माणसं पाच अन तिकिटं दहा? पिक्चरसाठी काहीही..

गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

मराठी चित्रपटांना चांगली थिएटर्स मिळत नाहीत. मिळाली तर हव्या त्या वेळा मिळत नाहीत. आणि त्या जरी मिळाल्या तरी प्रेक्षक थिएटरकडे फिरकतोच असं नाही. मग, किमान प्रेक्षक जमा नाही झाले, तर शोही बंद केला जातो. हा अनुभव काही नवा नाही. पण नाशिकच्या महालक्ष्मी थिएटरमध्ये बुधवारी रात्री साडेनऊच्या शोला मात्र वेगळाच अनुभव आला. 

पुणे : मराठी चित्रपटांना चांगली थिएटर्स मिळत नाहीत. मिळाली तर हव्या त्या वेळा मिळत नाहीत. आणि त्या जरी मिळाल्या तरी प्रेक्षक थिएटरकडे फिरकतोच असं नाही. मग, किमान प्रेक्षक जमा नाही झाले, तर शोही बंद केला जातो. हा अनुभव काही नवा नाही. पण नाशिकच्या महालक्ष्मी थिएटरमध्ये बुधवारी रात्री साडेनऊच्या शोला मात्र वेगळाच अनुभव आला. 

नाशिकमध्ये कासव  या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा एकच शो लागला आहे. रात्री साडेनऊच्या या शोला नाशिकचा आदित्य देशमुख आणि त्याचे चार मित्र गेले. गेल्यावर त्या सर्वांनी एकूण पाच तिकीटं काढली. चित्रपटाची वेळ जवळ येताच, कासवचा शो कमी प्रेक्षकसंख्येमुळे रद्द करावा लागत असल्याचं थिएटरतर्फे सांगण्यात आलं. पण कासवची झालेली प्रसिद्धी आणि त्याला मिळालेलं राष्ट्रीय पारितोषिक पाहता या पाचही मित्रांना चित्रपट पाहायचा होता. आणखी काही मिनिटे वाट पाहिली गेली. पण प्रेक्षक काही येईना. थिएटरकडून  मिळालेल्या माहितीनुसार किमान 10 प्रेक्षक असतील तरच चित्रपटाचा खेळ दाखवला जातो. पण कासवला पाचच प्रेक्षक होते. काय करावं ते आदित्य आणि त्याच्या मित्रांना कळेना. पण काही झालं तरी शो बघायचाच अशा निश्चय करून या मंडळींनी आणखी पाच तिकीटं खरेदी केली. मग मात्र थिएटरच्या मॅनेजमेंटला काही बोलता येईना आणि नाशिकमध्ये कासवचा शो बंद पडता पडता लागला. याबाबत बोलताना आदित्य म्हणाला, 'मी इंजिनिअरिंगला आहे. कासव हा चित्रपट माझ्यासह आम्ही पाच मित्रांना पाहायचा होता. पण थिएटरवाले दहा लोकांवर अडून बसले. मग आम्ही दोन दोन तिकीटं काढली. त्या थिएटरची अवस्थाही फार बिकट होती.'

हा चित्रपट पाहिल्यानंतर आदित्यने आपल्या वाॅलवर कासवबद्दलचं मतही मांडलं आहे. एकिकडे चांगल्या चित्रपटाकडे पाठ फिरवणाऱ्या प्रेक्षकांत दिवसेंदिवस भर पडत असलेली दिसत असताना, आदित्यसारखी तरूणाई ह्ट्टाने चित्रपट पाहातेय ही बाजूही दिलासा देणारीच म्हणायला हवी. 

Web Title: kaasav movie nashik esakal news