'याला म्हणतात स्टारडम..'; हेमंत ढोमेने सांगितला 'किंग खान'चा इंग्लंडमधील १८ वर्षांपूर्वीचा किस्सा | Shah Rukh Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hemant dhome post about 18 year old incident in England about shah rukh khan stardom amide Pathaan controversy

'याला म्हणतात स्टारडम..'; हेमंत ढोमेने सांगितला 'किंग खान'चा इंग्लंडमधील १८ वर्षांपूर्वीचा किस्सा

शाहरुख खानचा चित्रपट सध्या पठाण बॉक्स ऑफिसवर सातत्याने नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. या प्रदर्शनापूर्वीपासून दीपिकाने परिधान केलेल्या बिकीनीच्या रंगावरून वादात सापडलेल्या या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान मराठी चित्रपट अभिनेता हेमंत ढोमे याने सोशल मीडियावर पोस्ट करत शाहरुख खान बद्दलचा एक जुना किस्सा सांगितला आहे.

काल तब्बल चार वर्षांनंतर शाहरूखचा चित्रपट प्रदर्शित झाल्याने लोकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. लोकांनी मोठ्या संख्येने चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. यानंतर हेमंतने त्याच्या इंग्लंडमधील कॉलेजच्या दिवसातील शाहरूखानच्या स्टारडमचा एक १८ वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला आहे.

त्याने ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्याने लिहीलं की, "मी इंग्लंडमधे असताना शिक्षण संपल्या नंतर काही काळ नोकरी करत होतो… एक दिवस कामावर निघालो ट्युब स्टेशन वर आलो आणि कळलं आजचा प्रवास मोफत असणार आहे… चौकशी केल्यानंतर लक्षात आलं आज शाहरूख खान चा कार्यक्रम आहे लेस्टर स्केअर ला… म्हणुन तिथल्या सरकारने सर्वांसाठी प्रवास मोफत केलाय…"

याला म्हणतात स्टारडम..

पुढे तो म्हणातो की, "मग लक्षात आलं ते स्टारडम म्हणजे काय असतं… आपल्या देशाबाहेर आपल्यासाठी तिथलं सरकार प्रवास मोफत करतं तुमचं काम सेलिब्रेट करतं! कमाल! आज पठाणच्या निमित्ताने १८ वर्षांपुर्वीचा किस्सा आठवला… आजही त्या माणसाची जादू कायम आहे… हे खूप प्रेरणागायी आहे…"

शाहरूखचं केलं कौतुक, म्हणाला...

हेमंतने त्याच्या पोस्टमध्ये किंग खानचं कौतुक देखील केलं आहे, त्याने लिहीलं की, "एका सामान्य घरातून आलेला एक सामान्य मुलगा आपल्या मेहनतीने आणि हुशारीने कुठल्या कुठे जाऊ शकतो याचं हे उदाहरण… आपण शांतपणे आपलं काम करावं मेहनत करावी… आपलं कामंच बोलतं! बाकी अडचणी वगैरे येतच राहतात… आपण पुढे जात रहावं!"

टॅग्स :Shah Rukh Khanmovie