esakal | ऑन स्क्रीन : स्टेट ऑफ सीज टेम्पल अटॅक : खऱ्या हल्ल्याची लुटुपुटूची गोष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

State of Siege Temple Attack

ऑन स्क्रीन : स्टेट ऑफ सीज टेम्पल अटॅक : खऱ्या हल्ल्याची लुटुपुटूची गोष्ट

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

अतिरेक्यांकडून देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर झालेले हल्ले आणि ते परतवून लावल्याची यशोगाथा सांगणाऱ्या अनेक कथा हिंदी चित्रपटसृष्टीनं पडद्यावर साकारल्या आहेत. ‘स्टेट ऑफ सीज - टेम्पल अटॅक हा ‘झी ५’ या ओटोटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपट सप्टेंबर २००२मध्ये गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर झालेल्या हल्ल्याची कथा सांगतो. (मात्र, ही काल्पनिक गोष्ट असल्याचे सांगत संभाव्य वादापासून स्वतःला दूर ठेवतो.) अतिरेक्यांकडून निष्पाप लोकांवर झालेल्या एका भेकड हल्ल्याची ही गोष्ट चटका लावणारी आहे, मात्र ती सादर करताना केलेले अनेक बदल, ढिसाळ संकलन, भडक मांडणी, अभिनयाच्या आघाडीवरील निराशा यांमुळं चित्रपट पुरेशी पकड घेत नाही.

‘स्टेट ऑफ सीज - टेम्पल अटॅक’ची कथा भारत-पाक सीमेवर एका अतिरेकीविरोधी कारवाईने सुरू होते. राष्ट्रीय सुरक्षा दलाचा (एनएसजी) मेजर हनुत सिंग (अक्षय खन्ना) ही कारवाई पूर्ण करताना अनेक सहकाऱ्यांना गमावतो व याचे शल्य त्याला बोचत असतं. पुढच्या कारवाईच्या वेळी चुका टाळण्याचा निश्‍चय करीत तो मोठी संधी मिळण्याची वाट पाहात असतो. गुजरातमधील अस्वस्थ स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर (कथेत नाव बदललेल्या) कृष्णधाम मंदिरावर चार अतिरेकी हल्ला करतात. पहाटेच्या वेळी सुरक्षारक्षकांना ठार करीत अतिरेकी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांना ओलिस ठेवतात. त्याबदल्यात एका अतिरेक्याला सोडण्याची मागणी पंतप्रधानांकडं केली जाते. या अतिरेक्यांना ठार मारण्याची जबाबदारी हनुत सिंगवर येते. तो आपल्या सहकाऱ्यांसह मंदिरात प्रवेश करतो व मोठ्या शौर्यानं या चार अतिरेक्यांना कंठस्नान घालतो व सोडून दिलेल्या अतिरेक्यालाही ठार मारले जाते.

सत्यघटनेवरील आधारित या कथेला काल्पनिक कथेचं रुप दिल्यानं सुरवातीपासूनच कथा फारशी रुचत नाही. प्रेक्षक मूळ घटनेशी त्याची तुलना करीत राहतात. निवडलेले अतिरेकी अगदीच पोरकट आणि किरकोळ शरीरयष्टीचे दाखवल्यानं गोष्ट आणखी पातळ होते. काश्मीरमधील कारवाईमुळं खचलेला हनुत सिंग चित्रपटभर दिसत राहतो. कथेच्या केंद्रस्थानी त्याचीच व्यथा आणि त्यातून बाहेर पडण्याची तगमग दाखवल्यानं मूळ कथा अनेकदा मागं पडते. त्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे गोडवे, मंदिराच्या मुस्लिम कर्मचाऱ्यानं अतिरेक्यांना ‘जिहाद’चा अर्थ समजावून सांगत केलेलं बलिदान या फिल्मी गोष्टीही घुसवल्या आहेत. चित्रपटाचा शेवटही फार मोठ्या संघर्षाविना घडतो. (मूळ घटनेत एनएसजी कमांडो सृजनसिंग भंडारी या कारवाईच्या वेळी जबर जखमी झाले होते व तब्बल ६०० दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर हुतात्मा झाले होते. त्यांना मरणोत्तर कीर्ती चक्र बहाल करण्यात आले होते.)

अभिनयाच्या आघाडीवर केवळ अक्षय खन्नाकडून अपेक्षा होत्या, मात्र कमांडोच्या भूमिकेत तो फारसा शोभून दिसत नाही. त्यात त्याच्या पात्राचं लिखाण जमून न आल्यानंही त्याचा प्रभाव पडत नाही. क्लोज शॉटमध्ये त्याचं वयही लपून राहात नाही. गौतम रोडे, विवेक दहिया, मंजिरी फडणीस यांना फारशी संधी नाही.

loading image