'माझी बिचुकलेंशी छान गट्टी जमली होती...'

दिपाली राणे-म्हात्रे
बुधवार, 31 जुलै 2019

६३ दिवसांच्या या प्रवासात माधवला बिग बॉसच्या घरात आलेले काही चांगले-वाईट अनुभव त्याने ई-सकाळला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

बिगबॉस मराठीच्या घरातून या आठवड्यात घराबाहेर पडला तो म्हणजे अभिनेता माधव देवचके..एक चांगला माणूस, एक चांगला मित्र म्हणून  बिगबॉस मराठीच्या घरात त्याने सगळ्यांच्याच मनात घरात केलं.. ६३ दिवसांच्या या प्रवासात माधवला आलेले काही चांगले-वाईट अनुभव त्याने ई-सकाळला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

प्रश्न- बिगबॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्याचं वाईट वाटतंय की इतक्या दिवसांनी घरातल्यांना भेटल्याचा आनंद वाटतोय ?
माधव- खूप मिक्स फिलींग आहेत. घरातून बाहेर पडल्याचं दुःख आहे..पण आता एकदम वेगळंच वाटतंय. ६३ दिवस घरात राहिल्यानंतर आता नक्कीच एक वेगळा माधव खूप काही शिकून बाहेर आलाय.  मला वाटलं नव्हतं मी एवढ्या लवकर घरातून बाहेर पडेन पण इट्स अ गेम. सगळ्यांची इतकी सवय झाली आहे की मी कदाचित माझ्या घरातल्यांना देखील नेहा, शिवानी, शिव अशा नावांनी हाक मारु शकतो.तेव्हा या सगळ्यातून बाहेर  यायला थोडा वेळ नक्कीच जाईल. 

प्रश्न- बिगबॉस मराठीच्या घरात जाताना कोणती गोष्ट सगळ्यात जास्त मिस केली होतीस ?
माधव- मला माझ्या घरातल्यांची आठवण येत होती, बायकोची आठवण येत होती पण मी या गोष्टींना माझ्यावर कधी हावी होऊ दिलं नाही.. मी तसं घरात जातानाच मनाशी पक्क केेलं होतं. 

प्रश्न- या घरात सगळ्यांनाच चांगले-वाईट अनुभव येत असतात तुझ्या बाबतीतला तुझा वाईट अनुभव कोणता ?
माधव- मला एकही वाईट अनुभव असा सांगता येणार नाही. उलट मीच सगळ्यांना सांगत होतो की माझ्याशी भांडा पण कदाचित माझ्या स्वभावामुळे कोणीच माझ्याशी वाईट वागलं नाही. हो. पहिल्या आठवड्यात मााझा आवाज चढलेला अभिजीत बिचुकले यांच्यावर तेव्हा मला मांजरेकर सरांनी ती चूक देखील दाखवली होती. कदाचित तेच पाहून कोणी माझ्याशी भांडायला आलं नाही. मला भांडणं करण्यापेक्षा सोडवायला जास्त आवडतात मग ती स्वतःची असो किंवा मग इतरांची. पण फार उशिरा मला कळालं की हा भांडणं सोडवायचा नाही तर दुस-याच्या भांडण्यात घुसण्याचा गेम आहे. 

प्रश्न- नेहा आणि शिवानी व्यतिरिक्त या घरात आणखी कोणासोबत घट्ट मैत्री झाली ?
माधव- शिवानी-नेहा व्यतिरिक्त या घरात अभिजीत बिचुकलेंशी छान गट्टी जमली होती. ते खूप हुशार आहेत. ते हा गेम न कळाल्याचा आव आणत असले तरी त्यांना तो चांगलाच समजला होता हे मला कळालं होतं. आणि मला हे कळालंय हे त्यांनाही कळालं होतं. आता मला वाटतंय की मी जे बोलतोय ते तुम्हाला समजत असेल. जरा नीट लक्ष देऊन ऐकलं तर मी काय म्हणतो हे तुम्हा सगळयांना कळेल. बिचुकले आणि मी आम्ही रात्रभर गप्पा मारायचो..खूप वेगवेगळे विषय असायचे. एकदा तर गप्पा मारता मारता पहाट झाली हेही आम्हाला कळालं नाही. 

प्रश्न- आता बिचुकलेंची पुन्हा घरात एन्ट्री झालीये तर तु थोडक्यासाठी त्यांना मिस केलंस याचं वाईट वाटतंय का ?
माधव- हो. नक्कीच. मी खूप मिस करेन त्यांना. कदाचित या आठवड्यात मी घरात असताना त्यांची एंट्री झाली असती तर मी आज घराबाहेर पडलो नसतो आणि मला २ सप्टेंबरच्या आता बाहेर काढणं कोणालाच शक्य झालं नसतं.  आम्ही खूप स्ट्रॅजेजी प्लान केल्या असत्या.पण दुर्देवाने ही माझी खूपंच अनपेक्षित एक्झिट होती. 

प्रश्न- तुझ्या मते टॉप ३ मध्ये कोण असतील ?
माधव- टॉप ३ सांगणं माझ्यासाठी कठीण आहे. मी टॉप ५ सांगतो. शिवानी, नेहा, शिव, हिना आणि रुपाली.

प्रश्न- आता घराबाहेर पडल्यानंतर काय काय करायचा विचार आहे ?
माधव- सगळ्यात आधी मी घरच्यांना भेटणार आहे. माझी बायको एअर हॉस्टेस असल्याने आमची लाँग डिसटन्स रिलेशनशिप आहे. तेव्हा तिला पण लवकर भेटायचंय. बिगबॉस मराठीचे विकेंडच्या डावचे एपिसोड तर पहिले आहेत मात्र आता सगळे एपिसोड पहायचे आहेत तेव्हा मला कोण माझ्यामागे काय बोलले आहेत हे कळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interview of Madhav Deochakke eliminated from bigg boss house