esakal | 'खरंच सुन्न व्हायला झालंय'; हेमांगी कवी परिस्थितीसमोर हतबल

बोलून बातमी शोधा

hemangi kavi
'खरंच सुन्न व्हायला झालंय'; हेमांगी कवी परिस्थितीसमोर हतबल
sakal_logo
By
स्वाती वेमूल

संचारबंदी लागू करूनही राज्यातील रुग्णसंख्येत अपेक्षित घट होत नसल्याने संपूर्ण लॉकडाउन लागू करावा, असा सूर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटला. एकीकडे संपूर्ण लॉकडाउनचा विचार होत असताना दुसरीकडे कलाविश्वात काम करणाऱ्यांसमोर पुन्हा एकदा संकट उभं राहिलं आहे. अभिनेत्री हेमांगी कवीने फेसबुकवर याबाबत पोस्ट लिहित दुसऱ्यांदा तिची मालिका बंद पडल्याने दु:ख व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे 'थोडा अजून तग धरा', असं म्हणज तिने मालिकेच्या निर्मात्यांना कळकळीची विनंती केली आहे.

काय आहे हेमांगीची पोस्ट?

'सर्व नियमांचं पालन करून, खबरदारी घेऊन, ८५ जणांचा आमचा कंपू, टेस्ट केली तर त्यात एकही जण कोरोना पॉझिटिव्ह नव्हता. तरीही आमचा बळी गेला. स्वार्थी विचार असेल कदाचित. पण या लॉकडाउनचा फटका मला दुसऱ्यांदा बसतोय. माझं काय चुकलं? आमचं काय चुकलं? आम्ही का प्रत्येकवेळी भोगायचं? जीवनावश्यक सेवेच्या यादीत आम्ही मोडत नाही, मान्य. पण माझ्यासाठी हे जीवनावश्यकच आहे. हे बालिश आहे माहीत आहे पण खरंच सुन्न व्हायला झालंय. मागच्या वर्षीसुद्धा या लॉकडाउनमुळे स्टार प्लसवरची माझी सीरिअल ऑफ एअर करण्यात आली आणि यावर्षी देखील 'तेरी लाडली मैं'ने लॉकडाउनमध्ये आपला जीव सोडला. अशा वेळी कुठलं व्हेंटिलेटर, कुठलं रेमडेसिव्हिर कामाला का येत नाही? माझी इतर सर्व चॅनल्स, निर्मात्यांना, सिरिअलवाल्यांना एकच कळकळीची विनंती आहे. थोडा अजून तग धरा. असं अचानक बंद वगैरे करू नका. निदान या लॉकडाउमध्ये तरी. तुम्ही कधीच असा तडकाफडकी निर्णय घेणार नाही, खूप विचारांतीच असा निर्णय घेता, पण तरीही, ही कळकळीची विनंती आहे. सहानुभूती नको शाश्वती हवी!', अशी पोस्ट तिने लिहिली. यासोबतच्या हेमांगीने कवितेच्या काही ओळी पोस्ट केल्या आहेत.

कोरोना महामारी आणि त्यात लॉकडाउन या दुहेरी संकटामुळे सर्वच क्षेत्रातील लोकांना आर्थिक फटका सोसावा लागतोय. शूटिंग बंद पडत असल्याने, कलाकार कोव्हिड पॉझिटिव्ह येत असल्याने आणि सेटवरील कोव्हिडच्या सर्व नियमांचं पालन करताना येणारा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असल्यामुळे अनेक मालिका, चित्रपटांच्या निर्मात्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतोय.