कोरोना काळात मालिकांचं शुटिंग करताना सेटवर कशी काळजी घेतात? वाचा

अरुण सुर्वे 
Wednesday, 23 September 2020

  • निर्मात्यांकडून कलाकारांसह तंत्रज्ञ, स्पॉटबॉय, कॅमेरामनला सुविधा

पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच प्रत्येकाला पावलोपावली काळजी घ्यावी लागत आहे. त्यातच चित्रीकरण म्हटले तर खूप काळजी घ्यावी लागते, असे मालिकांच्या निर्मात्यांसह कलाकारांनी सांगितले. तसेच, आम्ही कलाकारांसह तंत्रज्ञ, स्पॉटबॅय, कॅमेरामन यांना योग्य त्या सुविधाही पुरवत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्‍वेता शिंदे (निर्माती) : मी 'डॉक्‍टर डॉन' या मालिकेत अभिनय करत असून अन 'देवमाणूस' या मालिकेची निर्माती अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत आहे. त्यामुळे कलाकारांना कोणत्या अडचणी येतात अन सेटवर कोणत्या गोष्टी हव्या आहेत, याची मी जाणीवपूर्वक काळजी घेते. सेटवर ज्या गाड्या येतात, त्या पूर्णतः सॅनिटायझर केल्या जातात. वाफ घेण्याचं मशिन, सॅनिटायझर, ऑक्‍सिजन लेव्हल तपासणी वेळोवेळी केली जाते. सरकारने चित्रीकरणाला परवानगी दिली असली तरी कोरोना गेलेला नाही. त्यामुळे कमीतकमी लोकांमध्ये काम करून घेतले जात आहे. तसेच, बाहेरच्या लोकांना चुकूनही सेटवर येऊ देत नाही. कलाकारांच्या रूमही दिवसांतून दोन-तीनवेळा सॅनिटाइज केल्या जातात. मी सर्वांना सांगते की, सकाळी उठल्यानंतर कोरोना अद्यापही गेला नाही, याची स्वतःला आठवण करून द्या. त्यामुळे आपोआपच काळजी घेतली जाईल.

अतुल केतकर (निर्माते) : 'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या सेटवर मास्क, गरम पाणी आणि वाफ सर्वांसाठी सक्तीची केली आहे. यासोबत सर्दी, खोकला यांसारखी लक्षणे दिसली तर सक्तीची सुटी दिली जाते. माणसांची मर्यादा असल्यामुळे कामाच्या वेगावर नक्कीच परिणाम झाला आहे. मात्र, यात कुणाच्याही तब्येतीची हेळसांड करून चित्रीकरण केले जात नाही. सेटवर आम्ही मेकअप रुमची संख्याही वाढवली आहे. कलाकारांच्या शिफ्ट्‌स चित्रीकरणाच्या गरजेनुसार लावल्या जातात. सेटवरील तंत्रज्ञांना प्रवासी भत्ता सुरू केला आहे. जेणेकरून गर्दीतून त्यांना प्रवास करावा लागणार नाही. ज्युनिअर आर्टिस्टही ओळखीतले आणि कंटेन्मेंट झोनमधील नसतील याची खबरदारी घेतली जाते आहे. कलाकारही स्वत:चा मेकअप स्वत: करत आहेत.

प्राजक्ता गायकवाड (अभिनेत्री) : आशालता वाबगावकर आणि मी 'आई माझी काळूबाई' या मालिकेत अभिनय करत होते. त्यांची भूमिका असलेला भाग दोन दिवसांपूर्वीच सुरू झाला होता. त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा अन उत्साह असल्याचे क्षणोक्षणी दिसत होते. तसेच, त्या स्वतःची खूप काळजी घेत होत्या. मात्र, त्यांच्या अचानक जाण्याने आम्हा सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या अभिनेत्रीबरोबर काम करण्याची संधी हुकली आहे. खरंतर कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली तरी प्रत्येकाने काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझर अन सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. आम्हीही सेटवर सर्वतोपरी काळजी घेत आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to care while shooting in serials due to corona said shweta shinde atul ketkar prajakta gaikwad