दिल, दोस्ती : मैत्रीची जुळलेली ‘रेशीमगाठ’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

madhuganga kulkarni and sharmistha raut

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा खास मित्र असतो, ज्याच्याबरोबर आपण मजामस्ती करतो, आपलं सुख-दुःख वाटून घेतो, हक्काने भांडतो.

दिल, दोस्ती : मैत्रीची जुळलेली ‘रेशीमगाठ’

- मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा खास मित्र असतो, ज्याच्याबरोबर आपण मजामस्ती करतो, आपलं सुख-दुःख वाटून घेतो, हक्काने भांडतो. मात्र, हे सगळं होत असताना आपलं त्याच्याबरोबरच नातं आणखीन घट्ट होत जातं. असंच काहीसं नातं आहे अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत व लेखिका, अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीचं. त्यांची पहिली भेट ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेच्या सेटवर झाली. दोघींचाही स्वभाव मनमिळाऊ असल्याने एक-दोन दिवसांतच त्यांची छान मैत्री झाली.

शर्मिष्ठा म्हणाली, ‘मधुगंधा ही फणसासारखी आहे. ती कठोर, काटेकोर आहे, तितकीच प्रेमळ व संवेदनशील आहे. कोणाला मदतीची गरज असल्यास कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तिला शक्य होईल तितकी मदत ती त्या व्यक्तीला करते. आमची मैत्री झाल्यानंतर माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले; त्या सगळ्यांची ती साक्षीदार आहे. त्या संपूर्ण काळात ती माझा एक भक्कम आधार बनून माझ्या पाठीशी उभी होती. ती माझ्या आयुष्यात आल्यावर माझ्या आयुष्याला शिस्त लागली, गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोनही काही अंशी बदलला. वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात महत्त्वाच्या अनेक गोष्टी तिनं मला शिकवल्या.

मुख्य म्हणजे पैसे कमावणं आपल्यासाठी जितकं महत्त्वाचं, तितकंच मिळालेल्या पैशाचं उत्तमप्रकारे नियोजन करणंही महत्त्वाचं आहे; ते कसं करावं हे तिनं मला शिकवलं. तिच्यामुळं माझ्या मनात असलेलं प्राणीप्रेम आणखीन वाढलं. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री व लेखिका आहे. सहकलाकार म्हणून, लेखिका म्हणून ती नेहमी तिच्याबरोबर काम करणाऱ्या कलाकारांना सांभाळून घेत त्यांचंही काम कसं चांगलं होईल व स्क्रीनवर तेही कसे उठून दिसतील याचा विचार करते. आमचा स्वभाव अगदी विरुद्ध असल्यानं आमच्यात मतभेद होतात, कधीकधी आम्ही भांडतोही. पण आम्ही कितीही भांडलो तरी आम्ही दोघीही एकमेकींशी न बोलता राहूच शकत नाही. माझ्या हृदयात मधुगंधासाठी विशेष स्थान आहे आणि ते कधीच बदलणार नाही.’

मधुगंधानं शर्मिष्ठाबद्दल बोलताना सांगितलं, ‘शर्मिष्ठा खूप निर्मळ मनाची, पारदर्शक, भावनिक मुलगी आहे. आयुष्याकडं गंभीरपणे न बघता ती अगदी दिलखुलासपणे जगते. ती नेहमी हसतमुख असते. आमच्यात काही सारखे गुण आहेत, काही वेगळे आहेत. आम्ही पटकन समोरच्याला आपलंसं करतो, आमचा मित्र परिवार मोठा आहे, आम्हा दोघींनाही गप्पा गोष्टी करायला, हसायला खूप आवडतं. शर्मिष्ठा कायम उत्साही असते व तिच्यातला हा उत्साह मला आत्मसात करायला आवडेल. ती उत्तम स्वयंपाक करते, मोदक, पुरणपोळीपासून ते कॉन्टिनेंटल, वेगवेगळ्या प्रकारची आइस्क्रीम्स, मिठाया सगळंच फार छान आणि चविष्ट बनवते. मुळात तिच्या हाताला चव आहे व त्याचबरोबर ते शिकण्याची जिद्द तिच्यात आहे. मला तिच्या हातचे सगळेच पदार्थ अतिशय आवडतात, पण तिच्या हातच्या उकडीच्या मोदकांवर माझं विशेष प्रेम आहे.

जितकी ती किचनमधली कलाकार आहे तितकीच व्यावसायिक पातळीवरही उत्तम कलाकार आहे. ती हसत खेळत काम करते आणि सहकलाकारांशी तिचं ऑफस्क्रीन छान बॉण्डिंग होत असल्यानं तिच्याबरोबर ऑनस्क्रीन काम करताना कठीण जात नाही. एकत्र काम करताना रिकाम्या वेळात आम्ही एकमेकींची खूप चेष्टामस्करी करायचो. अभिनय करताना तिचे डोळे बोलतात. ती झोकून देऊन काम करते. भूमिका विनोदी असो, नकारात्मक असो किंवा सोज्वळ; सगळ्या भूमिका ती खूप छान साकारते. तिनं ‘उंच माझा झोका’ मालिकेत साकारलेली भूमिका मला विशेष आवडली. पण तिचं खरं टॅलेंट लोकांना दिसेल अशी तगडी भूमिका अजूनही तिला मिळालेली नाही असं मला वाटतं आणि ती लवकरच मिळो ही इच्छा.’

(शब्दांकन - राजसी वैद्य)

Web Title: Madhuganga Kulkarni And Sharmistha Raut Writes Friendship Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainmentactress