
"अभिनेता म्हणून तो मला आवडायचा पण.."; सिद्धार्थला सायनाचं सडेतोड उत्तर
'रंग दे बसंती' फेम अभिनेता सिद्धार्थने (Siddharth) बॅडमिंटनपटू सायना नेहवालवर (Saina Nehwal) आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने तो आता अडचणीत आला आहे. एकीकडे नेटकरी संतप्त झाले असून त्याच्यावर टीका करत असताना आता सायनाने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. "तो अभिनेता म्हणून मला आवडायचा, पण त्याचं असं वागणं ठीक नाही", अशा शब्दांत तिने नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसंदर्भातील एक ट्विट सायनाने केलं होतं. तिच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. त्याच्या ट्विटवर राष्ट्रीय महिला आयोगानेही आक्षेप नोंदवत ट्विटरकडे अकाऊंट बंद करण्यासंदर्भातील मागणी केली आहे.
काय म्हणाली सायना?
"त्याला नेमकं काय म्हणायचं होतं, हे मला समजलं नाही. अभिनेता म्हणून मला तो आवडायचा पण त्याचं ट्विट योग्य नव्हतं. तो चांगल्या शब्दांत व्यक्त होऊ शकला असता, पण ते ट्विटर आहे. ट्विटरवर अशा शब्दांमुळे, कमेंट्समुळे तुम्ही चर्चेत राहता", अशा शब्दांत सायनाने प्रत्युत्तर दिलं.
नेमकं काय आहे प्रकरण-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेबाबत झालेल्या प्रकरणावरून सायनाने ट्विट करत तिचं मत मांडलं होतं. 'एखाद्या देशाचा पंतप्रधानच सुरक्षित नसेल तर तो देश सुरक्षित असल्याचा दावा करता येत नाही. मोदींवर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मी धिक्कार करते', असं ट्विट सायनाने केलं होतं. सायनाच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थने आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता.
हेही वाचा: ट्विटर अकाउंट बंद करा! सायनाबद्दल ट्विट करणाऱ्या सिद्धार्थवर भडकला महिला आयोग
वादानंतर सिद्धार्थचं स्पष्टीकरण-
सिद्धार्थने आपल्या ट्विटबाबत स्पष्टीकरण देणारं एक ट्विट केलंय. माझ्या ट्विटमध्ये 'COCK & BULL' असा संदर्भ होता. यामधून वेगळा अर्थ काढणं चुकीचं आणि दिशाभूल करणारं ठरेल. अनादर करण्यासारखी कोणतीही गोष्ट मनात नव्हती.
Web Title: I Used To Like Him As An Actor But This Was Not Nice Says Saina Nehwal On Siddharths Remark
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..