सुवर्णमहोत्सवी ‘पिंजरा’

मराठी चित्रपटसृष्टीला ‘पिंजरा’ नावाच्या कलाकृतीचं स्वप्न पडलं त्याला ३१ मार्च २०२२ रोजी ५० वर्षं पूर्ण होत आहेत. मराठी चित्रपटविश्वाला सोनेरी काळ दाखवणारा ‘पिंजरा’ आता सुवर्णमहोत्सवी वर्षात पोहचला आहे.
dr shriram lagoo
dr shriram lagoosakal
Updated on
Summary

मराठी चित्रपटसृष्टीला ‘पिंजरा’ नावाच्या कलाकृतीचं स्वप्न पडलं त्याला ३१ मार्च २०२२ रोजी ५० वर्षं पूर्ण होत आहेत. मराठी चित्रपटविश्वाला सोनेरी काळ दाखवणारा ‘पिंजरा’ आता सुवर्णमहोत्सवी वर्षात पोहचला आहे.

- किरण शांताराम

मराठी चित्रपटसृष्टीला ‘पिंजरा’ नावाच्या कलाकृतीचं स्वप्न पडलं त्याला ३१ मार्च २०२२ रोजी ५० वर्षं पूर्ण होत आहेत. मराठी चित्रपटविश्वाला सोनेरी काळ दाखवणारा ‘पिंजरा’ आता सुवर्णमहोत्सवी वर्षात पोहचला आहे; पण तो साकारणं सोपं नव्हतं. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी ते शिवधनुष्य पेललं. अनेक अडचणी आल्या; पण ३१ मार्च १९७२ रोजी तो प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरशः त्याला डोक्यावर घेतलं. सदाबहार गाणी आणि लावण्यांच्या सुरेल आविष्काराबरोबरच सामाजिक संदेश देणाऱ्या ‘पिंजरा’ची जादू आजही कायम आहे. त्याच्या निर्मितीमागची ही कहाणी...

मराठी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन चित्रपट म्हणजे ‘पिंजरा’चं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. चाकोरीबाहेरचा विषय, उत्तम आशय, लावणी नृत्ये, सदाबहार गाणी, सुरेल संगीत आणि दर्जेदार अभिनय असा सर्वांगसुंदर आविष्कार ‘पिंजरा’मध्ये पाहायला मिळाला. तमाशा कलावंतीण आणि आदर्श मास्तर यांच्यातील संघर्ष अन् त्यांच्यातील अव्यक्त प्रेमाची कहाणी प्रभावीपणे चित्रपटात मांडण्यात आली होती. ‘पिंजरा’ तमाशापट असला, तरी त्यात एक सामाजिक संदेशही होता. एखादा माणूस आपल्यातून निघून गेल्यानंतर त्याचे विचार कायम राहिले पाहिजेत. त्याचा आदर्श जिवंत राहिला पाहिजे. ‘पिंजरा’तून तेच मांडण्याचा प्रयत्न झाला. म्हणूनच निव्वळ मनोरंजनाच्या पलीकडे त्याने करोडो रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.

गावातील एक आदर्श शिक्षक. सर्वच गावकरी त्याला देवासमान मानतात. गावात त्याचा मोठा मानमरातब असतो. गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते झटत असतात; परंतु अचानक एके दिवशी एका नर्तकीशी त्याची गाठ पडते आणि पाहता पाहता सगळंच होत्याचं नव्हतं होतं. स्वतःच्याच खुनाचा आरोप मास्तरावर ठेवला जातो. आपला आदर्श जपला जावा, याकरिता तो निमूटपणे शिक्षा स्वीकारतो, असं चित्रपटाचं कथानक असलं, तरी त्याने त्या काळात म्हणजे १९७२ मध्ये संपूर्ण समाजमन ढवळून काढलं. आजही हा चित्रपट आणि त्यातील गाणी तितकीच लोकप्रिय आहेत.

‘पिंजरा’ची कथा-कल्पना मुळात निर्माते व दिग्दर्शक अनंत माने यांची. त्यांनी अण्णांना अर्थात माझे वडील शांताराम बापू यांना ती सांगितली. अण्णांनाही तेव्हा एक तमाशाप्रधान चित्रपट काढायचा होता. मुंबईमध्ये लालबागला ‘हनुमान’ नावाचं तमाशाचं थिएटर होतं. त्या वेळी तिकडे तमाशे व्हायचे. अण्णांनी एकदा तिथे तमाशा बघितला आणि तेव्हाच तमाशाप्रधान चित्रपट बनवण्याचं त्यांनी ठरवलं. त्यांच्या डोक्यात त्यासाठी विचारचक्र सुरू होतं आणि त्यातच अनंत माने ‘पिंजरा’ची कथा घेऊन आले. अण्णांनी कथेचा सविस्तर विस्तार केला. तमाशाप्रधान चित्रपट म्हटलं की संगीत महत्त्वाचं. मग, अनंत माने यांनी अण्णांना राम कदम यांचं नाव सुचवलं. राम कदम यांनी माने आणि दादा कोंडके यांच्या चित्रपटांना संगीत दिलेलं होतं. साहजिकच अण्णांनीही त्यांच्या नावाला सहमती दिली. त्यानंतर राम कदम यांना बोलावण्यात आलं. त्यांनी संपूर्ण कथा वाचली. मग कथानकात गाण्याची जागा ठरली; परंतु गाणी कुणी लिहावीत हादेखील मोठा प्रश्न अण्णा आणि कदम यांच्यासमोर होता. त्यातूनच जगदीश खेबूडकर यांचं नाव पुढं आलं. गाणी त्यांच्याकडून लिहून घेण्याचं ठरलं आणि मग हळूहळू ‘पिंजरा’चा प्रवास सुरू झाला.

चित्रपटातील चंद्रकलेची मुख्य व्यक्तिरेखा संध्या साकारणार हे अगोदरच ठरलेले होतं. मास्तरच्या भूमिकेसाठीही तेवढ्याच ताकदीच्या कलाकाराची गरज होती. त्या वेळी डॉ. श्रीराम लागू यांचं एक नाटक सुरू होतं. त्या नाटकाबद्दल समीक्षकांनी भरभरून लिहिलं होतं. लागूंच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं होतं. तेव्हाच लागू यांच्या रूपात अण्णांना मास्तर सापडला. त्यांचं नाव निश्चित झालं. त्यांना बोलावण्यात आलं. शांताराम बापू आपल्यासमोर उभे आहेत आणि ते आपल्याला चित्रपटात काम करणार का, असं विचारताहेत यावर लागू यांचा विश्वासच बसत नव्हता. कारण ‘पिंजरा’ त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट होता. त्यातही शांताराम बापू यांच्याबरोबर काम करायचं होतं. त्यामुळे ते कमालीचे भारावून गेले होते. मास्तरच्या भूमिकेसाठी लागूंचं नाव निश्चित झाल्यानंतर एकेका कलाकारांची निवड करण्यात आली. तेव्हा निळू फुले फॉर्मात होते. अनंत माने यांनी अण्णांना त्यांचं नाव सुचवलं. निळू फुले आपली भूमिका उत्तम करतील, असा विश्वास दिला. त्यानंतर तेही ‘पिंजरा’सोबत जोडले गेले. सगळे कलाकार निश्चित झाल्यानंतर चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण कोल्हापुरात करायचं पक्कं झालं.

गीतकार जगदीश खेबूडकर आणि संगीतकार राम कदम यांच्यात जणू काही गाण्यांसाठी स्पर्धाच लागली होती. ‘तुम्ही चाल बनवा, मी शब्द देतो... मी शब्द देतो, तुम्ही चाल बांधा...’ असा प्रकार संगीताबाबत सुरू होता. मला अजूनही आठवतंय, की राम कदम यांनी चित्रपटातील गाण्यांच्या जवळपास सत्तर ते ऐंशी चाली ऐकवल्या. आश्चर्य म्हणजे खेबूडकर यांनीही तेवढेच शब्द लिहिले. राजकमल स्टुडिओमध्ये अण्णांनी चाली ऐकल्या. तेव्हा मी अण्णांचा सहायक म्हणून काम करीत होतो. त्या वेळी आमच्या वारंवार बैठका व्हायच्या. त्यातील दोन बैठकांना अण्णा उपस्थित नव्हते. ते कुठे तरी बाहेर मीटिंगसाठी गेले होते. मग मी, जगदीश खेबूडकर आणि राम कदम अशी आमची तिघांची बैठक झाली. तेव्हा कदमांनी दोन-तीन चाली ऐकवल्या. त्यातील एक मला खूप आवडली. मी ती अण्णांना ऐकवली. अण्णांनाही ती पसंत पडली. ‘किरण अप्रतिम. तुला संगीताचा कान चांगला आहे. मला खूप आनंद झाला,’ अशा शब्दांत अण्णांनी तेव्हा माझं कौतुक केलं. ते गाणं होतं, दिसला गं बाई दिसला...

‘पिंजरा’ चित्रपटाच्या बऱ्याच आठवणी आहेत. तो पहिला मराठी रंगीत चित्रपट होता. अण्णांचा हट्ट होता, की चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग कोल्हापूरमध्येच करायचं. त्यानुसार तेथील शालिनी सिने टोनमध्ये संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग झालं. मग पुढे त्याचंच नाव, शांतकिरण स्टुडिओ झालं. शांतारामचा ‘शांत’ आणि किरणचा ‘किरण’ असं मिळून ‘शांतकिरण’ असं स्टुडिओचं नाव ठेवण्यात आलं. तीन ते चार महिने चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. एकूण शंभर माणसांचं युनिट त्या ठिकाणी होतं. तेव्हा तिथे काहीच सामान उपलब्ध नव्हतं. अण्णा इकडूनच लाईट्स, कॅमेरा आणि सर्वच शूटिंगचं सामान घेऊन गेले होते. त्यानंतर तिथे चित्रपटाचं बरंच शूटिंग करण्यात आलं.

‘पिंजरा’ चित्रपटात एक सीन आहे. त्यात डॉ. लागू रात्रीचे तलावाजवळ बसलेले आहेत. चंद्राचा सीन शूट करायचा होता. रंकाळा तलावाच्या परिसरात शूट करण्यात आलं होत. मात्र, त्यासाठी मी आणि आमच्या कॅमेरामननी चार ते पाच पौर्णिमा तिकडे जाऊन बघितल्या. कोणत्या अँगलने तो सीन बरोबर येईल, यासाठी आम्हीही अनेक वेळा पौर्णिमेला तिकडे जाऊन निरीक्षण केलं. मगच सीनसाठी सेट लावण्यात आला. इतक्या तपशिलाने चित्रीकरण करणाऱ्या अण्णांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे.

माझ्या हिशेबाने ‘पिंजरा’ चित्रपट लॅण्डमार्क होता. ‘दे रे कान्हा चोळी लुगडी’ गाणं आम्ही एका गावात शूट केलं होतं. नृत्य दिग्दर्शन होतं रंजन साळवी यांचं. तमाशाप्रधान चित्रपट असल्याने आम्ही भडक मेकअप करण्याचं तंत्र वापरलं. त्या वेळच्या बायका अशाच प्रकारचा मेकअप करत असायच्या. आमच्याकडे मेकअप डिपार्टमेंट तयार होतं. बाबा वर्दम आणि शशी साटम असे अनेक मेकअप आर्टिस्ट आमच्याकडे होते.

अनोख्या प्रमोशनची जादू

पुण्यामध्ये चित्रपट सर्वात आधी प्रदर्शित करायचं ठरवलं. त्या वेळेस मार्केटिंगसाठी फक्त पोस्टरचा वापर केला जायचा. अण्णा त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचं पोस्टर स्वतःहून फायनल करायचे. ‘पिंजरा’ची सर्व बॅनर, पोस्टर अण्णांनी डिझाईन केली होती. त्यानंतर पुण्यातील प्रत्येक रिक्षाच्या मागे चित्रपटाचे पोस्टर लागले. तेव्हा आतासारखं प्रमोशनचं वारं नव्हतं; पण अण्णांच्या कल्पकतेने रिक्षावर फक्त ‘पिंजरा’ एवढ्याच नावाचे पोस्टर लागले. साहजिकच लोकांमध्ये ‘पिंजरा’ नावाने उत्सुकता निर्माण झाली. त्याचा अपेक्षित परिणाम झाला आणि चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशीच प्रभात थिएटरमध्ये रसिकांची तुडुंब गर्दी झाली... ‘पिंजरा’च्या पहिल्याच शोच्या वेळी प्रेक्षकांनी स्टेजवर अक्षरशः पैसे फेकले. गाण्याच्या वेळी अवघं थिएटर नाचायला लागलं. एवढा तुफान प्रतिसाद चित्रपटाला मिळाला. चित्रपटावरही प्रेक्षक पैसे उडवतात, हे मला तेव्हा समजलं.

अनेकांचं घरही वसवलं!

‘पिंजरा’ची सिल्व्हर ज्युबली झाली तेव्हा एक माणूस अण्णांना भेटायला आला. तो चक्क त्यांच्या पाया पडला. तो म्हणाला, ‘मी पंचवीस आठवडे ‘पिंजरा’ चित्रपट पाहतोय. तुमच्या चित्रपटाची तिकिटं मी ब्लॅकने विकायचो. तिकिटं विकून मी माझ्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. मी स्वतःचं घर घेतलं म्हणून आज तुमच्या पाया पडायला आलो आहे...’ काय बोलणार? सारंच अद्‍भुत होतं. सांगायचा मुद्दा, हा की ‘पिंजरा’ने अनेक विक्रम तर मोडलेच; परंतु अनेकांचं घरही वसवलं.

कोल्हापूर, पुणे आणि मुंबई अशा सर्वच ठिकाणी चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला. प्रत्येक ठिकाणी कौतुक होत होतं. अनेक ठिकाणी वेगवेगळे अनुभव येत होते. त्या वेळेस ‘फुजी’ कंपनीने कलरफुल चित्रपट बनवण्याचा ट्रेंड सुरू केला होता. तेव्हा त्यांनी चित्रपटासाठी अण्णांना निगेटिव्ह दिली. अण्णांनी फुजी निगेटिव्हवर संपूर्ण चित्रपट बनवला. त्या वेळेस वीस लाख एवढा खर्च संपूर्ण चित्रपट बनवण्यासाठी आला होता. चित्रपटाच्या एकूण ४० प्रिंट आम्ही तयार केल्या होत्या. अण्णांना एखादी गोष्ट पटत नाही, तोपर्यंत ते ती करत नाही. त्या वेळेस राम कदम नेहमी अण्णांना म्हणायचे, की आपण लतादीदींना गाणं गायला सांगू. जेव्हा अण्णांनी लतादीदींना फोन केला तेव्हा त्यांनी ‘दे रे कान्हा चोळी लुगडी’ गाणं गायलं. अन्य गाण्यांसाठी लतादीदींनी उषा मंगेशकरांचं नाव सुचवलं. मग उरलेली गाणी उषाताईंनी गायली. त्यांनाही त्या गाण्यांनी मोठी प्रसिद्धी मिळाली. आम्हाला गाण्यांचं प्रमोशन करायची गरजच लागली नाही. कारण प्रेक्षकांनी थिएटरमध्येच गाणी उचलून धरली होती. तेव्हा अनेकांनी गाण्यांची पुस्तकंही छापली. आज ५० वर्षांनंतरही ‘पिंजरा’ प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. त्याबाबत भरभरून बोललं जातं, हेच चित्रपटाचं यश आहे. अण्णांना जाऊन आज तीस वर्षं झाली. अजूनही राजकमल स्टुडिओ असाच आहे. त्यांनी मेहनतीने बनवलेली ही वास्तू अशीच राहावी, अशी माझीही इच्छा आहे.

सर्कशीचा झाला तमाशा

लेखक हेनरीच मन यांची ‘प्रोफेसर वुनरंट’ कादंबरी १९०५ मध्ये जर्मन भाषेत प्रसिद्ध झाली. त्या कादंबरीवर आधारित ‘द ब्लू एन्जल’ चित्रपट दिग्दर्शक जोसेफ वोन्स्टबर्ग यांनी १९३० मध्ये जर्मन भाषेत बनवला. त्यात सर्कशीत काम करणाऱ्या महिलेच्या मोहजालात फसून नायक आपल्या जगण्याची राखरांगोळी करतो, असे दाखवले आहे. व्ही. शांताराम यांनी हेच सूत्र घेऊन मराठीत १९७२ मध्ये ‘पिंजरा’ चित्रपट बनवायला घेतला. तेव्हा त्यांनी त्यातील सर्कशीचा आपल्याकडील तमाशा केला. चित्रपटाच्या कथानकाला अस्सल मराठी मातीचा रंग, गंध, अर्थ आणि रांगडेपणा दिला. ‘पिंजरा’ चित्रपटाचं मूळ असं विदेशी आहे, हे तो पाहणाऱ्याला वाटणारही नाही इतका तो देशी झाला.

तब्बल ११० गाणी लिहिली

जगदीश खेबूडकरांनी गीतलेखन केलेल्या अजरामर कलाकृतींपैकी एक म्हणजे ‘पिंजरा’ चित्रपट. त्यासाठी खेबूडकरांनी तब्बल ११० गाणी लिहिली. त्यातली ११ गाणी चित्रपटात घेण्यात आली. ‘तुम्हांवर केली मी मर्जी बहाल... नका सोडून जाऊ रंगमहाल’ या लावणीविषयी सांगताना खेबूडकर यांनी म्हटलं आहे, की त्या प्रसंगासाठी शांताराम बापूंनी माझ्याकडून ४९ लावण्या लिहून घेतल्या. त्यातील एकही न आवडल्याने मी निराश होऊन घरी परतलो. झोप पार उडाली होती. डोक्यात लावणीचेच विचार घोळत होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास लावणी सुचली, ‘तुम्हांवर केली मी मर्जी बहाल...’ लगेच फोन करून मी ती शांताराम बापूंना ऐकवली. त्यावर ‘व्वा! झक्कास, गाणं खास जमलं बरं का’ अशा शब्दांत त्यांनी मला शाबासकी दिली. अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं...

दोन दिग्गजांच्या कामाच्या पद्धतीचा पेच

व्ही. शांताराम यांचे पुतणे रवींद्र डॉ. श्रीराम लागू यांच्याकडे ‘पिंजरा’ चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन गेले होते. ते लागूंना म्हणाले, की अण्णासाहेब म्हणजे व्ही. शांताराम नवीन मराठी सिनेमा काढताहेत. त्यात नायकाची भूमिका तुम्ही करावी, असं मी आणि अनंत माने यांनी त्यांना सुचवलं आहे. आम्ही तुमची नाटकं पाहिली आहेत. आम्हाला खात्री आहे, की तुम्ही नायकाच्या रोलसाठी योग्य आहात. पण, अण्णासाहेबांनी तुमचं एकही नाटक पाहिलेलं नाही. तेव्हा तुम्ही एकदा त्यांना भेटायला यावं, अशी त्यांची विनंती आहे... त्यावर लागू म्हणाले होते, ‘व्ही. शांताराम यांना भेटायला मला आनंदच वाटेल. माझा तो बहुमानच असेल. इतके ते मोठे आहेत. पण, मी त्यांच्या चित्रपटात काम करणार की नाही, हे मी स्क्रिप्ट वाचल्याशिवाय ठरवू शकणार नाही. तेव्हा तुम्ही मला आधी स्क्रिप्ट आणून द्या. ते मी वाचले की मग आपण केव्हा भेटायचे ते ठरवू.’ त्यावर रवींद्र म्हणाले, की अण्णासाहेब कुणालाच आधी स्क्रिप्ट देत नाहीत. त्यांची तशी पद्धत नाही... लागू त्यावर म्हणाले होते की, ते भूमिका आवडल्याशिवाय करत नाही. तशी माझी पद्धत नाही. त्यावर अनंत माने म्हणाले, की डॉक्टरसाहेब, सिनेमाच्या धंद्यात आम्हाला फार जपून वागावं लागतं. इथे चक्क एकमेकांच्या कथा चोरल्या जातात. त्यामुळे अण्णासाहेबांनी असे काही नियम केलेले आहेत. त्यात ते फार कडक शिस्तीचे आहेत... पुढे लागू यांना व्ही. शांताराम यांच्या नकळत गुपचूप स्क्रिप्ट आणून देण्यात आलं. ते वाचूनच लागू मास्तरांच्या भूमिकेसाठी तयार झाले.

(लेखक ‘पिंजरा’कार व्ही. शांताराम यांचे चिरंजीव असून, प्रसिद्ध निर्माते आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com