आता कळलं  जगासमोर अपमान केल्यावर कसं वाटतं? ; कंगनाचा याचिका दाखल करणा-यांवर पलटवार 

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 13 October 2020

बॉलिवूडच्या गटारात रेंगाळणाऱ्यांना आता कळलं का संपूर्ण जगासमोर अपमान केल्यावर कसं वाटतं? कित्येक वर्षांपासून मी स्वत: बॉलिवूडविरोधात शोषण, बदनामीची तक्रार केली.आता एका कलाकाराचा मृत्यूही झाला. जर सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचं गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास का होतोय.

मुंबई-अभिनेत्री कंगना हिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बॉलीवूडमधील वातावरण भलतेच तापत चालले आहे. कंगना सतत नवनवीन खुलासे करत असल्याने त्यातून वेगळी माहिती समोर येत आहे. बॉलिवूडच्या शाहरुख, सलमान आमिरसहीत निर्माते  आणि दिग्दर्शकांनी काही वृत्तवाहिन्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. यावर कंगनाने त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यामुळे ती पुन्हा वादाच्या भोव-यात सापडली आहे.

कंगनाने यासगळ्या बाबत एक ट्विट करुन वेगळीच वातावरण निर्मिती केली आहे.बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टात धाव घेतली आहे.रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात काही बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे.  या कृतीवर अभिनेत्री कंगनाने राग व्यक्त केला. यावर तिने ट्विट करुन 'त्यात आता कळलं का संपूर्ण जगासमोर इभ्रतीचे वाभाडे निघाल्यावर कसं वाटतं?' असा सवाल याचिका दाखल करणा-यांना विचारला आहे. द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडिया आणि सिने टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन यांचाही याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे.

एवढ्यावरचं कंगना थांबली नसून तिने कडक शब्दांत याचिका दाखल करणा-यांचा समाचार घेतला आहे. ती म्हणते,“बॉलिवूडच्या गटारात रेंगाळणाऱ्यांना आता कळलं का संपूर्ण जगासमोर अपमान केल्यावर कसं वाटतं? कित्येक वर्षांपासून मी स्वत: बॉलिवूडविरोधात शोषण, बदनामीची तक्रार केली. अन् त्याचमुळे आज एका कलाकाराचा मृत्यूही झाला. जर सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचं गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास का होतोय. याचाही सर्व हिशेब माझ्याकडे आहे.” अशा आशयाची दोन ट्विट तिने केले आहे. बॉलिवूडमधल्या कलाकारांविरोधात डर्ट, फिल्थ, स्कम, ड्रगीज अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या सगळ्यामुळे बॉलिवूडची बदनामी झाली. हे शब्द सिनेसृष्टीसाठी अपमानजनक आहेत असंही या याचिकेत म्हटलं आहे.

दिल्लीतील कोर्टात या चार जणांविरोधात आणि दोन चॅनल्स विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये शाहरुख खान,आमिर खान,सलमान खान, अजय देवगण, करण जोहर, अक्षय कुमार,आदित्य चोप्रा, फरहान अख्तर, झोया अख्तर यांच्यासह महत्त्वाच्या प्रॉडक्शन हाऊसेसचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranaut angry on Bollywood its called Is A Gutter