करण जोहर म्हणतोय, 'विकी कौशलला वाचवा'!

वृत्तसंस्था
Friday, 13 September 2019

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल पहिल्यांदाच भयपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'भूत' असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा नवा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल पहिल्यांदाच भयपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'भूत' असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा नवा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विकी कौशलसोबत या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री भूमी पेडणेकर दिसणार आहे. या चित्रपटाचा निर्माता करण जोहरने शुक्रवारी (ता.13) इन्स्टाग्रामवर याचा नवा पोस्टर शेअर केला.

हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत आहे. निर्माता करण जोहरने इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करताना लिहिलं आहे की, "भितीमध्ये अडकलेला! या हॉन्टेड जहाजापासून 15 नोव्हेंबरला विकी कौशलला वाचवा."

चित्रपटाच्या नावाप्रमाणेच पोस्टरही भयानक असून विकी यामध्ये एका हॉन्टेड जहाजामध्ये बुडताना दिसतोय. त्याचसोबत एक डायन त्याला मागे ओढत आहे आणि पाण्यातून बाहेर जाऊ देत नाहीय. पहिल्या पोस्टरच्या तुलनेत हा नवा पोस्टर रंजक आहे. या पोस्टरच्या लुकनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटासाठी उत्सुकता वाढली आहे. 

'भूत पार्ट 1 : दि हॉन्टेड शिप' या चित्रपटाची कथा समुद्रामध्ये सोडलेल्या, बंद पडलेल्या जहाजाची आहे. या जहाजावर एक कपल अडकते आणि यावरच चित्रपटाची कथा आधारीत आहे. त्याचा पहिला पार्ट येत्या 15 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अनेक भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. भानूप्रताप सिंह यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून पुढच्या आठवड्यामध्ये त्याचा ट्रेलर प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karan Johar says that Save Vicky Kaushal on the releasing new poster of Bhoot The Haunted Ship