मी अभिनय क्षेत्रात काम करायचे, असे काही ठरवले नव्हते. माझे आजी-आजोबा आणि बाबा रंगभूमीशी जोडलेले होते. त्यामुळे या क्षेत्राशी माझा तसाही संबंध जोडला गेला होता. आई-बाबांनी मला कधीच कोणतीही बंधने घातली नाहीत. मला अभिनयात काम करायचे आहे की नाही, हा निर्णय त्यांनी माझावरच सोपवला होता. पण आधी शिक्षण पूर्ण कर, असे मला सांगण्यात आले होते.
प्रीमिअर - मनीषा केळकर, अभिनेत्री

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केले. शाळेत असताना मी नाटकात आणि इतर स्पर्धेत भाग घेत होते, पण ते फक्त मजा म्हणूनच. कॉलेजमध्ये असताना मला वाटायला लागले, की आपण अभिनयात काम करावे. मी स्वतःला खूप नशीबवान समजते, की लहान वयापासूनच मला या क्षेत्राचा अनुभव घेता आला. आज त्या सगळ्या अनुभवांचा मला चांगलाच फायदा होत आहे. ‘यांचा काही नेम नाही’ हा माझा पहिला चित्रपट होता. या चित्रपटामध्ये मला अंकुश चौधरी, भरत जाधव, केदार शिंदे अशा दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. पुढे ‘घरट्यासाठी सर काही’, ‘भोला शंकर’सारख्या मराठी चित्रपटानंतर मला अभिजित सावंत यांच्याबरोबर हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यानंतर सातत्याने काम करत राहिले. आता मी हिंदी, इंग्रजी, मराठी आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम करत आहे.
याचबरोबर विविध नाटकांमध्ये, वेबसिरीज आणि काही कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. लवकरच माझी भूमिका असलेला ‘अंश’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच एका वेबसीरिजमध्येही मी प्रेक्षकांना दिसणार आहे. खरेतर या कामाची मला आवड आहे. त्यामुळे मी इतके चित्रपट करू शकले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करता आले.
प्रेक्षकांनीही मला नेहमीच प्रेम दिले. अभिनयाबरोबरच मला खेळाचीही आवड आहे. मी फॉर्म्युला फोर कार रेसर आहे. यासाठी दिग्दर्शकही मला नेहमीच पाठिंबा देत असतात. कामातून जसा वेळ मिळतो, त्यानुसार मी कार रेसिंगची ट्रेनिंग घेते. माझे फिटनेसकडेही तेवढेच लक्ष असते.
(शब्दांकन - अक्षता पवार)