esakal | ऑन स्क्रीन : हेल्मेट; तडका हरवलेली ‘कॉमेडी’
sakal

बोलून बातमी शोधा

ऑन स्क्रीन : हेल्मेट; तडका हरवलेली ‘कॉमेडी’

ऑन स्क्रीन : हेल्मेट; तडका हरवलेली ‘कॉमेडी’

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर barmahesh@gmail.com

अत्यंत अवघडलेल्या स्थितीत अडकलेला नायक आणि त्यातून सुटताना त्याची झालेली तारांबळ हे विषय हिंदी चित्रपटांमध्ये हल्ली सहज हाताळले जाताना दिसतात. ‘हेल्मेट’ या चित्रपटामध्ये नायक कंडोम या शब्दामध्ये अडकला आहे आणि त्यातून सुटण्यासाठीची त्याची धडपड कथेत विनोदी पद्धतीनं मांडण्यात आली आहे. मात्र, कथा विनोदी अंगानं न्यायची, की या विषयाचं प्रबोधन करण्यासाठी ती गंभीर ठेवायची, या द्विधा मनःस्थितीमध्ये दिग्दर्शक सतराम रमानी अडकला आहे. त्यामुळं नायक अपारशक्ती खुराना याचीही पंचाईत झाली आहे व त्यामुळं तडका हरवलेली कॉमेडी प्रेक्षकांच्या नशिबी आली आहे.

‘हेल्मेट’ची कथा आहे लग्नसमारंभांमध्ये गाणी गात पैसा कमावणाऱ्या लकी (अपारशक्ती खुराना) या युवकाची. त्याचं रूपाली (प्रनूतन बहल) या तरुणीवर प्रेम बसलंय, मात्र तिचा गर्भश्रीमंत बाप (आशिष विद्यार्थी) लकीला आधी पैसा कमावून मगच लग्नाचा विचार करण्याचा सल्ला देतो. काहीतरी शॉर्टकट वापरल्याशिवाय श्रीमंत होता येणार नाही, असा विचार करीत लकी मोठी चोरी करण्याची योजना आखतो. या कामात सुलतान (अभिषेक बॅनर्जी) व मायनस (आशिष वर्मा) हे त्याचे दोन मित्र त्याला साथ देतात.

इलेक्ट्रिक गॅजेट्स घेऊन जाणारा ट्रक लुटून पैसा कमावण्याचा त्यांचा प्लॅन यशस्वी होतो, मात्र चोरलेल्या खोक्यांत मोबाईलच्या जागी कंडोमची पाकिटं मिळतात आणि या तिघांपुढं मोठा पेचप्रसंग उभा राहतो. ही पाकिटं विकून पैसा मिळवायचा, तर दारोदारी भटकून लोकांना कंडोमचं महत्त्व पटवण्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांना उमगतं. हा पर्याय खूप कष्टाचा आणि मार खायला लावणारा असूनही पैशांसाठी तो हा मार्ग पत्करतात आणि धमाल सुरू होते. या तिघांना कंडोम विक्रीतून पैसे मिळतात का, या योजनेचा त्यांना काय फायदा होतो आणि लकीला रूपाली मिळते का, या प्रश्‍नांची उत्तरं कथेच्या शेवटी मिळतात.

कंडोम या विषयाबद्दल शहरांमधील युवक-युवती अगदी सहज चर्चा करतात, त्यामुळंच दिग्दर्शकानं कथेसाठी ग्रामीण पार्श्‍वभूमी निवडली आहे. या शब्दाविषयी लोकांच्या मनात असलेली भीती दाखवण्यासाठी दिग्दर्शक काही प्रसंग निवडतो व लकीच्या हाती कंडोमचं घबाड सापडल्यानंतर कथा फुलवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अनेक हास्यस्फोटक विनोदाची निर्मिती शक्य असूनही अत्यंत रटाळ प्रसंगांची मालिका सादर होत राहते. त्यातच गाण्यांचा भडिमार वीट आणतो. लकी व त्याच्या मित्रांच्या कंडोम विकण्याच्या क्लृप्त्याही हशा वसूल करू शकत नाहीत व नंतर कथा फक्त सल्ला देण्याचं काम करीत राहते.

कथेत दम नसल्यानं कलाकारांचीही कोंडी झाली आहे. अपारशक्ती खुराना प्रथमच नायकाच्या भूमिकेत चमकला असला, तर तो सहनायकाच्या भूमिकेतून बाहेर पडलेला नाही. गंभीर व विनोदी प्रसंगांतही त्याचा अभिनय एकसारखाच वाटतो. अभिषेक बॅनर्जीचीही अशीच स्थिती झाली आहे. प्रनूतन बहलला फारशी संधी नाही आणि आहे त्यातही तिला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही.

loading image
go to top