ऑन स्क्रीन : अनकही कहानियां : प्रेम आणि भाव-भावनांचा गुच्छ!

‘नेटफ्लिक्स’वरील ‘अनकही कहानियां’ हा पुन्हा एकदा थोडा फसलेला, थोडा जमलेला सिनेमा ठरला आहे.
Ankahi Kahaniya Movie
Ankahi Kahaniya MovieSakal
Updated on

दिग्दर्शकांकडून समान धागा असलेल्या विविध साहित्यकृतींवर आधारित भागांचा गुच्छ बनवून तो सादर करण्याच्या मालिकेतील (अॅन्थोलॉजी) ‘नेटफ्लिक्स’वरील ‘अनकही कहानियां’ हा पुन्हा एकदा थोडा फसलेला, थोडा जमलेला सिनेमा ठरला आहे. प्रेम हा समान धागा असलेल्या तीन कथांपैकी अभिषेक चौबे दिग्दर्शित कथा सर्वांत उजवी ठरली असून, इतर कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात कमी पडल्या आहेत.

या कथा मालिकेतील जयंत कैकिनी यांच्या ‘मध्यंतर’ या कथेवर आणि अभिषेक चौबे दिग्दर्शित गोष्ट भाव भावनांच्या चढ-उतारांचा छान मेळ साधत वेगळीच प्रेमकथा सादर करते. मंजिरी (रिंकू राजगुरू) ही गरीब घरातील व सिनेमा पाहण्याचं वेड असलेली मुलगी सिनेमागृहात पडेल ते काम करणाऱ्या नंदू (दिलजाद हिवाळे) या तरुणाच्या प्रेमात पडते. प्रत्येक चित्रपटाच्या मध्यंतरात ते एकमेकाला भेटू लागतात, स्वतःबद्दल अधिक जाणून घेऊ लागतात. दोघांचीही स्वप्नं, आकांक्षा सध्याच्या विपरीत परिस्थितीतून झेप घेत नव्या विश्वाला गवसणी घालण्याची असतात. दोघांचाही एक पाय त्यांच्या कुटुंबाशी बांधला गेलेला असतो. हे जोखड झुगारत झेप घेण्यासाठी ते नक्की काय करतात याची ही गोष्ट. अत्यंत तरलपणे मांडलेली, भावनांचे अनेक चढउतार असलेली ही गोष्ट या मालिकेतील सर्वोत्कृष्ट ठरते. रिंकू राजगुरू आणि दिलजाद हिवाळे यांचा अभियनही कथेची जमेची बाजू.

दिग्दर्शिका ऐश्वर्या अय्यर तिवारी यांची कथा एका दुकानात सेल्समनचं काम करणाऱ्या प्रदीप (अभिषेक बॅनर्जी) या युवकाची आहे. गावाकडील घरदार सोडून मुंबईत एकट्याच राहणाऱ्या प्रदीपशी बोलायला तसं कोणीच नाही. दुकानात महिलांच्या विभागात एक नवा पुतळा दाखल होतो आणि प्रदीप तिच्याशीच गप्पा मारू लागतो, आपल्या सुख-दुःखाची गोष्टी शेअर करू लागतो. प्रदीपला वेड लागल्याचा समज करून घेत दुकान मालक त्याला नोकरीवरून काढतो. गावाकडं परतलेला प्रदीप पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू पाहतो व शहरात दाखल होतो. त्याला तो पुतळा पुन्हा मिळतो आणि प्रदीपच्या नोकरीचं काय होतं, हे कथेचा शेवट सांगतो. अभिषेक बॅनर्जीच्या अभिनयाच्या जोरावरच ही कथा खिळवून ठेवते, मात्र कथेचा जीव खूपच छोटा असल्यानं त्याचा पुरेसा प्रभाव पडत नाही.

तिसऱ्या कथेचं दिग्दर्शन साकेत चौधरी यांनी केलं आहे. या कथेत कॉर्पोरेट विश्‍वातील कर्मचाऱ्यांमध्ये तयार होणारे प्रेमसंबंध व त्यातून होणारी गुंतागुंत मांडण्यात आली आहे. तनू माथूर (झोया हुसैन) या गृहिणीला आपला नवरा अर्जुनचे (निखिल द्विवेदी) प्रेमसंबंध असल्याची शंका येते. त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नताशावर (पालोमी घोष) तिचा संशय असल्यानं ती तिचा पती मानवला (कुणाल कपूर) भेटायला बोलावते. आपली पत्नी असं करणारच नाही असा विश्‍वास असलेल्या मानवला तनू ते दोघं जात असलेल्या विविध ठिकाणी घेऊन जाते व त्यांचं प्रेम कसं जमलं असावं, हे तसं प्रसंग उभे करून पटवून देण्याचा प्रयत्न करते. मानवला हे पटू लागतं, मात्र त्यातून कथा वेगळंच वळण घेते. ही कथा आजच्या तरुणाईची असली, तरी ती खूप ताणली गेली आहे. अनेक प्रश्‍नांची उत्तरं न देताच कथा पुढं रेटली असल्यानं ती पटत नाही. कुणाल कपूर व निखिल द्विवेदी यांच्यासारख्या कलाकारांचा प्रभाव पडत नाही.

एकंदरीतच, प्रेम आणि भाव-भावनांचा हा गुच्छ प्रेमकथांच्या प्रेमींना आवडू शकतो, मात्र तो पुरेसा फुललेला नाही, हेही खरं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com