मनोरंजन क्षेत्राला आणखी धक्का;अभिनेत्री जयश्रीनं संपवलं आयुष्य

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 25 January 2021

22 जूनला जयश्रीने तिच्या फेसबुकवर आपल्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचे लिहिले होते. ‘गुडबाय’ असे तिने एफबी पोस्टमध्ये म्हटले होते.

मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटांतील अभिनेत्री जयश्री रमैय्यानं आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. तिच्या आत्महत्येमुळे कन्नड चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. तिचा मृत्यु आत्महत्येनं झाला की त्यामागे कुठला घातपात आहे असा संशय व्य़क्त केला जात आहे. तिच्या चाहत्यांनी आणि अनेक मान्यवर सेलिब्रेटींनी सोशल मीडियावरुन तिला श्रध्दांजली वाहिली आहे. मागच्यावर्षी 2020  मध्ये नैराश्याचा सामना करत असल्याचे तिने सांगितले.

22 जूनला जयश्रीने तिच्या फेसबुकवर आपल्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचे लिहिले होते. ‘गुडबाय’ असे तिने एफबी पोस्टमध्ये म्हटले होते. पण नंतर तिने ती पोस्ट डिलीट केली व ‘मी व्यवस्थित आणि सुरक्षित आहे. लव्ह यू ऑल’ असे लिहिले होते. अभिनेत्री जयश्री रमैयाची दुसरी ओळख म्हणजे ती  बिग बॉसमधील माजी स्पर्धक होती. सोमवारी दुपारी ती मृतावस्थेत सापडली. बंगळुरुतील वृद्धाश्रमात तिचा मृतदेह आढळला. तिनं आत्महत्या केल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.

गेल्या अनेक महिन्य़ांपासून जयश्री नैराश्याचा सामना करत होती. तिने तिच्या सोशल मीडियावरुनही तिनं स्वतला संपवणार अशा आशयाच्या काही पोस्ट लिहिल्या होत्या. बिग बॉस कन्नडच्या तिसऱ्या सीझनमधून तिला प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूने कन्नड चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे. तिचे अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरुन जयश्रीला श्रद्धांजली वाहिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kannada actress Jayashree Ramaiah found dead at rehabilitation center Bengaluru