
अंतर्वस्त्रांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीचं सडेतोड उत्तर
आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीची Hemangi Kavi सोशल मीडियावरील एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टद्वारे हेमांगीने सोशल मीडियावरील ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. अंतर्वस्त्रांवरून महिलांना ट्रोल करणाऱ्यांसाठी हेमांगीने ही पोस्ट लिहिली असून त्यात तिने तिचे विचार मोकळेपणे मांडले आहेत. 'घरात किंवा बाहेर अंतर्वस्त्र घालायचे की नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे', असं तिने म्हटलंय. हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओवर अनेकांनी तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केलं होतं. त्याच ट्रोलर्ससाठी हेमांगीने ही पोस्ट लिहिली आहे. (hemangi kavi slams trollers says wearing bra at home or outdoor is all my choice slv92)
'लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉईस असू शकतो. मग ती घरी असो किंवा सोशल मीडियावर किंवा कुठेही. त्यावरून जज करण्याचा, त्याबद्दल घाणेरड्या चर्चा किंवा गॉसिप करण्याचासुद्धा ज्याचा त्याचा चॉईस. अंतर्वस्त्रांचा लोकांसमोर किंवा सोशल मीडियावर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या इमेजचा जो काही संबंध जोडला जातो, त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती संघर्ष करायचा आहे हे लक्षात येतं. गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात', असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.
'याचा माझा संस्कारांशी किंवा उगीचच पाश्चिमात्य संस्कृती आत्मसात करण्याचं फॅड वगैरे म्हणून अशा कुठल्याच गोष्टींशी काही संबंध नाही. अरे किती ती बंधनं? किती ते लोक काय म्हणतीलचं ओझं व्हायचं? जगू द्या रे मुलींन, मोकळा श्वास घेऊ द्या. खरंतर हे सर्वांत आधी स्त्रियांनीच आपल्या मनावर बिंबवून घ्यायला हवं', असं तिने या पोस्टच्या शेवटी लिहिलं.
हेमांगीने याआधीही सोशल मीडियावर बेधडकपणे तिची मतं मांडली आहेत. ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणाऱ्या तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे.