esakal | 'परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र कणखरपणे उभा'

बोलून बातमी शोधा

Marathi Celebrity
'परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र कणखरपणे उभा'
sakal_logo
By
टीम ई सकाळ

१ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. आजचा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक नागरिक आज आपल्या मायभूमीला अभिवादन करतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्या १०६ दिग्गजांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण आज केले जाते. दरवर्षी महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात विविध सांकृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण सध्या कोरोनामुळे सर्व नागरिक घरी राहूनच महाराष्ट्र दिन साजरा करत आहेत. अनेक मराठी सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत उत्साही अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. त्याच्या अभिनयाने आणि नृत्याने तो नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकतो. महाराष्ट्र दिनानिमित्त प्रेक्षकांच्या लाडक्या सिद्धूने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाण गायले आहे.

प्रसिध्द अभिनेत्री अमृता खानविलकरनेदेखील सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे. हिरव्या साडीमध्ये अमृता अतिशय सुंदर दिसत आहे. या फोटोला आमृताने कॅप्शन दिले, ‘महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा. संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो वा कामगार लढा ही आंदोलनं एकजुटीमुळे यशस्वी होऊ शकली. आपल्या देशावर ओढावलेलं संकट हे एका विषाणूविरोधातील आंदोलनच आहे. त्यामुळे या आंदोलनातही आपण एकजूट दाखवली तर आपलीही या विषाणूविरोधातील चळवळ यशस्वी होईल.’

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना उर्मिला कोठारेने महाराष्ट्र दिनानिमित्त एक हटके व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ’ही मायभूमी ही जन्मभूमी’ या गाण्यावर रूबाबदार लूकमध्ये बुलेटवर बसलेली दिसत आहे. उर्मिलाने या व्हिडीओमध्ये नऊवारी साडी, फेटा आणि गॉगल असा हटके लूक केला आहे. हा व्हिडीओला उर्मिलाने कॅप्शन दिले, ‘मंगल देशा पवित्र देशा प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा.’

मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमधील आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलाकार म्हणजे सुबोध भावे. सुबोधनेदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री दातारने सोशल मीडियावर महाराष्ट्रीय लूकमध्ये फोटो पोस्ट करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये गायत्री गुलाबी रंगाची काठापदराची साडी नेसली आहे. या फोटोला तिने कॅप्शन दिले, ‘परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपला महाराष्ट्र त्याचा सामना करण्यासाठी कणखरपणे उभा आहे!आपण यातून बाहेर पडणारच. कारण कोणाच्याही गुलामीखाली राहणं आपल्या रक्तातच नाही. मग तो मुघलांसारखा दुश्मन असो किंवा कोरोनासारखी महामारी! महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!’