सुवर्णपान : गाणी, पुरस्कार आणि बरंच काही...

जाणून घ्या लतादीदींच्या आयुष्याचा लेखाजोखा एकाच क्लिकवर
Lata Mangeshkar
Lata MangeshkarSakal
Updated on

गानसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान. त्यांच्या स्वर्गीय स्वरांना प्रांतांची, देशांच्या सीमांची मर्यादा नाही. या स्वरांना कोंदण आहे ते केवळ उत्कटतेचे, भव्यतेचे! (Lata Mangeshkar Biography)

लतादीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूरमध्ये झाला. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या ज्येष्ठ कन्या. पाच वर्षांच्या होईपर्यंत त्यांचे नाव ‘हेमा’ होते. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव ‘लता’ ठेवले. मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक तसेच नाट्यकलावंत होते. त्यांच्याकडूनच दीदींना संगीताचे धडे मिळाले. लता मंगेशकर यांना उषा, आशा, मीना आणि हृदयनाथ अशी चारे भावंडे आहेत. त्यांच्यासोबतच दीदींची स्वरयात्रा सुरू झाली. १९४२ मध्ये दीदी तेरा वर्षांच्या असताना त्यांचे वडील पंडित दीनानाथ यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी त्यांनी स्वतः काम करत घर सांभाळण्याचा निर्णय घेतला.

बोलपटांच्या प्रारंभीच्या काळात अभिनेत्यांना स्वतःची गाणी स्वतःच गावी लागत. बोलपट स्थिरावून जेमतेम १५ वर्षं होत होती. त्या सुमारास चित्रपटसृष्टीत लता मंगेशकर नावाच्या एका चमत्काराचा उदय झाला. अगदी कोवळ्या वयात पडलेली कुटुंबाची जबाबदारी सांभाळत लतादीदींनी स्वरांचे एक अफाट विश्व उभे केले.

लतादीदींनी १९४२ मध्ये ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी गाणे गायले होते आणि त्या वेळी त्यांनी या गाण्यासाठी २५ रुपये मानधन घेतले होते; परंतु काही कारणामुळे हे गाणे चित्रपटात घेतले नाही. त्यानंतर त्यांनी मास्टर विनायक यांच्या ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात ‘नटली चैत्राची नवलाई’ हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गाणे गायले. ‘माता एक सपूत की दुनिया बदल दे तू’ हे त्यांचे पहिले हिंदी गाणे. ते लतादींदीवरच चित्रित करण्यात आले होते. त्यानंतर दीदी आपल्या भावंडांना घेऊन मास्टर विनायक यांच्यासोबत मुंबईत आल्या.

लतादीदी मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी उत्साद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) यांच्याकडून शास्त्रोक्त संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यानंतर ‘आपकी सेवामें’ या हिंदी चित्रपटासाठी ‘पा लागूं जोरी’ हे गाणे आणि ‘बडी माँ’ चित्रपटात ‘माता तेरे चरणों मे'' हे भजन गायले. त्या वेळी हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई या गायिका लोकप्रिय होत्या. असे असताना लतादीदींना ‘मजबूर’ चित्रपटात ‘दिल मेरा तोडा’ हे गाणे गाण्याची मोठी संधी मिळाली. मात्र ‘महल’ चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ हे गाणे त्याच्या कारकिर्दीला वळण देणारे ठरले. त्यानंतर लतादीदींनी कधीही मागे वळून न पाहता आपल्या सुमधुर गाण्याने जगभरातल्या संगीतरसिकांच्या मनावर राज्य केले. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत छोट्या छोट्या भूमिकाही त्यांनी साकारल्या.

संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखालील चित्रपटात लतादीदींनी सर्वांत जास्त गाणी गायली. सुप्रसिद्ध संगीतकार शंकर-जयकिशन या जोडीच्या, विशेषतः राज कपूर यांची निर्मिती असलेल्या चित्रपटांतील सर्वच गाणी लतादीदींनीच गायली आहेत. त्यांना पहिला फिल्म फेअर पुरस्कार ‘मधुमती’ चित्रपटातील ‘आजा रे परदेसी’ या गाण्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायिका’ म्हणून मिळाला होता.

दीदींनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, अनिल-विश्‍वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिन देव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंतकुमार मुखोपाध्याय, आर. डी. बर्मन, सलील चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, राजेश रोशन, मदन मोहन, कल्याणजी-आनंदजी, मास्टर कृष्णराव, सुधीर फडके, हंसराज बहल, उषा खन्ना, ए. आर. रेहमान अशा अनेक प्रख्यात संगीतकारांसोबत काम केले. लतादीदींची ‘आज फिर जीने की तमन्ना है’, ‘गाता रहे मेरा दिल’, ‘सावन का महिना’, ‘एक प्यार का नग्मा है'', ‘लग जा गले’, ‘हम को हमी से चुरा लो’, ‘मेरे नशीब मे तू है के नहीं’, ‘मेहंदी लगा के रखना’ यांसारखी अनेक हिंदी गाणी गाजली.

लतादीदींनी मराठी चित्रपटसृष्टीत संगीतकार वसंत प्रभू, श्रीनिवास खळे, सुधीर फडके यांसारख्या अनेक संगीतकारांबरोबर काम केले. ‘बाई बाई मन मोराचा’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘मोगरा फुलला’, ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या...’, ‘ऐरणीच्या देवा’, ‘मी डोलकरं दर्याचा राजा’ यांसारखी त्यांनी गायलेली मराठी गाणी गाजली. त्यांचे ‘लग जा गले...’ हे गाणे तर प्रत्येकाच्या ओठावर आजही अजरामर आहे.

भावगीते व भक्तिगीतेही दीदींनी गायली. ३६ हून अधिक भारतीय भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत. लता मंगेशकर यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि बंगाली भाषेत गाणी गायली आहेत. एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्यानंतर ‘भारतरत्न’ने सन्मानित झालेल्या लतादीदी या एकमेव गायिका. लतादीदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला आहेत ज्यांना ‘भारतरत्न’ आणि ‘दादासाहेब फाळके’ या दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त २००७ मध्ये त्यांना फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले. लतादीदींच्या जीवनावर अनेक पुस्तकेही लिहिली गेली आहेत. त्यांची बहीण मीना मंगेशकर-खडीकर यांनी मराठीमध्ये ‘मोठी तिची सावली’ आणि हिंदीमध्ये ‘दीदी और मैं’ अशी पुस्तके लिहिली आहेत.

सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं ‘ए मेरे वतन के लोगों’ हे देशभक्तीपर गीत त्यांनी गायले आहे. जे आज राष्ट्रीय गीत मानले जाते. ‘अजीब दास्तां है ये’ या त्यांच्या गाण्याने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली. लतादीदींच्या आवाजाने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणले, काहींच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले, काहींना प्रेमात पाडले. त्यांच्या गाण्यांपैकी काही सर्वोत्कृष्ट गाणी निवडणे फारच अवघड आहे. त्यांचा आवाज असा आहे की तो नेहमीच एव्हरग्रीन राहील आणि पुढील प्रत्येकाच्या ओठांवर त्यांची गाणी गुंजणार आहेत.

अभिनेत्री व संगीतकार यांच्या पिढ्या बदलत गेल्या; पण लता मंगेशकर हे नाव ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहिले. अर्थात हे यश सहज नव्हते. लतादीदींनी त्यासाठी अपार कष्ट घेतले. कोवळ्या वयात पडलेली कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी स्वरांचे एक अफाट विश्व उभे केले. हिंदी-उर्दू शब्दांचे उच्चार असोत किंवा लाहोर घराण्याची, पंजाबी-पतियाळा शैली असो, ठुमरीची बनारस शैली असो, बंगालमधून आलेली बाऊल शैली असो, गायकीचे वैविध्यपूर्ण लयांकार लतादीदींनी रसिकांसमोर पेश केला. काळ बदलला, संगीतकार बदलले, श्रोत्यांच्या पिढ्या बदलल्या, त्यांची आवड बदलली, तरी लतादीदी गातच राहिल्या.

संगीतकार ‘लता’

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ‘आनंदघन’ या नावाने मराठी चित्रपटांना संगीतही दिले आहे. त्यांनी सर्वप्रथम १९५५मध्ये ‘राम राम पावणं’ या मराठी चित्रपटाला संगीत दिले. ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मराठा तितुका मिळवावा’, ‘साधी माणसं’ हे त्यांनी संगीतबद्ध केलेले चित्रपट त्या काळात गाजले होते. ‘ऐरणीच्या देवा तुला’ हे लता मंगेशकर यांनी गायलेले ‘साधी माणसं’ चित्रपटातील गीत महाराष्ट्र सरकारने पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्यांनी चार चित्रपटांची निर्मितीही केली होती. त्यामध्ये वादळ (१९५३), झांझर (१९५३), कांचन गंगा (१९५५) व लेकिन (१९९०) या चित्रपटांचा समावेश आहे.

मोहमंद रफींबरोबर रॉयल्टीवरून अबोला

गानकोकीळा अशी ओळख असलेल्या लता मंगेशकर या शांत स्वभावाच्या होत्या. समोरच्या व्यक्तीचा सन्मान त्या करीत असत. पण लतादीदी एकदा सुप्रसिद्ध गायक मोहंमद रफी यांच्यावर त्या रागविल्याचा किस्सा चांगलाच गाजला आहे. गायकांना दिल्या जाणाऱ्या रॉयल्टीवरुन या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. यावरून या दोघांनी एकत्र काम करणे सोडून दिले होते. अनेक वर्षे त्यांचा अबोला सुरू होता. या काळात त्यांनी एकत्र एकही काम केले नाही किंवा पार्श्‍वगायनही केले नाही.

साठच्या दशकातील ही घटना असून त्यावेळी गायकांना रॉयल्टी दिली जात नसे. संगीत दिग्दर्शकाप्रमाणे गायकांनाही रॉयल्टी द्यायला हवी, असे लता मंगेशकर यांचे म्हणणे होते. मोहमंद रफी यांच्या जीवनावर त्यांची सून यास्मिन खालिद यांनी लिहिलेल्या ‘मोहंमद रफीः माय अब्बा’ या चरित्रात हा किस्सा नमूद केला आहे. पुस्तकात म्हटले आहे की, रॉयल्टीचा मुद्दी लता मंगेशकर यांनी निर्मात्यांपुढे उपस्थित केला होता. या क्रांतिकारी मागणीत रफी साहबही त्यांची साथ देतील आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देतील, अशी आशा लताजींना होती. पण याबाबत मोहमंद रफी यांचे विचार वेगळे होते. ‘जर गायकांना त्यांचे मानधन मिळत आहे, तर त्या रॉयल्टी कशासाठी मागत आहेत. त्यावर गायकाचा काहीही हक्क नाही, असे मोहंमद रफी यांनी म्हटल्यावर लता मंगेशकर संतप्त झाल्या होत्या.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लता मंगेशकर यांनी या घटनेचा उल्लेख केला होता. त्यावेळी एक बैठक झाली होती. त्यामध्ये मोठे -मोठे गायक आणि मोहंमद रफीही सहभागी झाले होते. चर्चेच्यावेळी ते एकदम उठून उभे राहिले आणि म्हणाले, ‘‘मी आजपासून लताबरोबर गाणार नाही. हे ऐकल्यावर मी त्यांना सुनावले की तुम्ही काय, मीच तुमच्याबरोबर गाणार नाही, अशी आठवण लतादीदींनी सांगितली होती. यानंतर दोघांनी अबोला धरला होता. त्यानंतर काही वर्षांनी ते एकमेकांशी बोलायला लागले. लता मंगेशकर व मोहंमद रफी यांच्यात मध्यस्ती करण्यात संगीत दिग्दर्शक शंकर यांच्या मोठी भूमिका होती. यावर बोलताना लता मंगेशकर म्हणाल्या होत्या की, शंकर यांनी मला एक पत्र लिहिले होते, जे रफी साहब यांच्याकडून आले होते. पत्रात त्यांनी माफी मागितली होती. २०१३मधील मुलाखतीत लता मंगेशकर यांनी केलेल्या या विधानावरही वाद निर्माण झाला. मोहंमद रफी यांचे पुत्र शाहीद रफी यांनी लता मंगेशकर यांचे विधान खोटे असल्याचे म्हटले होते. माझ्या वडिलांना लता मंगेशकर यांना असे काहीही म्हटले नसल्याचे शाहीद यांचा दावा होता.

लतादीदींनी काही चित्रपटांत अभिनयाची छापही उमटविली. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत.

लता मंगेशकर यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार

  • मध्य प्रदेश सरकारतर्फे - १९८४पासून

  • महाराष्ट्र सरकारतर्फे - १९९२पासून

लतादीदींना मिळालेले सन्मान

  • भारतरत्न - २००१

  • पद्मविभूषण - १९९९

  • पद्मभूषण - १९६९

  • दादासाहेब फाळके पुरस्कार - १९८९

राष्ट्रीय पुरस्कार

  • १९७२ ः परिचय - उत्कृष्ट पार्श्‍वगायिका

  • १९७५ ः कोरा कागज - उत्कृष्ट पार्श्‍वगायिका

  • १९९० ः लेकिन - उत्कृष्ट पार्श्‍वगायिका

  • १९९७ ः राजीव गांधी पुरस्कार

राज्य पुरस्कार

  • १९६६ ः साधी माणसं - उत्कृष्ट पार्श्‍वगायिका

  • १९७७ ः जैत रे जैत - उत्कृष्ट पार्श्‍वगायिका बंगाल चित्रपट संघटना (बी. एफ. जे. के.) पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार

  • १९५८ ः मधुमती (आजा रे परदेशी)

  • १९६२ ः बीस साल बाद

  • (कही दीप जले कही दिल)

  • १९६५ ः खानदान (तुम ही मेरे मंदिर)

  • १९६९ ः जीने की राह (आप मुझे अच्छे लगने लगे)

  • १९६९ ः मध्ये लतादीदींनी नवीन गायकांना संधी मिळावी यासाठी यापुढे फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारणार नाही असे जाहीर केले.

  • १९९३ ः राज कपूर पुरस्कृत फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार

  • १९९३ ः महाराष्ट्र राज्य पुरस्कृत फिल्मफेअर पुरस्कार (५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल)

  • १९९४ ः फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार

उत्कृष्ट पार्श्‍वगायिका

  • १९६४ ः वह कौन थी

  • १९६७ ः मिलन

  • १९६८ ः राजा और रंक

  • १९६९ ः सरस्वती चंद्र

  • १९७० ः दो रास्ते

  • १९७१ ः तेरे मेरे सपने

  • १९७३ ः अभिमान

  • १९७५ ः कोरा कागज

  • १९८४ ः एक दुजे के लिए

  • १९८५ ः राम तेरी गंगा मैली

इतर पुरस्कार - पदव्या

  • १९८० ः जॉर्जटाऊन, गियाना (दक्षिण अमेरिकेकडून) पुरस्कार

  • १९८० ः दक्षिण अमेरिकेतील सुरिनाम प्रजासत्ताकाकडून सन्माननीय नागरिकत्व

  • १९९५ ः दीदींच्या टोरांटो, कॅनडा येथे आगमनाप्रीत्यर्थ ९ जून हा दिवस "आशिया दिन'' म्हणून जाहीर

  • १९८७ ः ह्यूस्टन टेक्‍सास (अमेरिका) याची सन्माननीय नागरिकत्व

  • १९८९ ः दादासाहेब फाळके पुरस्कार

  • १९९६ ः व्हिडिओकॉन स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार

  • १९९८ ः लक्‍स झी जीवनगौरव पुरस्कार

  • १९९९ ः पद्मविभूषण पुरस्कार, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, तसेच हैदराबाद विद्यापीठाकडून डी.लिट.जाहीर, तसेच १९९० मध्ये पुणे विद्यापीठाकडून सन्मानीय डी.लिट., संकेश्‍वरच्या शंकराचार्यांकडून स्वरभारती पुरस्कार

  • २००० ः (आय.आय.एफ.ए.) लंडनकडून जीवनगौरव पुरस्कार

  • २००० ः चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार

  • २००३ ः पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जीवन गौरव पुरस्कार

  • २००१ ः भारतरत्न - भारत सरकार

  • २००१ ः नूरजहॉँ पुरस्कार

  • (प्रथम पुरस्कार प्राप्तकर्ती)

  • २००१ ः महाराष्ट्र रत्न (प्रथम पुरस्कार प्राप्तकर्ती)

  • २००२ ः संगीत व चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल सी.आय.टी. कडून पुरस्कार राष्ट्रीय एकात्मतेबद्दल हकीम खान सूर पुरस्कार

  • २००२ ः आशा भोसले पुरस्कार

  • (प्रथम पुरस्कार प्राप्तकर्ती) पिंपरी - चिंचवड

  • २००३ ः जीवनगौरव पुरस्कार, पुणे एकूण २५० चषक व १५० सुवर्णपदके इत्यादी एम.आय. लंडनची प्लॅटिनम डिस्क असणारी एकमेव आशियायी व्यक्ती.

प्रमुख गायकांसोबत गायलेले पहिले आणि शेवटचे गीत

(चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेनुसार)

महंमद रफी : पहिले गीत – ‘चलो हो गयी तैय्यार ‘ (शादी से पहले) साल-१९४७

शेवटचे गीत – शोले शोले मेरी जवानी (लॉकेट) साल -१९८४

मुकेश : पहिले गीत – ‘याद रखना चांद तारो इस सुहानी रात को (अनोखा प्यार) साल -१९४८ शेवटचे गीत – प्यार का बंधन खून का रिश्ता (खेल खिलाडी का) साल - १९७७

किशोरकुमार : पहिले गीत – ‘ये कौन आया रे करके सोला सिंगार (अनमोल रतन)

साल-१९५० शेवटचे गीत – जाने दो जाने दो मुझे जाना है (शहेनशहा ) साल -१९८८

तलत महमूद : पहिले गीत – ‘शिकवा मै तेरा गाऊ दिलसे (जिद्दी) साल-१९४८

शेवटचे गीत – मुहोब्बत की कहानिया सुनाने लगी (वो दिन याद करो ) साल -१९७१

हेमंत कुमार : पहिले गीत – ‘चांदनी राते प्यार की बाते (जाल) साल-१९५२

शेवटचे गीत – छुपा लो यूं दिल में प्यार मेरा (ममता ) साल -१९६६

लता मंगेशकर यांचा सामाजिक कार्यातील सहभाग

  • १९५३ : महाराष्ट्रातील दुष्काळनिधीसाठी मुंबईत गाण्याचा कार्यक्रम.

  • १९५४ : दादरा-नगर-हवेली (गोवा) मुक्तिसंग्रामासाठी अर्थसाहाय्य.

  • १९६१ : पुण्यामध्ये पानशेत धरण पूरग्रस्तांसाठी मुंबईमध्ये मदतफेरीद्वारा साहाय्यनिधी,

  • गेट वे ऑफ इंडियाच्या शिवाजी महाराज पुतळ्यास देणगी.

  • १९६२ : चीन आक्रमणाच्या वेळी राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी मुंबईत गाण्याचा कार्यक्रम,

  • १९६५ : गोवा सहायक समिती निधीसाठी मुंबईत कार्यक्रम.

  • १९७२ : मिरज हॉस्पिटल १९७२ (वॉनलेस).

  • १९७३ : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी महाराष्ट्र शासनाकडे साहाय्यनिधी.

  • १९७४ : लंडनच्या नेहरू मेमोरिअल प्रोजेक्टसाठी निधीसंकलनार्थ अल्बर्ट हॉलमध्ये

  • गाण्याचा कार्यक्रम.

  • १९७४ : लंडनच्या भारतीय विद्याभवन केंद्रासाठी गाण्याचा कार्यक्रम.

  • १९७६ : लॉसएंजेलिस येथे हरेकृष्ण मंदिरासाठी चॅरिटी शो.

  • १९७८ : कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम उभारणीसाठी गाण्याच्या कार्यक्रमाद्वारे अर्थसाहाय्य.

  • १९८१ : औराद शाहजानी-मा. दीनानाथ मंगेशकर कॉलेज इमारतनिधी साहाय्य.

  • १९८१ : श्री क्षेत्र आळंदी, ज्ञानेश्वर मंदिराचा सुवर्णकळस.

  • १९८३ : गरजू खेळाडूंच्या साहाय्यासाठी क्रिकेट ट्रस्टची स्थापना.

  • १९८३ : इंदूर टेबलटेनिस कॉम्प्लेक्ससाठी कार्यक्रमाद्वारे अर्थसाहाय्य.

  • १९८४ : बाबा आमटे यांच्या ''आनंदवन’च्या मदतीसाठी मुंबईत कार्यक्रम,

  • १९८५ : टोरांटो येथील ''युनायटेड वे'' या सेवाभावी संस्थेच्या साहाय्यार्थ टोरांटो येथे

  • गाण्याचा कार्यक्रम.

  • १९८६ : नॅशनल सोसायटी फॉर इक्वल अपॉर्च्युनिटी फॉर हॅंडीकॅप्ड नासिओ यांच्यासाठी मुंबईत विशेष चॅरिटी शो.

  • १९८७ : राजस्थान दुष्काळपीडितांसाठी जयपूर येथे गाण्याचा कार्यक्रम,

  • १९९० : पै. महम्मद रफी यांच्या मुंबईतील नियोजित स्मारकासाठी साहाय्यार्थ लंडन

  • येथे कार्यक्रम.

  • १९९१ : ''कामायनी'' मूक-बधिर मुलांची संस्था, पुणे यांना देणगी.

  • १९९८ : कारगिल युद्धाच्या वेळी जवानांसाठी निधी.

  • २००० : पुणे येथे बांधल्या जाणाऱ्या मा. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसाठी निधी

  • संकलनार्थ कार्यक्रम.

  • २००१ : मा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सुरू.

  • २००३ : पिंपरी-चिंचवड येथे हॉस्पिटल निधी संकलनासाठी कार्यक्रम.

पहिला गाणे ःनाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी’. संगीतकार ः सदाशिवराव नेवरेकर. चित्रपट ः किती हसाल (मराठी- १९४२). मात्र हे गाणे शेवटच्या संपादनात चित्रपटातून काढून टाकले होते. आपल्या मुलीने चित्रपटांत गाऊ नये, असे त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांना वाटत होते. प्रदर्शित झालेले पहिले गाणे ः पा लागू कर जोरी ः चित्रपट ः आपकी सेवा (१९४६) शेवटचे गाणे ः चित्रपट ः सौगंध मुझे इस मिट्टी की (२०१९) संगीतकार ः मयुरेश पै.

लता मंगेशकर यांची गाजलेली हिंदी गाणी

  • दिलका खिलौना हाये टूट गया (गूँज उठी शहनाई)

  • तेरे सूर और मेरे गीत (गूँज उठी शहनाई)

  • रसिक बलमा (चोरी चोरी)

  • ओ सजना बरखा बहार आयी (परख)

  • आयेगा आनेवाला (महल)

  • बोल रे कठपुतली डोरी (कठपुतली)

  • तुम्ही हो माता पिता तुम्ही हो (मै चूप रहुंगी)

  • जो तुम तोडो पिया (झनक झनक पायल बाजे)

  • हवा में उड़ता जाये (बरसात)

  • जिया बेकरार है (बरसात)

  • आजा रे परदेसी (मधुमती)

  • घडी घडी मोरा दिल धडके (मधुमती)

  • अल्ला तेरो नाम (हम दोनो)

  • किसीने अपना बनाके मुझको (पतिता)

  • ओ चांद कहा ले लाये (शारदा)

  • मनमोहना बडे झूटे (सीमा)

  • ज्योती कलश झलके (भाभीकी चुडिया)

  • लो लगाके गीत गाके (भाभीकी चुडिया)

  • मोहे भूल गये सावरिया (बैजू बावरा)

  • भैय्या मोरे राखीके बंधन ना भूलाना (छोटी बहन)

  • गुडिया हमसे रूठी रहोगी (दोस्ती)

  • प्यार किया तो डरना क्या (मुगले आझम)

  • मन डोले मेरा तन डोले (नागीन)

  • डफलीवाले डफली बजा (सरगम)

  • राजाकी आयेगी बरात (आह)

  • रूक जा रात, ठहेरजा रे चंदा (दिल एक मंदिर)

  • अपलम चपलम (आझाद)

  • राधा ना बोले रे (आझाद)

  • जाने कैसे सपनोंमे (अनुराधा)

  • सावरी सावरी (अनुराधा)

  • चाँद खिला वो तारे हँसे (अनाडी)

  • तेरा जाना (अनाडी)

  • ओ बसंती पवन पागल (जिस देश में गंगा बहती है)

  • कैद मे है बुलबुल (बेदर्द जमाना क्या जाने)

  • झूट बोले कौवा काटे (बॉबी)

  • अजिब दास्ताँ है ये (दिल अपना और प्रीत पराई दिल अपना)

  • शीशा है या दिल इतना ना उछालो (दिल अपना और प्रीत पराई दिल अपना)

  • ना कोई उमंग है (कटी पतंग)

  • सत्यम शिवम सुंदरम (सत्यम् शिवम् सुंदरम्)

  • यशोमती मैय्या (सत्यम् शिवम् सुंदरम्)

  • आ लौटके आजा मेरे मित (रानी रूपमती)

  • कहीं दीप जले, कहीं दिल (बीस साल बाद)

  • नैना बरसे (वह कौन थी)

  • रहेना रहे हम (ममता)

  • इन्ही लोगों ने (पाकिजा)

  • आपकी नजरोने समजा (अनपढ)

  • आवारा ये मेरे दिल (रात और दिन)

  • बाहों में चले आओ (अनामिका)

  • एक प्यार का नगमा है (शोर)

  • ए मेरे वतन के लोगो

  • बडा नटखट है ये (अमर प्रेम )

  • हजार बाते कहे जमाना (घटना)

गाजलेली मराठी गाणी

  • गणराज रंगी नाचतो

  • गजानना श्री गणराया

  • ओम नमोजी आद्या

  • मोगरा फुलला

  • रुणझुणु रुणुझुणु रे भ्रमरा

  • रंगा येई रे

  • घनु वाहे रुणझुणा

  • विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले

  • आता विश्वात्मके देवे

  • मधु मागसी माझ्या सख्या परी

  • मावळत्या दिनकरा

  • तिन्ही सांजा सखे मिळाल्या

  • जन पळभर म्हणतील हाय हाय

  • नववधू प्रिया मी बावरते

  • गंगा यमुना डोळ्यात उभ्या का?

  • कल्पवृक्ष कन्येसाठी

  • घट डोईवर, घट कमरेवर

  • लेक लाडकी या घरची

  • विठ्ठल तो आला आला

  • पाहूनी रघुनंदन सावळा

  • मेंदीच्या पानावर

  • मालवून टाक दीप

  • मी डोलकर डोलकर दर्याचा राजा

  • राजा सारंगा माझ्या सारंगा

  • वादल वारं सुटलं रं

  • आनंदी आनंद गडे

  • नाही कशी म्हणू तुला

  • जीवनात ही घडी

  • जयोस्तुते श्री महन मंगले

  • ने मजसी ने (समूहगीत)

  • आड वाटेला दूर एक माळ

  • दे रे कान्हा चोळी अन् लुगडी

  • प्रेमस्वरूप आई

  • विसरू नको श्रीरामा

  • रे सांग धावत्या जळा

  • प्रेम करूनी मी चुकले

  • गोड तुझ्या त्या स्वप्नामधली

  • प्रेम तुझ्यावर करते मी रे

  • आनंदवन भूवनी

  • सांगा मुकुंद कुणी हा पाहिला

  • लटपट लटपट तुझं चालणं

  • घडी घडी अरे मोहना

  • तुझी माझी प्रीत एकदा तरी

  • चाफा बोलेना

  • अरे अरे ज्ञाना झालासी पावन

  • पैल तो गे काऊ कोकताहे

  • वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे

  • जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

  • भेटीलागी जीवा लागलीसे आस

  • मायेवीण बाळ क्षणभरी न राहे

  • सुंदर ते ध्यान

  • धुंद मधुमती

  • उपवर झाली लेक लाडकी

  • मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे

  • निजवू श्रीहरी

  • दैव जाणले कुणी

  • आठवे अजुनी यमुनातीर

  • बोल वीणे बोल

  • कुणाला सांगु माझी व्यथा

  • पाहिलेस तू ऐकलेस तू

  • सांग तु माझा होशील का

  • पहा टाकले पुसुनि डोळे

  • या चिमण्यांनो, परत फिरा

  • आली दिवाळी मंगल दारी

  • रुसू नको इतुका

  • गायी घरास आल्या

  • हसले ग बाई हसले

  • हसतेस अशी का मनी

  • श्रावणात घन निळा बरसला

  • नीज माझ्या नंदलाला

  • गगन सदन तेजोमय

  • अखेरचा हा तुला दंडवत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com