राम गोपाल वर्माचा खेळ; शेवटच्या क्षणी महिमा चौधरीला बसला धक्का!

सकाळ ऑनलाइन
Wednesday, 7 April 2021

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महिमाचा गौप्यस्फोट

सुभाष घई यांच्या 'परदेस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री महिमा चौधरी हिने एक काळ गाजवला. काही सुपरहिट चित्रपटांनंतर महिमा लाइमलाइटपासून दूर गेली. एका भीषण अपघातामुळे तिच्या करिअरवर परिणाम झाला. महिमा आता पुन्हा एकदा तिच्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या अपघाताविषयी, खासगी आयुष्याविषयी आणि करिअरमधील चित्रपटांविषयी बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या. 'सत्या' या चित्रपटातील भूमिकेबाबतही तिने मोठा खुलासा केला. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सत्या' या चित्रपटातील भूमिकेची ऑफर महिमाला देण्यात आली होती. मात्र तिला कधी या चित्रपटातून काढून टाकलं हे तिलाच समजलं नाही. 

"मला सत्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. निर्मात्यांनी मला साइनिंगची रक्कमसुद्धा दिली होती. मात्र ऐनवेळी मला कोणतीच कल्पना न देता राम गोपाल वर्मा यांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला माझ्या जागी घेतलं. सत्या हा माझा करिअरमधला दुसरा चित्रपट असता. विशेष म्हणजे मल किंवा माझ्या मॅनेजरला कॉल करून खरं काय ते सांगण्याची सभ्यतासुद्धा त्यांच्याकडे नव्हती. जेव्हा माझ्याशिवाय चित्रपटाची शूटिंग सुरू झाली, हे मी वृत्तपत्रांमध्ये वाचलं, तेव्हा मला समजलं की माझी भूमिका उर्मिलाला देण्यात आली आहे", असं महिमाने या मुलाखतीत सांगितलं. 

हेही वाचा : आगळंवेगळं सहजीवन; मराठी इंडस्ट्रीतील लिव्ह-इन रिलेशनशिप्स

बेंगळुरूमध्ये झाला होता भीषण अपघात
अजय देवगणच्या 'दिल क्या करे' या चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी बेंगळुरूमध्ये महिमाच्या कारचा मोठा अपघात झाला. एका दुधाच्या ट्रकने महिमाच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात महिमाच्या चेहऱ्याला फार दुखापत झाली होती. गाडीच्या काचांचे तुकडे तिच्या चेहऱ्याला लागले होते. या घटनेनंतर महिमा मानसिकदृष्ट्याही खूप खचली होती. मात्र या काळात अजय आणि काजोलने तिची फार मदत केल्याचं महिमाने सांगितलं. 

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डार्क चॉकलेट' या चित्रपटात ती शेवटची झळकली. त्यानंतर ती बॉलिवूडपासून फार दूर गेली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: learned that i was replaced in satya from press said mahima chaudhry