
आजपासून सुरू होतोय या मालिकेचा विवाह विशेष सप्ताह
सध्या मालिकांमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. असाच एक लग्नसोहळा 'कारभारी लयभारी' या मालिकेतही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. राजकारणावर बेतलेली ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. सूर्यवंशी आणि पाटील ही दोन राजकीय घराणी आणि त्यांच्यात असलेले राजकीय वैर या मालिकेत दाखवण्यात येत आहे.
लग्नासाठी पियू सज्ज झाली असून वीरुसुद्धा तयार झाला आहे. एकीकडे वरमाईच्या थाटात सर्वत्र काकीच मिरवतेय तर दुसरीकडे अंकुशराव काहीतरी गडबड करणार याची धाकधूक सर्वांच्याच मनात आहे. घरासमोरच हा विवाहसोहळा पार पडणार असून घराभोवती मुलांनी कडक पहारा ठेवलाय. लग्नविधी सुरु असताना कन्यादानाचा विषय येतो आणि त्याचवेळी अंकुशराव दारात पोहोचतो. अंकुशराव येताच मालिकेच्या कथानकात नाट्यमय वळण येतं.
हेही वाचा : अभिज्ञानंतर आता मितालीच्या मंगळसूत्राची सोशल मीडियावर चर्चा
पियुला खेचून नेत तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. अंकुशरावपर्यंत लग्नाची खबर पोहोचेल याची व्यवस्था मुद्दामहून काकीच करते आणि नंतर या सगळ्या तमाशात मध्ये पडते. विवाहस्थळी पोलीस येताच पियू पोलिसांची मदत घेते आणि त्यांना सांगते की, मी माझ्या मर्जीने लग्न करतेय. अंकुशरावचा पाणउतारा होतो आणि तो अपमानित होऊन निघून जातो. या सर्व अडचणींवर मात करून अखेर राजवीर आणि प्रियांका लग्नबंधनात अडकतात. 'कारभारी लयभारी' या मालिकेचा विवाह विशेष सप्ताह प्रेक्षकांना १ मार्च ते ८ मार्च सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.