्या मनाविरुद्ध मदत करण्याचा प्रयत्न करीत असतो. धारावीच्या झोपडीत राहणारा व कोणताही आत्मविश्‍वास नसणारा हा तरुण आपल्या आसपास दिसणारं दुःख, दारिद्य्र, अन्याय पाहात असतो व तो शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. बापानं (विजय राज) केलेलं दुसरं लग्न व त्यामुळं आईला (अमृता सुभाष) होणाऱ्या यातना निमूटपणे सहन करीत असतो. बाप शिक्षणावर खर्च करतो म्हणून सर्व सहन करीत असतो. मोठी स्वप्नं पाहायची नाहीत, आपल्या लायकीत राहायचं हा शब्दांचा भडिमार सहन करीत शिक्षण पूर्ण करीत असतो. सफिना (आलिया भट) ही मेडिकलचा अभ्यास करणारी तरुणी त्याच्या प्रेमात आहे व मुरादला आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी बळ देते. त्याच्यावर जिवापाड प्रेम करते व दोघांच्या रस्त्यात येणाऱ्या प्रत्येकाला खाऊ की गिळू करते! कॉलेजच्या आवारात मुराद रॅप कलाकारांचा एक परफॉर्मन्स पाहतो व आपल्या शब्दांमध्येही अशीच काहीतरी जादू असल्याचं त्याला जाणवतं. त्या ग्रुपशी ओळख करून घेत तो आपलीही गाणी सादर करण्याची त्यांना विनंती करतो. एमसी शेर (सिद्धार्थ चतुर्वेदी) हा रॅपर त्याला तिथं भेटतो आणि शब्द आणि ताल यांचा मेळ घालत रॅप सादर करायला सांगतो. हा रॅप यू-ट्यूबवर चर्चेत येतो आणि मुराद 'गली बॉय' या नावानं गाजू लागतो. हमाल, बांधकाम मजूर, गर्दीत धक्के खात जाणारे कामगार यांच्या डोळ्यातील, मनातील दुःख व्यक्त करणारे हे रॅप एका नव्या जगाची ओळख करून देऊ लागतात. स्काय (कल्की कोचलीन) ही परदेशात संगीताचं शिक्षण घेणारी अभ्यासक मुरादला भेटते व त्यांचा पहिलाच अल्बम यू-ट्यूबवर तुफान गाजतो... 

चित्रपटाची कथा 'रॉकस्टार' या इम्तियाज अलीच्या चित्रपटाप्रमाणं अंगात भिनत जाणारी आहे. दिग्दर्शक स्वतः फारशी विधानं न करता प्रेक्षकांना अर्थ काढण्यासाठी जागा ठेवते. शहरातील चाळींमध्ये, झोपड्यांत राहणारे, शिकून नोकरीसाठी दारोदार भटकणारे अनेक तरुण 'मेरा वक्त आयेगा' या आशेवर जगताना आपण आजूबाजूला पाहतो, त्यांचीच ही कथा आहे. 'तेरी औकात क्‍या है,' असं विचारणाऱ्या बापाला 'माझ्यात काहीतरी गुण आहेत, समोरच्यानं औकात विचारण्याइतका मी टाकाऊ नाही,' असं सुनावणारा मुराद प्रत्येक घरात आहे. मी नोकरी केली, तूही नोकरीच कर, उगाच मोठी स्वप्न पाहू नको, असं म्हणणाऱ्या बापाला मी परिस्थितीनुसार स्वप्न पाहणार नाही, तर माझ्या स्वप्नांनुसार बाजूची परिस्थिती बदलणार, असं ठणकावणारा मुराद आजच्याच तरुणाईचं प्रतिनिधित्व करतो. याच तरुणाईच्या आकांक्षा, स्वप्नं त्यांच्याच भाषेत हा चित्रपट मांडतो आणि हेच त्याचं वेगळेपण ठरतं. 

रणवीर सिंग आपल्या भूमिकांत सातत्यानं वैविध्य आणतो आहे आणि ही भूमिका त्याच्या अभिनयाचा आणखी एक वेगळा पैलू समोर आणणारी ठरली आहे. कोणतंही ग्लॅमर नसलेली, एका सामान्य युवकाची भूमिका तो अक्षरशः जगला आहे. त्याच्या कारकिर्दीतील ही महत्त्वाची भूमिका ठरावी. आलिया भटनं मस्तीत आयुष्य जगणाऱ्या युवतीची भूमिका तेवढ्याच आत्मविश्‍वासानं साकारली आहे. सिद्धार्थ चतुर्वेदी वेगळ्या भूमिकेत वाहवा मिळवून जातो. विजय राज, अमृता व ज्योती सुभाष, कल्की आदींनी चांगली साथ दिली आहे. विजय मौर्य यांचे संवाद चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावतात. 

एकंदरीतच तरुणांच्या जगण्याच्या आकाक्षांचा हा गहिरा पट तुम्हाला हळवा करीत आयुष्याकडं पाहण्याची नवी दृष्टी देऊन जातो. 

स्टार : 4

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com