esakal | ऑन स्क्रीन : १४ फेरे : लांबलेली लग्नघटिका
sakal

बोलून बातमी शोधा

Vikrant and Kirti

ऑन स्क्रीन : १४ फेरे : लांबलेली लग्नघटिका

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

लग्नामधली गंमत, गोंधळ, गैरसमज, गुंतागुंत हा हिंदी चित्रपटांचा सध्याचा आवडता विषय. हा विषय असलेली कथा फुलवण्याच्या अमाप संधी असल्यानं दिग्दर्शक या विषयांना प्राधान्य न देतील, तरच नवल. देवांशू सिंग या दिग्दर्शकानं मात्र एकाच वेळी दोन लग्न दाखवत डबल धमाका उडवून द्यायचा चंग बांधत ‘१४ फेरे’ या चित्रपटाला हात घातला. मात्र, कथेपासून अभिनयापर्यंतच्या सर्वच आघाड्यांवर अतिसुमार कामगिरी करीत हा चित्रपट प्रेक्षकांची सत्त्वपरीक्षा पाहणारा ठरला आहे. विक्रांत मेस्सी आणि कीर्ती खंबाटा या जोडीची केमिस्ट्री अजिबात न जुळल्यानं या त्रासात भरच पडली आहे.

‘१४ फेरे’ची कथा लग्नाबरोबर जातीय संघर्षाचीही आहे. बिहारमधील राजपूत मुलगा संजय (विक्रांत मेस्सी) आणि जयपूरची जाट मुलगी आदिती (कीर्ती खंबाटा) प्रेमात पडतात आणि त्याचवेळी आपले अत्यंत बुरसटलेले विचार असलेलं कुटुंबीय या लग्नाला मान्यता देणार नाहीत, हेही ठरवून टाकतात. त्यासाठी आपल्या मित्रांची मदत घेत दोघं आपल्या नकली आई-वडिलांची एक जोडी तयार करतात आणि आपापल्या कुटुंबांना एकाच जातीचे असल्याचं नाटक घडवून आणत लग्न यशस्वी करण्याचा घाट घालतात. झुबिया (गोहर खान) आणि अमेय (जमील खान) हे दोघांचेही आई-वडील बनतात आणि मेलोड्रामापद्धतीनं कथा पुढं सरकत राहते. जात, खानदान की इज्जत, खून पी जाऊंगा, ऑनर किलिंग असे अनेक (गंभीर) फेरे घेत चित्रपट रडतखडत शेवटापर्यंत जाऊन पोचतो आणि अपेक्षित शेवटासह संपतो.

चित्रपटाची कथा पहिल्या प्रसंगापासून अत्यंत धीम्या गतीनं पुढं सरकत राहते. संजय व आदितीच्या प्रेमाचे प्रसंग आणि त्याच्या जोडीला दोघांची कुटुंब किती मागस विचारांचे आहेत हे दाखवणारे प्रसंग उबग आणतात. आपले (खोटे) आई-वडील निवडण्यासाठी या दोघांनी घेतलेल्या टेस्टचा प्रसंग चित्रपटाचा संकलक सुट्टीवर गेल्याचंच सांगतात. त्याचबरोबर खोट्या आई-वडिलांचं दोघांच्या घरी पोचणं, घरच्यांचा लग्नाला तयार करणं या गोष्टी दिग्दर्शकाला विनोदी म्हणून दाखवायच्या असल्या, तरी त्या हास्यास्पदच झाल्या आहेत. कथा अचानक ऑनर किलिंगपर्यंत जाते व गंभीर होते व पुन्हा काही मिनिटांत विनोदी होण्याचा प्रयत्न करते. हा गोंधळ शेवटपर्यंत चालूच राहतो. अशा कथांना एक बिनडोक, काहीही करून हसवणाऱ्या विनोदाची गरज असते व या आघाडीवर चित्रपट पूर्ण फसतो.

कथेतील पात्रांची गर्दी समस्या ठरते. कोण कोणाचा कोण हे शोधण्यात प्रेक्षकांची चांगलीच दमछाक होते. विक्रांत मेस्सी प्रत्येकच चित्रपटात तुफान कष्ट घेताना दिसतो, इथंही त्यानं कष्ट घेतले आहेत; मात्र कथा त्याला साथ देत नाही. आपल्या प्रेयसीला खूष करू पाहणारा, लग्न होण्यासाठी काहीही करायची तयारी असलेला युवक त्यानं छान उभा केला आहे, मात्र तो चित्रपटाला तारण्यात कमी पडला आहे. कीर्ती खंबाटाच्या बाबतीतही जवळपास हेच झालं आहे. विनोदी प्रसंगांत ती विक्रांतपेक्षा जरा बरी कामगिरी करते. गोहर खान या ग्लॅमरस अभिनेत्रीनं साकारलेली भूमिका सर्वाधिक फसली आहे. तिला विनोदाचं अंग शून्य असल्याचंच ही भूमिका सिद्ध करते. इतर कलाकारांबद्दल काही बरी परिस्थिती नाही. एकंदरीतच, ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपटांना फॉर्म सापडताना दिसत नाही आणि प्रेक्षकांची सत्त्वपरीक्षा संपत नाही, असेच चित्र आहे.

loading image
go to top