मी सूत्रसंचालन करणार हे 'बिग बीं'पासून लपवलं : नागराज मंजुळे

दिपाली राणे-म्हात्रे
मंगळवार, 21 मे 2019

'उत्तर शोधलं की जगणं बदलतं' असं म्हणत नागराज मंजुळे 'कोण होणार
करोडपती' हा नवीन शो घेऊन येत आहेत. आंग्रीया क्रुझवर या शोची पत्रकार
परिषद मोठ्या दिमाखात पार पडली. यानिमित्ताने या शोचे सूत्रसंचालक नागराज मंजुळे यांच्याशी केलेली ही बातचीत -

'उत्तर शोधलं की जगणं बदलतं' असं म्हणत नागराज मंजुळे 'कोण होणार
करोडपती' हा नवीन शो घेऊन येत आहेत. आंग्रीया क्रुझवर या शोची पत्रकार
परिषद मोठ्या दिमाखात पार पडली. यानिमित्ताने या शोचे सूत्रसंचालक नागराज मंजुळे यांच्याशी केलेली ही बातचीत -

प्रश्न : दिग्दर्शक म्हणून कॅमेराच्यामागे उत्तम काम केलंय मात्र आता कॅमेराच्या समोर येऊन सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आल्यावर स्वतःमध्ये किती बदल करावा लागला?

उत्तर : खूप बदल करावा लागला.मला याआधी स्पा किंवा सलूनमध्ये लूकसाठी जे जे काही करतात त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. मी कधीच स्पामध्ये गेलो नव्हतो. शूटसाठी कुठेही कसाही उन्हात उभं राहून काम करत होतो मात्र इथे सतत कॅमेरासमोर दिसायचं असल्याने उन्हात जाणं टाळणं, चेह-याची काळजी घेणं, व्यवस्थित कपडे घालून तयार होऊन येणं या सगळ्याची मला सवय नव्हती त्या गोष्टी जुळवून घ्याव्या लागल्या.

प्रश्न : या शोच्या निमित्ताने वेगवेगळ्या त-हेचे स्पर्धक तुमच्यासमोर आले असतील त्यांच्या काही समस्या असतील तर अशावेळी त्यांना शोची टॅगलाईन उत्तर शोधलं की जगणं बदलतं याची अनुभूती तुम्ही कशी दिलीत?

उत्तर : त्या स्पर्धकांशी संवाद साधणारा, त्यांचं जगणं उलगडत खेळणारा हा
शो आहे. त्यामुळे आपसुकंच माणसांच्या बाबतीत खूप गोष्टी कळतात. त्यांच्या संघर्ष पाहून प्रेरणा मिळते.विविध त-हेची विविध परिस्थितीमधून जाणारी माणसं समजून घेता येतात.

प्रश्न : सैराटचे जगभरात चाहते आहेत तेव्हा सेटवर स्पर्धकांची याबाबत काही खास फर्माईश असायची का ?

उत्तर : मला वाटतं आपण हे सगळं शोमध्ये पाहूया कारण जे झालंय ते आत्ता
सांगितलं तर त्यातली सगळी मजा निघून जाईल.

प्रश्न : अमिताभ बच्चन आणि करोडपती शो हे एक वेगळंच समीकरण आहे. तुम्ही आज तुमच्या आगामी झुंड सिनेमाच्या निमित्ताने त्यांच्यासोबत काम करत आहात, त्यांना जेव्हा तुम्ही हा शो मराठीत होस्ट करणार असं सांगितलं तेव्हा त्यांनी तुमच्यासोबत याबाबत काही चर्चा केली का?

उत्तर : मी मराठीत हा शो होस्ट करतोय हे आम्ही अनेक दिवस बच्चनजींपासून लपवून ठेवलं होतं मात्र जेव्हा त्यांना सांगितलं त्यावेळी आम्ही बरीच चर्चा केली यावर. ही चर्चा खूप लांबली देखील. त्यावरुन मला अनेक गोष्टींचा बारकाईने अभ्यास करायला मदत झाली.

प्रश्न : कोण होणार करोडपती या शोचे सगळेच फॅन आहेत..तुम्ही हा शो पाहत आला असाल तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारी या शोची गोष्ट कोणती?

उत्तर : जगभरात या शोचे जसे चाहते आहेत त्यातलाच मी देखील एक आहे. मी लहानपणी हा शो खूप फॉलो करत होतो.इतरांप्रमाणेच माझीही या शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा खूप आधीपासून होती.या शोमधली मला फोन अ फ्रेेंड ही लाईफलाईन खूप आवडायची. मी सहभागी झालो तर मी कोणाला फोन करेन असा विचारही मी तेव्हा करत होतो... खूप साऱ्या आठवणी आहेत आणि आता योगायोग असा की मी हा शो होस्ट करतोय तेव्हा यानिमित्ताने माझी ती इच्छा वेगळ्या स्वरुपात का होईना पूर्ण झाली असं मी म्हणेन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interview of Nagraj Manjule for Kon Honar Karodpati reality show