esakal | ऑन स्क्रीन : चेहरे : मै थक गया हूं मै पक गया हूं I Chehre Movie
sakal

बोलून बातमी शोधा

Chehre

ऑन स्क्रीन : चेहरे : मै थक गया हूं मै पक गया हूं

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

न्यायव्यवस्था एखाद्या गुन्हेगाराला पुराव्यांअभावी दोषी ठरवू शकत नाही. अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय मिळत नाही व ती बदला घेण्याच्या उद्देशानं टोकाचं पाऊल उचलते... हे अत्यंत फिल्मी कथानक आपण अनेक हिंदी चित्रपटांतून पाहिलं आहे. मात्र, न्याय व पोलिस व्यवस्थेतून निवृत्त झालेले अधिकारी असा न्याय देण्याचा व्यवसाय सुरू करतात आणि स्वतःचं न्यायालय चालवत सुनावणी करून शिक्षा देतात हा मात्र भलताच अतार्किक प्रकार! रुमी जाफरी दिग्दर्शित ‘चेहरे’ हा अमिताभ बच्चन, अन्नू कपूर, इम्रान हाश्मी, रघुवीर यादव अशी तकडी स्टारकास्ट असलेला चित्रपट असाच पट मांडतो. कथेचा गाभाच कच्चा असल्यानं दोन तासांपेक्षा अधिक लांबीचा हा चेंबर ड्रामा केवळ उबग आणतो.

‘चेहरे’ची कथा दिल्लीपासून २०० किलोमीटर अंतरावर बर्फाळ प्रदेशातील एका निर्जन भागातील घरात सुरू होते. समीर मेहता हा बड्या कंपनीचा अधिकारी दिल्लीकडं निघालेला असताना रस्ता चुकतो (चुकवला जातो) आणि त्याला या घरात आसरा घ्यावा लागतो. हे घर निवृत्त न्यायाधीश जगदीश आचार्य (ध्रितीमन चटर्जी) यांचं असतं आणि त्याचे वकील मित्र लतीफ झैदी (अमिताभ बच्चन), परमजितसिंग (अन्नू कपूर) आणि जल्लाद (रघुवीर यादव) त्यांच्यासोबत असतात. समीर या घरात प्रवेश करताच ते एक खेळ सुरू करतात. झैदी व परमजित त्याची चौकशी सुरू करतात व आचार्य दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेत निकाल देण्याची प्रक्रिया सुरू करतात, असा हा खेळ. ‘प्रत्येक व्यक्तीनं आयुष्यात काहीतरी गुन्हा केलेलाच असतो, मात्र तो सिद्ध झालेला नसल्यानं तो निर्दोष असतो,’ असा तर्क काढीत समीरची चौकशी सुरू होते. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेमागचा उद्देश शोधत हे चौघं मिळून त्याला दोषी सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत राहातात. समीरचा दोष काय असतो, त्याला कोणती शिक्षा सुनावली जातो व तो ती शिक्षा मान्य करतो का याचा काहीसाच थरार कथा उभा करते.

‘एक रुका हुआ फैसला’पासून ‘बदला’पर्यंतच्या अनेक चित्रपटांमध्ये आपण अशा प्रकारे चेंबरमध्ये गुन्ह्याची उकल होण्याची कथा पाहिली आहे. मात्र, या कथेत स्वतःच एखाद्या गुन्हेगाराला हेरून, त्याला आपल्यापर्यंत ओढून आणत त्याची सुनावणी करून शिक्षा देणं असा अजब प्रकार पाहायला मिळतो. एका टप्प्यानंतर तो कणाहीन आणि तकलादू वाटायला लागतो आणि कथेतील गंमत निघून जाते. या कथेचं समर्थन करण्यासाठी झैदींच्या तोंडी निर्भयासारख्या अनेक पीडितांना न्याय मिळाला नसल्याचं मोठं स्वगत मांडलं जातं. मात्र, तोपर्यंत कथेतील दम निघून गेलेला असतो. मै थक गया हूं, पक गया हूं हे समीरच्या तोंडचं वाक्य प्रेक्षकांच्याही तोंडी यायला लागतं.

तगडी स्टारकास्ट असूनही ती चित्रपटाला वाचवू शकलेली नाही. अमिताभ बच्चन आपल्या नेहमीच्या जबरदस्त अंदाजात झैदी पेश करतात. भेदक नजर, सडेतोड प्रश्‍न आणि धडाकेबाज स्वगतांतून ते आपलं नाणं आजही खणखणीत असल्याचं दाखवतात. अन्नू कपूरही मिस्कील अंदाजात परमजितसिंग सादर करतात. रघुवीर यादवला फारशी संधी नाही. इतर कलाकारांनाही फारसे काम नाही. एकंदरीतच, ही भरकटलेली कथा अमिताभच्या चाहत्यांना सुसह्य होईल, इतरांना मात्र थकवण्याचंच काम करेल...

loading image
go to top