
Hemant Dhome: धमकी प्रकरणावर हेमंत ढोमेची पहिली प्रतिक्रिया; 'ते' ट्विट डिलीट करण्यामागचं सांगितलं खरं कारण
अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेला सोशल मीडियावर बिनधास्तपणे ट्विट करणं चांगलंच महागात पडलं आहे. एक ट्विट केल्यानंतर त्याला धमकी मिळाली आणि काही वेळातच ते ट्विट हेमंतने हटवलं.. पण नेमकं ते ट्विट काय होतं, धमकी काय होती आणि सर्वांना निर्भीडपणे तोंड देणाऱ्या हेमंतने ते का डिलिट केलं, याविषयी हेमंतने 'सकाळ'कडे पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
(hemant dhome reaction on his deleted tweet about shah rukh khan pathaan, he said it's fake ID)
सोशल मीडियावर प्रचंय सक्रिय असणाऱ्या हेमंतने नुकतेच एक ट्विट शेयर केले होते. यामध्ये त्याने 'स्टारडम काय असतं..' हे सांगत अभिनेता शाहरुख खानचा अनुभव सांगत कौतुक केलं होतं. 'पठाण'ला मिळालेलं यश पाहून त्याने ही ट्विट केलं होतं.
हेमंतचं ट्विट..
या ट्विट मध्ये हेमंत म्हणाला होता, "मी इंग्लंडमधे असताना शिक्षण संपल्या नंतर काही काळ नोकरी करत होतो… एक दिवस कामावर निघालो ट्युब स्टेशन वर आलो आणि कळलं आजचा प्रवास मोफत असणार आहे… चौकशी केल्यानंतर लक्षात आलं आज शाहरूख खान चा कार्यक्रम आहे लेस्टर स्केअर ला… म्हणुन तिथल्या सरकारने सर्वांसाठी प्रवास मोफत केलाय…"
"मग लक्षात आलं ते स्टारडम म्हणजे काय असतं… आपल्या देशाबाहेर आपल्यासाठी तिथलं सरकार प्रवास मोफत करतं तुमचं काम सेलिब्रेट करतं! कमाल! आज पठाणच्या निमित्ताने १८ वर्षांपुर्वीचा किस्सा आठवला… आजही त्या माणसाची जादू कायम आहे… हे खूप प्रेरणागायी आहे…" असे ट्विट हेमंतने केले होते.
पण याच ट्विट ने त्याला आता अडचणीत आणले आहे. ही ट्विट धादांत खोटे असून वास्तवात असे काहीच घडले नाही असा दावा इंग्लंडच्या नाना सरांजमे यांनी केला आहे.
धमकीचं ट्विट..
एक ट्विट करत त्यांनी लिहिलं आहे की, 'ही सगळं खोटं आहे. गेली 20 वर्षे मी इथे इंग्लंड मध्ये राहतोय. पण आजवर कधीही तिथल्या परिवहन संस्थेने अशी सवलत दिलेली नाही. किंबहुना शाहरुख किंवा कोणत्याच अभिनेत्यासाठी असा मोफत प्रवास इथे लागू केला नाही.' असे त्यांनी ट्विट केले.
पुढे त्यांनी लिहिलं आहे, 'हेमंत ढोमे, चुकीची माहिती पसरवणारे ही ट्विट जर तुम्ही डिलिट केले नाही किंवा मागे घेतले नाही तर खोट्या बातम्या परसावल्या प्रकरणी मी इंग्लंड मधील संबंधित अधिकाऱ्याकडे मी तुमच्या विरोधात तक्रार करेन. ' असे अत्यंत परखडपणे लिहिले होते.
यानंतर काही वेळातच हेमंतने आपले ट्विट डिलिट केले. पण ट्विट डिलिट करण्या एवढं असं नेमकं झालं याविषयी हेमंतने 'सकाळ'शी संवाद साधला आहे.
मोठा खुलासा..
सकाळशी बोलताना हेमंत म्हणाला, 'मुळात ज्यांनी मला धमकी देणारं ट्विट केलं आहे ते फेक अकाऊंट म्हणजे खोटी व्यक्ती आहे. माझं ट्विट पाहून ते जाणीवपूर्वक करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मी हे ट्विट पाहून किंवा या धमकीला घाबरून ट्विट डिलिट केले नाही.
तर त्या ट्विटवर अत्यंत घाणेरड्या, किळसवाण्या आणि आई बहिणीवरून वाटेल त्या भाषेत शिव्या देत लोकांनी कमेंट केल्या होत्या. त्या कमेंट अगदी जातीवादी आणि धर्मवादी ही झाल्या होत्या. हे खूपच धक्कादायक होतं.
म्हणून मी सुरवातीला काही कमेंट डिलिट केल्या, पण हे सत्र थांबेच ना, म्हणून मी ट्विटच डिलिट केलं. मला माझ्या ट्विट मुळे कसलेही राडे नको आहेत. किंबहुना इथून पुढे हिंदू - मुस्लिम किंवा जातीय विषयांवर मी बोलणंच बंद करणार आहे. ' अशी नाराजी त्याने व्यक्त केली.