भारतातील रिमेक्सची कहाणी 'रि-मेक इन इंडिया'

भारतातील रिमेक्सची कहाणी 'रि-मेक इन इंडिया'

बॉलीवूडमध्ये जुन्या, इतर भाषेतील चित्रपटांचे रिमेक करण्याची लाट आली आहे. जे चित्रपट त्या त्या कालखंडात माईलस्टोन ठरलेत, अशा गाजलेल्या कलाकृतींचे काही रिमेक आजच्या प्रेक्षकांना सिनेमागृहांत घेऊन जाण्यात यशस्वी ठरले, तर काही रिमेकवर प्रेक्षक रुसल्याचेही बॉलीवूडने पाहिले आहे, त्याचा हा आढावा...


जुनी दारू नव्या बाटलीत भरून विकण्याचे धंदे काही नवीन नाहीत. हिंदी चित्रपटसृष्टी तर यात नेहमीच दोन पावेले पुढे. अगदी ७० च्या दशकापासून बॉलीवूडमध्ये जुने गाजलेले किंवा इतर भाषेतील हिट चित्रपट पुन्हा नव्या ढंगात, नव्या रंगात आणि नव्या कलाकारांना घेऊन तयार करण्याचा व्यवसाय सुरू आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे पुढील महिन्यात येणारा ‘पती, पत्नी और वो’. हा १९७८ मधील याच नावाच्या चित्रपटाची रिमेक. संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजिता यांच्या त्या चित्रपटाने तेव्हा धमाल उडवून दिली होती. विवाहबाह्य संबंध या विषयावरचा हा चित्रपट. ७० च्या दशकात एखाद्या विवाहित पुरुषाने आपल्या कार्यालयातील कर्मचारी तरुणीला पटविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अगदीच नवल आणि खळबळ उडविणारे होते. आज त्या प्रश्नाची तीव्रता तेवढी राहिलेली नाही. विवाह न करता एकत्र राहणे यालाही आज समाजमान्यता मिळालेली आहे. असे वातावरण असताना तो चित्रपट पुन्हा तयार करण्याचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी का योजिले आहे, हा प्रश्नच आहे.

केवळ हीच रिमेक येतेय, असेही नाही. पुढच्याच महिन्यात आमीर खानचा लालसिंग चढ्ढा नावाचा चित्रपटही येतोय. तो टॉम हॅंक्‍सच्या फॉरेस्ट गम्पचे ‘भाषांतर’ आहे असे म्हणतात. एक वेळ हे असे इतर भाषेतील चित्रपट आपल्या भाषेत आणणे हे आपण समजू शकतो. त्याची तशी जुनी आणि मोठी परंपराही आहे आपल्याकडे. राज कपूरचा ‘चोरी चोरी’ किंवा आमीर खानचा ‘दिल है के मानता नही’ (मूळ चित्रपट - फ्रॅंक काप्राचा ‘इट हॅपन्ड वन नाईट’), अमिताभचा ‘मैं आझाद हूं’ (मीट जॉन डो), तरुणांना प्रचंड भावलेला ‘जो जिता वो सिकंदर’ (ब्रेकिंग अवे), ‘अकेले हम अकेले तूम’ (क्रॅमरव्हर्सेस क्रॅमर) अशी याची किती तरी उदाहरणे देता येतील. मध्यंतरी आपल्या मराठीतला ‘सैराट’ हिंदीत ‘धडक’ बनून आला होता. दक्षिणेकडील कितीतरी चित्रपट हिंदीत आले आहेत. सलमान खान, अक्षय कुमार याचे अनेक गाजलेले चित्रपटही दक्षिणेतील चित्रपटांची रिमेक आहेत. प्रश्न येतो तो हिंदीतील चित्रपट पुन्हा हिंदीतच आणले जातात तेव्हा...

मुळात रिमेक तयार करणे का सुरू झाले किंवा केले जातात, याचे कारण, यात कष्ट कमी, यशाची हमी बऱ्यापैकी. कारण रिमेक हे आधीच यशस्वी झालेल्या चित्रपटांचेच केलेले असतात. लोकांना आवडलेल्या कथांना जर नव्या जमान्याचा रंग देऊन पुन्हा लोकांसमोर आणले, तर चांगली कमाई केली जाऊ शकते आणि नव्या कलाकृतीत नक्की काय बदल केले आहेत, हे पाहण्यासाठी लोक नक्कीच येणार, या विश्वासामुळे निर्माते आणि दिग्दर्शक रिमेक तयार करत असतात. तसेच कोणताही नवीन प्रयोग करायचा म्हटला, तर तो कितपत यशस्वी होईल, प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील का, या सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यापेक्षा काही निर्माते आणि दिग्दर्शक थेट रिमेकच करायला पसंती देतात.

मात्र रिमेक तयार करणंदेखील एक प्रकारची जोखीमच असते. कारण रिमेक हा एका हिट सिनेमाचाच तयार केला जातो. त्यामुळे प्रत्येक रिमेकवर काम करत असताना आधीच्या कलाकृतीच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही, याची खास काळजी घ्यावी लागते. त्यात नवीन कलाकार आणि काही बदलांसह प्रेक्षक रिमेकला पूर्वीच्या सिनेमासारखा प्रतिसाद देतील का, याची काहीच कल्पना नसल्याने रिमेक तयार करताना फार विचार करावा लागतो. 

आतापर्यंत आलेल्या रिमेकमध्ये अनेक प्रकारची उदाहरणे आहेत. काही रिमेक हिट ठरले आहेत, तर काही फ्लॉप; मात्र या सगळ्या उदाहरणानंतर आणि जोखमीनंतरदेखील रिमेक तयार करणे बॉलीवूडमध्ये सुरूच आहे. कारण बॉलीवूडमध्ये रिमेकची ताकद इतकी आहे की, सद्यस्थितीला कित्येक सुपरस्टार रिमेक करूनच आपले खिसे भरत आहेत.

आजकाल या रिमेकमुळे मूळ चित्रपटदेखील प्रेक्षकांना माहीत होऊ लागला आहे. उदाहरणार्थ, काही महिन्यांपूर्वी आलेला सुपरहिट सिनेमा ‘कबीर सिंग’ हादेखील दाक्षिणात्य चित्रपट अर्जुन रेड्डीचाच हिंदी रिमेक आहे. कबीर सिंग इतका गाजला की गेली कित्येक वर्षे मेहनत घेत असलेल्या शाहिदला अतिमत: हवी ती प्रसिद्धी मिळाली.
दाक्षिणात्य आणि हॉलीवूडसह हिंदीतील जुन्या चित्रपटांच्या रिमेकची ही परपंरा बरीच वर्षे जुनी असून अगदी २२ वर्षांपूर्वीचा गोविंदाचा सुपरहिट चित्रपट ‘हिरो नंबर १’देखील वर्षे जुन्या बावर्ची चित्रपटाच्या कथेवरच आधारित आहे. ‘बावर्ची’ आणि ‘हिरो नंबर १’ मधील कथेत बरेच बदल असले, तरीदेखील त्यांतील मुख्य पात्रात बरेच साम्य असल्याने याला रिमेक म्हणता येईल.

यासारखेच आणखीही काही प्रयोग बॉलीवूडमध्ये करण्यात आले आहेत. सुनील दत्त यांचा पडोसनच्या कथेला धरून ‘नयी पडोसन’ तयार करण्यात आला होता. या प्रकाराचे काही प्रयोग यशस्वी झाले, तर काही अयशस्वी. आता वरील दोन सिनेमांचेच उदाहरण घेतले, तर हिरो नंबर १ जबरदस्त हिट झाला; तर तोच नयी पडोसन मात्र फ्लॉप झाला. आता या दोन्ही चित्रपटांत तसे काही फरकदेखील होते. स्टारकास्ट, बजेट यांसारख्या बाबींचा परिणामदेखील झाला. कारण हिरो नंबर १ आला तेव्हा गोविंदा बॉलीवूडमध्ये कमालीचा हिट चालला होता. त्यासोबतच करिश्‍मा कपूर, परेश रावल आणि कादर खान यांच्या अभिनयाने हा चित्रपट आणखीच लोकप्रिय झाला. नयी पडोसनच्या बाबतीत मात्र या सर्वच बाबींची कमतरता होती. नवखे कलाकार, कमी बजेट या सगळ्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात काही खास घर करू शकला नाही.

या चित्रपटांव्यतिरिक्त काही प्रयोग असेही झाले आहेत आणि होत आहेत की ज्यात सिनेमाची कथा संपूर्णपणे पूर्वीच्या सिनेमासारखीच असते. फक्त त्यात काळानुसार काही बदल केले जातात. त्यात त्यातील पात्रांचे राहणीमान, व्यवसाय यांसारख्या बदलांव्यतिरिक्त इतर सर्व काही जुन्या सिनेमाप्रमाणेच असते. काही सिनेमांची नावेही तीच ठेवण्यात येतात. जसे की, देवदास, अग्नीपथ, कर्ज. आता यातील प्रत्येक सिनेमाची आपली वेगळी काही खासियत आहे. ‘देवदास’ म्हटला तर सुपरहिट कलाकारांना घेऊन तयार करण्यात आलेला सिनेमा. कारण १९५५ मध्ये आलेल्या देवदासमध्ये तेव्हाचे आघाडीचे कलाकार दिलीप कुमार आणि सुचित्रा सेन होते; तर २००२ च्या देवदासमध्ये सध्याचा सुपरस्टार शाहरुखसह ऐश्वर्याची जोडी दिसून आली. या दोन्ही चित्रपटात ४७ वर्षांचे अंतर असले, तरी दोन्हींची कथा आणि संपूर्ण सिनेमे अगदी एकमेंकासारखेच होते. तसेच अग्निपथ चित्रपटाच्या बाबतीतही हे साम्य आहे. कारण दोन्हींमध्ये त्या त्या काळचे आघाडीचे अभिनेते घेण्यात आले होते.

१९९० च्या अग्निपथमध्ये अमिताभजी; तर २०१२ च्या सिनेमात हृतिकने मुख्य भूमिका साकारली होती. नव्या अग्निपथला त्यातील खलनायकाने अर्थात संजय दत्तने साकारलेल्या कांचा चिनाने तारले आणि या सिनेमानेदेखील जुन्या अग्निपथप्रमाणे बॉक्‍सऑफिसवर ‘आग’ लावली. असाच साम्य असणारा कर्ज. जितका ऋषी कपूर यांचा कर्ज (१९८०) बॉक्‍स आफिसवर सुपरहिट ठरला होता. तितक्‍याच जोरात हिमेश रेशमियाचा कर्ज (२००८) सुपरफ्लॉप ठरला. वरुण धवनचा जुडवा २ (२०१७) देखील सलमान खानच्या जुडवा (१९९७) इतका हिट झाला नाही. 

१९७८ मध्ये आलेल्या अमिताभ यांच्या ‘डॉन’ला आजपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दर्जेदार कलाकृती अशी ओळख आहे. याचाच रिमेक २००६ मध्ये फरहान अख्तरने ‘डॉन’ नावानेच केला. बॉलीवूडचा बादशाह शाहरुखने यात मुख्य भूमिका साकरली. जुन्या डॉनप्रमाणेच यानेदेखील बॉक्‍सऑफिसवर चांगलीच कमाई केली. नव्या ‘डॉन’चा आता सिक्वेलही आला असून, सध्या त्याच्या तिसऱ्या पार्टची चर्चा बी टाऊनमध्ये सुरू आहे. त्यामुळे डॉन हा असा एकमेव रिमेक आहे, जो इतका हिट ठरला, की त्याचा सिक्वेलदेखील तयार करण्यात आला.  

आतापर्यंत बॉलीवूडमध्ये अनेक रिमेक आले. अजून कितीतरी येत आहेत. त्यामुळे भविष्यात नक्की कोणते रिमेक येणार आणि प्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद देणार, याची उत्सुकता चित्रपटसृष्टीला असणार आहे.

web title : history of Remakes in Indian cinema

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com